विधानसभा अध्यक्षपदी नाना पटोले यांची बिनविरोध निवड

विधानसभा अध्यक्षपदी नाना पटोले यांची बिनविरोध निवड

महाराष्ट्र विकास आघाडीने शनिवारी विधानसभेत बहुमताची चाचणी १६९ मतांनी उत्तीर्ण केल्यानंतर आज सभागृहात महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी महाराष्ट्र विकास आघाडीकडून काँग्रेसचे नेते नाना पटोले यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर भाजपकडून ज्येष्ठ नेते किसन कथोरे यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, विधानसभेचे अध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी सत्ताधारी महाराष्ट्र विकास आघाडीच्या नेत्यांचे प्रयत्न सुरु होते. विधानसभेचे हंगामी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांना चहापानसाठी निमंत्रण दिले होते. त्यानुसार देवेंद्र फडणवीस चहापानसाठी गेले. त्यावेळी महाराष्ट्र विकास आघाडीचे नेते आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चा झाली आणि या चर्चेत भाजपने विधानसभेचा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत माघार घेण्याचे ठरवले. त्यामुळे नाना पटोले यांची बिनविरोध अध्यक्षपदी निवड होणार असल्याचे निश्चित झाले आहे. याबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली.


हेही वाचा – राज्याच्या तिजोरीत खडखडाट


 

काय म्हणाले चंद्रकांत पाटील?

‘महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदाची आज निवडणूक आहे. भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ आमदार किसन कथोरे जे प्रचंड मताधिक्क्यांनी म्हणजे १ लाख ७४ हजार ६०१ मतांनी जिंकून झाले आहेत. त्यांना आजच्या विधानसभा अध्यक्षपदाची उमेदवारी भाजपकडून देण्यात आली होती. पण काल रात्रीपासून सत्ताधारी पक्षाच्या सर्वच नेत्यांनी हे आवाहन भारतीय जनता पार्टीला सुरु केले की, महाराष्ट्राची प्रथा, परंपरा अशी आहे की विधानसभा अध्यक्ष वाद विरहीत असले पाहीजेत. त्याची निवडणूक आणि त्यात चुरस नसावी. आज सकाळी सव्वा नऊ ते दहा वाजेच्या दरम्यान सर्व सत्ताधारी पक्षाच्या नेते आणि भाजपचे देवेंद्र फडणवीस आणि मी अशी बैठक झाली. बैठकीत अनेक प्रकारच्या मुद्द्यांवर विचारविनिमय केल्यानंतर महाराष्ट्राची जी खूप चांगली परंपरा आहे की, विधानसभा अध्यक्षाचे पद वादात आणायचे नाही. त्यामुळेच आम्ही किसन कथोरे यांचा अर्ज मागे घेतलेला आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्षाची निवडणूक ही बिनविरोध होईल’, असे चंद्रकांत पाटील पत्रकार परिषदेत म्हणाले.

First Published on: December 1, 2019 10:21 AM
Exit mobile version