आचारसंहिता रखडल्याने विरोधक धास्तावले

आचारसंहिता रखडल्याने विरोधक धास्तावले

२०१४च्या विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता १२ सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात आली होती. मात्र यंदाच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा अजून झालेली नाही, ही दिरंगाई मात्र विरोधकांना आता अस्वस्थ करू लागली आहे, कारण जेवढे दिवस आचारसंहिता घोषित करण्यास उशीर होईल, तेवढ्या कालावधीत सत्ताधारी मतदारांना भुलवण्यासाठी अधिकाधिक घोषणा करण्याची शक्यता आहे, त्यामुळे विरोधक चांगलेच धस्तावले आहेत.

मागील महिनाभरात झालेल्या मंत्रीमंडळ बैठकांचा आढावा घेतल्यास आतापर्यंत सरकारने ५० हून अधिक निर्णय घेतले आहेत, तर दुसरीकडे मुंबई महानगरपालिकेतही १८०० कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे. याशिवाय चुनाभट्टी ते बीकेसीपर्यंतच्या उड्डाणपुलाचे उद्घाटन घाईघाईत उरकण्यात आले. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते काही दिवसांपूर्वीच मेट्रो भवन आणि मेट्रोच्या विविध कामांच्या उद्घाटनाचा बार उडवून देण्यात आला होता. येत्या काही दिवसांत आचारसंहिता लागू झाली नाही, तर आणखीन काही निर्णय होणे अपेक्षित आहेत. या निर्णयांच्या धूमधडाका लक्षात घेता विरोधकांमध्ये मात्र चिंतेचे वातावरण पसरल्याची माहिती समोर आली आहे.

एकीकडे राज्य सरकारकडून निर्णय, घोषणांचा पाऊस सुरू आहे आणि दुसरीकडे विविध कार्यक्रमांचे देखील आयोजन करत आहे. ज्यासाठी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे लवकरच मुंबईत दाखल होणार असून ते कलम ३७०च्या संदर्भात मुंबईकरांशी संवाद साधणार आहेत. शिवाय शिवसेनेकडून देखील स्थानिक पातळीवर लक्ष केंद्रित केले असून अनेक कामांचे उद्घाटन आचारसंहितेपूर्वी करण्याचे निश्चित केले आहे. एकंदरीत सत्ताधार्‍यांचा हा गेम प्लान लक्षात घेऊन आचारसंहिता लवकरात लवकर लागू करण्याची मागणी आता विरोधकांकडून करण्यात येत आहे.

First Published on: September 21, 2019 2:15 AM
Exit mobile version