राज ठाकरेंची पुण्यातली सभा अखेर रद्दच!

राज ठाकरेंची पुण्यातली सभा अखेर रद्दच!

मनसे प्रमुख राज ठाकरे

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून पुण्यातून विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराचं बिगुल वाजवणार होते. मात्र, नमनालाच घडाभर तेल पडावं, त्याप्रमाणे राज ठाकरेंची पहिलीच सभा रद्द झाली आहे. पुण्यामध्ये गेल्या २४ तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे ही सभा रद्द करावी लागली आहे. त्यामुळे पुण्यातील मनसे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसोबतच राज ठाकरेंची सभा ऐकण्यासाठी जमा झालेल्या पुणेकरांचा देखील हिरमोड झाला आहे. आता उद्या म्हणजेच १० तारखेला मुंबईच्या वांद्रे आणि गोरेगावमध्ये राज ठाकरेंच्या २ सभा होणार आहेत. त्याशिवाय पुण्यामध्ये देखील राज ठाकरेंच्या अजून दोन सभा होणार आहेत. त्यामुळे किमान तेव्हाच्या सभा तरी व्हायला हव्यात, अशी अपेक्षा स्थानिक मनसे कार्यकर्ते व्यक्त करताना दिसत आहेत.

अनेक प्रश्न अजूनही अनुत्तरीतच!

ईडी प्रकरण झाल्यापासून राज ठाकरे माध्यमांपासून लांब होते. त्यांनी या सगळ्या प्रकारावर कोणतीही जाहीर प्रतिक्रिया दिलेली नव्हीत. त्यासोबतच, मनसेचा निवडणुका लढण्याचा निर्णय, त्यानंतर काही ठिकाणी राष्ट्रवादी किंवा काँग्रेसच्या उमेदवारांना दिलेला किंवा त्यांचा घेतलेला पाठिंबा यावर देखील राज ठाकरेंनी भूमिका स्पष्ट केलेली नाही. नुकतेच मनसेचे फायरब्रॅण्ड नेते नितीन नांदगावकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यावेळी देखील त्यांनी राज ठाकरेंच्या आसपासच्या नेत्यांवर आक्षेप घेतला होता. या सगळ्या प्रकारावर मनसे कार्यकर्ते आणि मतदारांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. या सगळ्याबद्दल ९ तारखेच्या सभेमध्ये राज ठाकरे बोलणार असल्याचं बोललं जात होतं. मात्र, ही सभा पावसाच्या पाण्यात वाहून गेल्यामुळे हे सर्व प्रश्न अजूनही अनुत्तरीतच आहेत.

दरम्यान, वरून तुफान पाऊस पडत असताना देखील अनेक नागरिक बसायच्या खुर्च्या डोक्यावर घेऊन उभे होते. तसेच, काही कार्यकर्त्यांनी डोक्यावर ताडपत्री देखील धरली होती. कोणत्याही परिस्थितीत राज ठाकरेंना ऐकण्याच्या तयारीनेच तिथे लोक जमा झाले होते. मात्र, पावसाने या सगळ्यांचा मोठा हिरमोड केल्याचंच दिसून येत आहे.

First Published on: October 9, 2019 6:54 PM
Exit mobile version