सर आली धावून

सर आली धावून

यावर्षी पाऊस काही ऐकत नाही. नुसता बरसतोय अगदी सत्ताधारी आणि विरोधकांसारखा.राजकारणात तरी निवडणुकांचा हंगाम असतो.कुठे ,कधी ,कोणावर बरसायचं हे ठरलेलं असतं.परंतु,पाऊस काही ऐकत नाही. अनेक दिवस पावसानं नुसतं दु:ख दिलं आणि नुकसानच केलं होतं.परंतु,हा पाऊस एके दिवशी कोणाचं भलं करेल किंवा कोणाच्या पारड्यात सहानुभूती पडेल याची कल्पना नव्हती.आधी सत्ताधार्‍यांना जोरदार यश मिळालेल्या भागात पाऊस देखील जोरदार बरसला होता,त्यामुळे सर्व काही आलबेल या सत्ताधार्‍यांच्या दाव्याला पावसाने पार धुवून टाकले होते.ऐन निवडणुकीत देखील हा पाऊस पाठ सोडत नव्हता.अनेक राजे महाराजे आणि शहांनी आपल्या सभा रद्द केल्या होत्या.त्यामुळे गेल्या 5 महिन्यांपासून जनतेसह राजकारण्यांना धुवून टाकणारा पाऊस अजून काय करणार या कडे सर्वांचे लक्ष लागले होते.सर्वांत बिकट स्थिती तर घड्याळकरांची होती.आधीच टाईम खराब त्यात सत्ताधार्‍यांनी संपूर्ण पक्षच साफ केला होता.

हे नुकसान पावसाच्या नुकसानापेक्षा कमी नव्हतं.त्यात महत्वाचं म्हणजे राज्यातील राजगादीवरच सत्ताधार्‍यांनी कब्जा केल्याने पाऊस ,भन्नाट वारा त्यात आता मोठी वीज कोसळली होती.त्यामुळे ‘पॉवर’बाज सायबांसाठी कठीण टाईम होता.त्या दिवशी देखील सायबांची सभा होती.याआधी सतावणारा पाऊस पुन्हा एकदा आला.पाऊस मोठा खुशीत होता.पुन्हा एकदा मोठ्या नेत्याची सभा उधळायची गंमतच काही और असे म्हणत तो जोरात बरसू लागला.पण पावसाला कुठे माहित होतं,सायबांनी राजकारणात अनेक पावसाळे बघितले आहेत.सायबांनी टाईम साधला.आता नाही मागे हटायचं.नाउमेद झालेल्या कार्यकर्त्यांना पुन्हा संजीवनी देण्यासाठी आपल्या सुकलेला शिवारात नवं बीज रोवण्यासाठी याच पावसाचा वापर करण्याचं सायबांनी ठरवलं.

या वयातही साहेब पावसात ठाम उभे राहून भाषण केले,आणि बघता बघता मीडिया,सोशल मीडियावर सायबांबद्दलच्या आपुलकीची तुफान लाट आली.गेल्या अनेक दिवसांच्या झाडाला आता पालवी आली होती. सायबांच्या स्ट्रगलला आणि त्यांच्या इच्छाशक्तीला दाद मिळाली होती. सायबांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर पावसाचं टायमिंग जरी चुकलं असलं तरी सायबांच्या घड्याळाने आपले काम केले आहे. आता झाड मोठ करून त्याला सत्तेची फळे कधी येतील याचा विचार मात्र पक्षाचे उमेदवार करत आहेत.

First Published on: October 20, 2019 5:36 AM
Exit mobile version