पहाटे ५.४७ वाजता हटवली राज्यातली राष्ट्रपती राजवट!

पहाटे ५.४७ वाजता हटवली राज्यातली राष्ट्रपती राजवट!

देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी भल्या सकाळी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबतच अजित पवार यांनी देखील उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि महाराष्ट्रात १२ नोव्हेंबरपासून लागू असलेली राष्ट्रपती राजवट संपुष्टात आल्याचं स्पष्ट झालं. पण राष्ट्रपती राजवटीसारखी महत्त्वाची बाब एका रात्रीत कशी संपुष्टात आली, राष्ट्रपतींची सही कधी झाली, त्याची घोषणा कधी झाली असे बरेच प्रश्न आता उपस्थित केले जाऊ लागले आहेत. आता राष्ट्रपती राजवट संपुष्टात आणल्याचं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचं पत्रच उपलब्ध झालं असून या पत्रानुसार पहाटे ५ वाजून ४७ मिनिटांनी महाराष्ट्रातली राष्ट्रपती राजवट संपुष्टात आली.

राष्ट्रपती राजवट संपुष्टात आल्याचं पत्र

 

राज्यातली राष्ट्रपती राजवट संपुष्टात आणण्याच्या नोटिफिकेशनवर गृहमंत्रालयाचे सचिव अजयकुमार भल्ला यांनी शनिवारी पहाटे ५ वाजून ४७ मिनिटांनी डिजिटल सही केली. या सहीनंतर राष्ट्रपती राजवट संपुष्टात आली. काही उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार जोपर्यंत राष्ट्रपतींची या नोटिफिकेशनच्या पत्रावर सही होत नाही, तोपर्यंत सचिव त्यावर डिजिटल सही करू शकत नाहीत. त्यामुळे पहाटे ५ वाजून ४७ मिनिटांच्या आधीच राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची पत्रावर सही झाल्याचं स्पष्ट झालं आहे.

दरम्यान, शनिवारी राजभवनात राज्यपालांच्या उपस्थितीत देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची तर अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यामुळे संपूर्ण राजकीय क्षेत्रात भूकंप झाल्याने राज्यात नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे. राष्ट्रपती राजवट हटवल्यानंतर मुंबईत सकाळी ८ वाजून ५ मिनिटांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री तर अजित पवार यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ दिली.


हेही वाचा – देवेंद्र फडणवीसांच्या शपथविधीवर उद्धव ठाकरे म्हणाले…
First Published on: November 23, 2019 3:33 PM
Exit mobile version