भाजपमध्ये माझे मंत्रिपदही ठरले – नारायण राणे

भाजपमध्ये माझे मंत्रिपदही ठरले – नारायण राणे

नारायण राणे यांच्या भाजपप्रवेशाचे अनेक मुहुर्त आतापर्यंत हुकले. यावर आता नारायण राणे यांनीच एक नवा गौप्यस्फोट केला आहे. “मी स्वतःहून भाजपमध्ये जात नाही. तर भाजप पक्षच मला पक्षात घेण्यास उत्सुक आहे. तसेच माझ्या प्रवेशासोबतच माझे मंत्रिपदही ठरले आहे.”, असे वक्तव्य राणे यांनी पुण्यात आयोजित सातव्या पुणे इंटरनॅशनल लिटररी फेस्टिव्हलमध्ये ‘युवर्स ट्रूली नारायण राणे’ कार्यक्रमात ते बोलत होते. नारायण राणे यांच्या ‘झंझावात’ या आत्मचरित्रपर पुस्तकाच्या निमित्ताने पत्रकार राजू परुळेकर यांनी त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी राणे यांनी शिवसेनेच्या सद्यःस्थितीवर टीका केली.

“उद्धव ठाकरे वगळता कोणत्याही शिवसैनिकाची माझ्याविषयी तक्रार नाही. फक्त उद्धव यांनाच माझ्यात काही चांगले दिसत नाही”, अशी टीका राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी पुण्यात केली. भाजप प्रवेश करतानाही शिवसेना अडसर निर्माण करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

राणे म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे होते तोवर त्यांची पक्षावर पकड होती. ते प्रत्येक कार्यकर्त्याला नावानिशी ओळखायचे. आताची शिवसेना व्यावसायिक झाली आहे. शिवसेनेच्या आमदारांमध्ये वैचारिक नीतिमत्ता उरलेली नाही. मुंबईतून मराठी माणूस हद्दपार होत असताना महापालिकेत टक्केवारी घेऊन कामे केली जात आहेत. पैसे देऊन आमदार, महापौर, नगरसेवक होता येते, हे शिवसैनिकांनाही आता माहिती आहे, त्यामुळे शिवसेनेचा वाघ आता राहिलेला नसून शेळ्या-मेंढ्या झाल्या आहेत.”

First Published on: September 21, 2019 8:59 PM
Exit mobile version