‘राज्यात भाजपचंच सरकार’, आमदारांच्या बैठकीत फडणवीसांचं वक्तव्य!

‘राज्यात भाजपचंच सरकार’, आमदारांच्या बैठकीत फडणवीसांचं वक्तव्य!

एकीकडे शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर सरकार स्थापन करण्यासाठी वाटाघाटी करत असतानाच भाजपच्या विजयी आमदारांच्या बैठकीमध्ये माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र ‘राज्यात भाजपचंच सरकार येणार’, असा निर्धार व्यक्त केला आहे. त्यामुळे आता भाजपकडून कोणती नवी खेळी खेळली जाणार? याविषयी राजकीय वर्तुळात चर्चा होऊ लागली आहे. ‘आमदारांनो, तुम्ही चिंता करू नका, शेतकऱ्यांना जाऊन सांगा की आम्ही तुमच्यासोबत आहोत. एक तर भाजपसोबत किंवा भाजपचंच सरकार राज्यात येणार’, असं देखील देवेंद्र फडणवीस यांनी आमदारांच्या बैठकीत म्हटल्याचं खात्रीलायक सूत्रांनी सांगितलं आहे.

भाजपनं देखील कसली कंबर?

मुंबईतल्या वसंतस्मृती कार्यालयामध्ये भाजपच्या सर्व १०५ नवनिर्वाचित आमदारांची बैठक आज संध्याकाळी पार पडली. या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी सर्व आमदारांना मार्गदर्शन केलं. यावेळी ‘राज्यात भाजपशिवाय सरकार स्थापन होऊ शकणार नाही. सत्ता स्थापन करायची, तेव्हा तुम्हाला सगळ्यांना बोलवून घेऊ. पण आत्ता शेतकऱ्यांना भेटून त्यांना विश्वास द्या की आम्ही तुमच्यासोबत आहोत’, असं देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित आमदारांना सांगितल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. ‘या निवडणुकीत भाजपला प्रत्येक विभागात चांगले यश असून, भाजपमुळेच मित्रपक्षांच्या जागा अधिक आल्या. भाजपचे नेते शिवसेनेच्या अनेक मतदारसंघात गेले. पण शिवसेनेचा नेता भाजप उमेदवारांच्या मतदारसंघात प्रचाराला आला नाही’, अशी खंत देखील फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केली. त्या पार्श्वभूमीवर आता सत्तास्थापनेसाठी भाजप देखील आपली चाल खेळणार असल्याचं चित्र निर्माण झालं आहे.


हेही वाचा – महाशिवआघाडीची बैठक संपली, सत्तास्थापनेचा ‘ड्राफ्ट’ तयार!

दरम्यान, शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादी असे राज्यात दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर असलेल्या पक्षांचे आमदार एका बाजूला झालेले असताना भाजप नक्की कशाच्या जोरावर सत्तास्थापनेचा निर्धार व्यक्त करत आहे, याची चर्चा आता सुरू झाली आहे. फक्त १०५ आमदार हाताशी असताना उरलेल्या ४० आमदारांचा पाठिंबा भाजप या तिन्ही पक्षांशिवाय मिळवू शकणार नाही हे वास्तव आहे. त्यामुळे यापैकीच कुठल्या पक्षामधले आमदार फोडण्याचा भाजप प्रयत्न करण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे.

First Published on: November 14, 2019 10:27 PM
Exit mobile version