राज्यात पुन्हा निवडणुका होणार? जयकुमार रावल यांचे संकेत

राज्यात पुन्हा निवडणुका होणार? जयकुमार रावल यांचे संकेत

शिंदखेडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार जयकुमार रावल

महाराष्ट्रात सत्ता स्थापनेच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि भाजप पक्ष यांच्यातील मतभेद टोकाला गेले आहेत. शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडून बसली आहे. मात्र, भाजपने मुख्यमंत्रीपद देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे शिवसेनेने भाजप शिवाय सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. या दाव्यामुळे राष्ट्रावादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्ष शिवसेनेला पाठिंबा देणार असल्याची चर्चा सुरु आहे. याशिवाय शिवसेनेला पाठिंबा द्यायचा का? या मुद्द्यावर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार दिल्लीला गेले आहेत. तर मुख्यमंत्री देखील सत्ता स्थापनेच्या मुद्द्यावर पक्षश्रेष्ठींशी चर्चा करण्यासाठी दिल्लीला गेले आहेत. दरम्यान, शिवसेनेचे नेते आणि राज्यसभेचे खासदार संजय राऊत आज सायंकाळी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेणार आहेत. या सर्व घडामोडी इतक्या जलद गतीने घडत असताना भाजपचे मंत्री जयकुमार रावल यांनी आपल्या कार्यकर्त्यांकडे पुन्हा निवडणूक होण्याची शक्यता असल्याचे बोलून दाखवले आहे. याशिवाय त्यांनी निवडणुकीसाठी तयारी करायला सुरुवात देखील केली असल्याचे बोलले जात आहे.


हेही वाचा – महाराष्ट्रात राजकीय भूकंप होणार? शरद पवार आणि मुख्यमंत्री दिल्लीत


 

जयकुमार रावल यांनी घेतली कार्यकर्त्यांची बैठक

महाराष्ट्रात सध्या मुख्यमंत्री पदासाठी शिवसेना आणि भाजप दोन्ही पक्षांमध्ये रस्सीखेच सुरु आहे. त्यामुळे सत्ता स्थापनेचा पेच कठीण होऊन बसला आहे. दरम्यान, या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भाजपचे मंत्री जयकुमार रावल यांनी धुळ्यातील सर्व भाजप कार्यकर्त्यांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी सर्व कार्यकर्त्यांना विधानसभा निवडणूक पुन्हा होऊ शकते असे बोलून दाखवले आहे. त्यामुळे त्यांनी कार्यकर्त्यांना निवडणुकीसाठी सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत. या निवडणुकीत थोड्या जागा कमी फरकाने हरल्या आहेत. मात्र, या सर्व जागा पुन्हा निवडणूक झाली तर जिंकून दाखवू, असा निर्धार त्यांनी केला आहे. शिवसेनेची ताठर भूमिका कायम राहिल्यास राज्यात पुन्हा निवडणुका होण्याची शक्यता आहे, असे त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले. धुळे जिल्ह्यात पाच मतदारसंघ आहेत. या पाचही मतदारसंघात भाजपने निवडणूक लढवावी, अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. त्यामुळे जर राज्यात पुन्हा निवडणूक झाली तर मोठे यश मिळवून राज्यात पुन्हा देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करु, असे रावल यांनी बैठकीत म्हटले आहे.

First Published on: November 4, 2019 10:08 AM
Exit mobile version