महाविकासआघाडीचा किमान समान कार्यक्रम अखेर जाहीर!

महाविकासआघाडीचा किमान समान कार्यक्रम अखेर जाहीर!

शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेसच्या आघाडी

गेल्या काही दिवसांपासून भाजपला सत्तेपासून दूर ठेवणाऱ्या शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या महाविकासआघाडीमध्ये नक्की काय किमान समान कार्यक्रम ठरला आहे? कोणत्या मुद्द्यांवर एकमत करून या सर्व पक्षांनी महाविकासआघाडी स्थापन केली? याची चर्चा सुरू होती. अखेर, या तिन्ही पक्षांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन हा किमान समान कार्यक्रम अर्थात कॉमन मिनिमम प्रोग्राममध्ये जाहीर केला. यामध्ये तिन्ही पक्षांनी जाहीर केलेल्या जाहीरनाम्यामधल्या अनेक बाबींचा समावेश करण्यात आला आहे. तसेच, काही वादग्रस्त मुद्दे बाजूला देखील ठेवण्यात आले आहेत.

शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाईल, असं यावेळी स्पष्ट करण्यात आलं. विश्वासदर्शक ठराव झाल्यानंतर आणि मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये कर्जमाफीविषयी प्रक्रिया पूर्ण केली जाईल. त्याविषयी आम्ही तुम्हाला त्याची सविस्तर माहिती नंतर देऊ, असं यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री जयंत पाटील यांनी सांगितलं.

किमान समान कार्यक्रमात अनेक मुद्द्यांचा समावेश

हा किमान समान कार्यक्रम शेतकरी, शेतमजूर, व्यापारी, लघु-मध्यम-मोठे उद्योग, शिक्षण, रोजगार, आरोग्य, सर्व जातीधर्मांना न्याय देण्यावर आधारित असणार आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, समाजवादी पार्टी आणि इतर अपक्ष या आघाडीत आहेत. समाजातल्या सर्व घटकांना हे सरकार आपलं वाटलं पाहिजे, या न्यायाच्या आधारावर तिन्ही पक्षांच्या अध्यक्षांच्या चर्चेतून आणि त्यांच्या सहीनिशी हा कार्यक्रम ठरवण्यात आला आहे, असं यावेळी शिवसेना आमदार एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. यावेळी महिला, शिक्षण, शहर विकास, आरोग्य, उद्योग, सामाजिक न्याय, पर्यटन, कला व संस्कृती अशा क्षेत्रांमध्ये काम करण्याचं या कार्यक्रमामध्ये स्पष्ट करण्यात आलं आहे.

किमान समान कार्यक्रम
किमान समान कार्यक्रम
किमान समान कार्यक्रम
किमान समान कार्यक्रम

दोन समन्वय समित्या!

दरम्यान, या महाविकासआघाडीमध्ये समन्वय साधण्यासाठी दोन समन्वय समित्या असतील, असं देखील स्पष्ट करण्यात आलं आहे. राज्य मंत्रिमंडळात समन्वय साधण्यासाठी एक समिती असेल, तर आघाडीतल्या भागीदार पक्षांमध्ये समन्वय साधण्यासाठी दुसरी समिती काम करेल असं जाहीर करण्यात आलं आहे.

First Published on: November 28, 2019 4:37 PM
Exit mobile version