आदित्य ठाकरेंच्या विरोधात राष्ट्रवादीच्या आदिती नलावडे वरळीच्या मैदानात

आदित्य ठाकरेंच्या विरोधात राष्ट्रवादीच्या आदिती नलावडे वरळीच्या मैदानात

शिवसेनेकडून युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचे नाव वरळी विधानसभेसाठी जाहीर झाल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही युवा उमेदवार देण्याची तयारी सुरु झाली आहे. राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या मुंबई संघटक आदिती नलावडे या वरळी विधानसभा लढविणार असल्याची माहिती राष्ट्रवादीच्या सूत्रांकडून मिळत आहे. आदित्य ठाकरे यांच्याप्रमाणेच त्या उच्चशिक्षित आहेत. तसेच त्या स्वतः वरळीतच राहत असल्यामुळे त्यांचा स्थानिकांशी चांगला जनसंपर्क आहे. सचिन अहिर यांनी राष्ट्रवादीतर्फे वरळीचे प्रतिनिधित्व केले होते. मात्र २०१४ साली शिवसेनेच्या सुनील शिंदे यांनी त्यांचा पराभव केला होता. आता आदिती नलावडे या पुन्हा एकदा हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे आणण्यासाठी सज्ज झाल्या आहेत.

कोण आहेत आदिती नलावडे?

खासदार सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये युवती संघटनेची स्थापना केल्यापासून आदिती त्यामध्ये सक्रीय आहेत. मुंबईतील अनेक प्रश्नांवर त्यांनी आजवर पक्षातर्फे आंदोलन केलेले आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी पक्षाने त्यांच्याकडे डिजिटल प्रचाराची जबाबदारी दिली होती. उद्धव ठाकरे यांनी मागच्यावर्षी शरद पवार यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर आदिती नलावडे यांनी थेट मातोश्री गाठत ठाकरेंना प्रतिकात्मक वाघ भेट म्हणून देण्याचे आंदोलन केले होते. त्यावेळी मातोश्रीवर जाऊन आंदोलन केल्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा झाली होती.

 

वरळी विधानसभेसाठी राष्ट्रवादीकडून बहुजन रिपब्लिकन सोशॅलिस्ट पार्टीचे नेते अॅड. सुरेश माने यांना उमेदवारी दिली जाईल, अशीही चर्चा होती. वरळी विधानसभेत बीडीडी चाळ येथे बौद्ध मतदार मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे सुरेश माने यांना मतांचा लाभ होऊ शकतो असा कयास राष्ट्रवादीने बांधला असण्याची शक्यता होती. मात्र पक्षाकडून अद्याप कोणतेही अधिकृत नाव समोर आलेले नाही.

First Published on: October 2, 2019 7:38 PM
Exit mobile version