अॅक्सिस बँक प्रकरणावरुन काँग्रेस आणि भाजपमध्ये कलगीतुरा

अॅक्सिस बँक प्रकरणावरुन काँग्रेस आणि भाजपमध्ये कलगीतुरा

अॅक्सिस बँक प्रकरणावरुन काँग्रेस आणि भाजपमध्ये कलगीतुरा

पोलीस दलातील अधिकारी-कर्मचाऱ्यांची वेतन खाती अॅक्सिस बँकेकडे वर्ग करण्याच्या सरकारच्या निर्णयावरून सोमवारी काँग्रेस आणि भाजपमध्ये कलगीतुरा रंगला. ‘पोलिसांची पगाराची खाती अॅक्सिस बँकेकडे वर्ग करताना मुख्यमंत्र्यांनी पदाचा दुरूपयोग केला असून मुख्यमंत्र्यांनी तात्काळ पदाचा राजीनामा द्यावा’, अशी मागणी काँग्रेसच्या निवडणूक प्रचार समितीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. तर भाजपने या आरोपाचे खंडन करीत पटोले हे पराकोटीच्या व्यक्तीद्वेषाने पछाडले असल्याची टीका केली. नाना पटोले यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केले.

नेमके काय म्हणाले नाना पटोले?

‘तत्कालीन मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांनी २००५ मध्ये पोलिसांची पगार खाती वर्ग करण्यासंदर्भात काढलेल्या शासन निर्णयात वेगवेगळ्या १५ बँकांची नावे होती. या निर्णयात ही खाती एकट्या अॅक्सिस बँकेत वर्ग करावीत, असे म्हटले नव्हते. मात्र, २०१७ मध्ये फडणवीस यांच्या आदेशाने पोलीस मुख्यालयाकडून एक परिपत्रक काढून पोलिसांचे पगार अॅक्सिस बँकेतून करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासंदर्भात उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली. न्यायालयाने याचिकेचे रूपांतर जनहित याचिकेत केले आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देऊन चौकशीला सामोरे जावे’, असे नाना पटोले म्हणाले.

भाजपने आरोपाचे केले खंडन

मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस या अॅक्सिस बँकेत नोकरीला आहेत. गेल्या पाच वर्षात मुख्यमंत्र्यांनी सत्तेचा दुरूपयोग करून अॅक्सिस बँकेला मदत केली म्हणूनच अमृता फडणवीस यांची बँकेच्या उपाध्यक्षपदी बढती झाली काय? असा सवाल पटोले यांनी केला. दरम्यान, भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी पटोले यांचे आरोप खोडून काढले आहेत. ‘काँग्रेस आघाडीचे सरकार असताना २००५ मध्ये सरकारी अधिकारी-कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करण्यासाठी राष्ट्रीयकृत तसेच खासगी बँकांशी करार करण्यात आला. यात अॅक्सिस बँकेचाही समावेश आहे. या बँकेकडे पोलीस विभागाचीच नव्हे तर अन्य शासकीय विभागांची खाती असून ती फडणवीस मुख्यमंत्री होण्यापूर्वी पासूनच आहेत’, असे स्पष्टीकरण उपाध्ये यांनी दिले आहे.


हेही वाचा – पृथ्वीराज चव्हाण यांना धक्का; कराडमधील शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश

First Published on: September 23, 2019 9:51 PM
Exit mobile version