#HaryanaAssemblyPolls : मुख्यमंत्री मतदानासाठी आले सायकलवर!

#HaryanaAssemblyPolls : मुख्यमंत्री मतदानासाठी आले सायकलवर!

महाराष्ट्रात एकीकडे २८८ जागांसाठी मतदान होत असतानाच तिकडे उत्तरेत हरयाणामध्ये देखील ९० जागांसाठी मतदान सुरू आहे. हरयाणामधील विद्यमान भाजप सरकारविरोधात असलेल्या वातावरणाच्या पार्श्वभूमीवर हरयाणामधली निवडणूक रंगतदार झाली आहे. दरम्यान, हरयाणातल्या विविध भागामध्ये सकाळीच दिग्गज उमेदवारांनी मतदान केलं. यामध्ये स्वत: मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्यासोबतच भारताचा ऑलिम्पिक पदक विजेता कुस्तीपटू योगेश्वर दत्त, बबिता फोगाट, टिकटॉक स्टार सोनाली फोगाट यांचा समावेश आहे. सकाळी ११ वाजेपर्यंत हरियाणामध्ये रेकॉर्डब्रेक ११ टक्के मतदान झालं असून दुपारच्या सुमारास ही टक्केवारी अधिक वाढण्याची शक्यता आहे.

मनोहरलाल खट्टर चंदीगडहून त्यांचं मतदान असलेल्या त्यांच्या गावी म्हणजेच कर्नाळला ट्रेनने पोहोचले. मात्र, रेल्वे स्थानकावरून त्यांनी मतदारसंघापर्यंत जाण्यासाठी सायकल हातात घेतली तेव्हा सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला! खट्टर यांनी मतदारसंघ सायकलने गाठून आपलं मत दिलं.

भारताची ऑलिम्पिकपटू आणि जिच्यावर दंगल हा चित्रपट आधारलेला आहे, अशा बबिता फोगाटने देखील सकाळीच मतदान केलं. बबिता फोगाट देखील निवडणुकीच्या रिंगणात असून हरयाणाच्या चर्खी दादरी मतदारसंघातून ती निवडणूक लढवते आहे. तिने सकाळी बहीण गीता फोगाट, आई आणि वडिलांसोबत मतदान केलं.

माजी कुस्तीपटू योगेश्वर दत्त याने बडोदा या त्याच्या मतदारसंघात मतदानाचा हक्क बजावला. याच मतदारसंघातून तो निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे. सकाळी साडेआठच्या सुमारास त्याने मतदान केलं.

टिकटॉक स्टार सोनाली सिंग फोगाट हिला सगळेच ओळखतात. सोनालीने देखील हरयाणा निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावला आहे. सोनाली हिसार मतदारसंघात सकाळीच मतदानासाठी पोहोचली. याच मतदारसंघातून सोनाली निवडणूक लढवत आहे.

काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी देखील सकाळीच मतदानाचा हक्क बजावला. कैथल मतदारसंघात सकाळीच त्यांनी सपत्नीक मतदान केलं.

First Published on: October 21, 2019 11:48 AM
Exit mobile version