प्रवेश दिला तरी राणेंच्या वाट्याला फक्त एकच जागा

प्रवेश दिला तरी राणेंच्या वाट्याला फक्त एकच जागा

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे हे आपला पक्ष भाजपमध्ये विलीन करणार, अशी चर्चा सुरू आहे. मात्र काही केल्या राणेंचा भाजपमध्ये प्रवेश होईना! नारायण राणेंना आपला पक्ष भाजपमध्ये विलीन करायचा झाल्यास त्यांना भाजपने समोर ठेवलेली अट मान्य करावी लागणार आहे. नारायण राणे आणि मुख्यमंत्र्यामध्ये काही दिवसांपूर्वी चर्चा झाली असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राणेंना पक्षात घेण्यास ग्रीन सिग्नल दाखवला आहे. मात्र, तरीही त्यांनी राणेंसमोर काही अटी ठेवल्या आहेत. यामध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये राणेंच्या वाट्याला एकच म्हणजे त्यांचे चिरंजीव आमदार नितेश राणे ज्या कणकवली मतदारसंघात आमदार आहेत ती एकच जागा भाजप राणेंना सोडणार असल्याचे महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या एका वरिष्ठ नेत्याने खासगीत बोलताना सांगितले.


हेही वाचा – भाजप प्रवेश लांबणीवर; नारायण राणेंच्या कार्यकर्त्यांमध्ये चलबिचल


 

येत्या दोन दिवसांत राणेंच्या प्रवेशाची शक्यता

दरम्यान, खात्रीलायक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राणेंचा भाजप प्रवेश हा निश्चित झाला असून, येत्या दोन दिवसांत नारायण राणे हे आपल्या दोन्ही मुलांसह भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. यासाठी नारायण राणे यांनी मंगळवारी आपल्या सर्व कार्यकर्त्यांना मुंबईत बोलावले आहे. रंगशारदा येथे मेळाव्याचे आयोजन देखील करण्यात आले आहे. युती झाली तरी राणेंना भाजप प्रवेश देणार असल्याचे आश्वासन राणेंना मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे नारायण राणे यांनी बोलताना सांगितले आहे.


हेही वाचा – ..भाजपसोबत जाणं ही शिवसेनेची चूक होती – संजय राऊत


 

…म्हणून युती झाली तरी राणेंना भाजपात प्रवेश

भाजप-शिवसेना युती ही अंतिम टप्प्यात असून, युतीचा फॉर्म्युला देखील निश्चित झाला आहे. या फॉर्म्युल्यानुसार भाजप कणकवली मतदारसंघात आपला उमेदवार उभा करणार आहे. कुडाळ मालवण आणि सावंतवाडी हे दोन मतदार संघ शिवसेनेला सोडणार आहे. तसेच कणकवली-देवगड वैभववाडी मतदारसंघाचे नितेश राणे हे आमदार असून, भाजपाकडून नितेश राणे यांना तिकीट देण्यात येणार असल्याचे देखील सांगण्यात येत आहे. शिवसेनेला तसाही कणकवली मतदारसंघात रस नसून, भाजपने कणकवलीची जागा कुणाला सोडावी हा भाजपचा प्रश्न असल्याचे शिवसेनेच्या एका नेत्याने खासगीत बोलताना सांगितले. पण आमचे कुडाळ-मालवण आणि सावंतवाडी हे मतदारनारासंघ आम्ही कुणाला सोडणार नाही असे देखील या नेत्याने सांगितले.

अजून तारीख आणि वेळ ठरली नाही. जेव्हा ठरेल तेव्हा मी सर्वांना कळवीन. पण माझ्या प्रवेशामुळे युती भक्कम होईल. युती होवो किव्हा न होवो माझा प्रवेश नक्की होईल.
-नारायण राणे, अध्यक्ष, महाराष्ट्र्र स्वाभिमान पक्ष
First Published on: September 23, 2019 7:42 PM
Exit mobile version