‘…तर शिवसेनेचं स्वागतच’, भाजपची नवी खेळी!

‘…तर शिवसेनेचं स्वागतच’, भाजपची नवी खेळी!

एकीकडे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली असतानाच आता सत्तास्थापनेसाठी सर्वच पक्ष पुन्हा एकदा प्रयत्न करताना दिसत आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मुंबईत दाखल झाले असून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांशी वायबी सेंटरमध्ये बैठकीत चर्चा सुरू केली आहे. या बैठकीत आघाडीला सत्तेच्या समान वाटपाची अपेक्षा अर्थात ५०-५० चाच फॉर्म्युला अपेक्षित असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, त्याचवेळी आता भाजपकडून नवी खेळी खेळली जात आहे. ‘जर शिवसेनेचं मतपरिवर्तन झालं, सर सत्तास्थापनेसाठी भाजप त्यांचं स्वागतच करेल’, अशी भूमिका भाजपचे ज्येष्ठ नेते आणि खासदार गिरीश बापट यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे, शिवसेना आणि काँग्रेस-राष्ट्रवादीची महाआघाडी यांच्यातल्या चर्चेमध्ये भाजपने नवं पिल्लू सोडून दिल्याचं बोललं जात आहे.

भाजपशी फारकत घेतल्यानंतर शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या पाठिंब्यावर सरकार स्थापन करणार असल्याचं ठामपणे सांगितलं जात होतं. त्याच आधारावर शिवसेनेची नेतेमंडळी माध्यमांमध्ये वक्तव्य देखील करत होती. मात्र, शिवसेनेचं शिष्टमंडळ राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा करायला गेलं असताना देखील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं पाठिंब्याचं पत्र पाठवलंच नाही. त्यामुळे शिवसेनेचा दावा राज्यपालांनी स्वीकारला नाही. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसला राज्यपालांनी दिलेलं आमंत्रणही राष्ट्रवादीला पूर्ण करता आलं नाही. त्यामुळे अखेर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. मात्र, या सगळ्या प्रकरणामध्ये भाजप कुठेही चित्रात नव्हता. पण गिरीश बापट यांच्या वक्तव्यामुळे भाजप पुन्हा एकदा चर्चेत आला असून अजूनही भाजपच राज्यातला सर्वात मोठा पक्ष असल्याची जाणीव गिरीश बापट यांच्या या वक्तव्याने इतर पक्षीयांना करून दिली आहे.


हेही वाचा – शरद पवारांचा एक फोन आणि सोनिया गांधींचे घुमजाव!

नक्की काय म्हणाले गिरीश बापट?

यावेळी गिरीश बापट यांनी राष्ट्रपती राजवटीचं खापर शिवसेना आणि काँग्रेस-राष्ट्रवादीवर फोडलं आहे. ‘राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होण्यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच जबाबदार आहे. त्यांच्यामुळेच राज्यावर ही परिस्थिथी ओढवली आहे. पण जर शिवसेनेचं मतपरिवर्तन झालं, तर भाजप त्यांचं स्वागतच करेल. याचा निर्णय पक्षातली राज्यातली नेतेमंडळी घेतीलच. पण शिवसेनेशी आमचा तसा काही वाद नाहीये. आमचे विचार एकच आहेत. त्यांचं मतपरिवर्तन झालं, तर भाजप त्यांचं स्वागतच करेल’, असं बापट यांनी यावेळी बोलताना नमूद केलं. दरम्यान, एकीकडे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या गोटात चर्चा सुरू असतानाच दुसरीकडे भाजपची देखील कोअर कमिटीची बैठक ७ वाजता होणार असून या बैठकीत सत्तास्थापनेसंदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे.

First Published on: November 12, 2019 6:36 PM
Exit mobile version