राजेसाहेबांची ‘स्पेस’ थियरी

राजेसाहेबांची ‘स्पेस’ थियरी

गडावरून राजेसाहेब खाली उतरले. खाली बाळाजी आणि देशपांडे आणि साहेबांच्या प्रधान नेते मंडळातील काहीजण थांबले होते. डोळ्यांवरील चष्म्याला थोडंस सावरत साहेबांनी बाळाजींना विचारलं, काय बाळाजी? हवा काय म्हणते? नाही, साहेब सत्तेचा विचार करायलाच नको, गेले दोन महिने शहेनशाह सत्ताधारी गड वाचवण्याचा काटेकोर प्रयत्न करत आहे,आता दोन दोन यात्रा काढून त्यांनी आपली ताकद प्रचंड वाढवली आहे. सगळीकडे फक्त त्यांचीच चर्चा आहे. त्यामुळे गडावर आपला झेंडा फडकवणे थोडं कठीणचं वाटतंय यावेळी, बाळाजींनी पक्की माहिती दिली. आणि हो साहेब, थोडा वेळ आपले सैनिक देखील संभ्रमात होते. गनिमाने रणशिंग फुंकले तरी आपली साधी शिट्टी वाजली नसल्याची दबक्या आवाजात चर्चा करत होते. त्यामुळे…देशपांडेंनी मान खाली घालत आपले म्हणणे मांडले.

सायबांच्या लढाईची सुरुवात मुळी विरोधातून झाली होती. दुय्यम वागणूक,अपमान अशा भावनेतून राजेसायबांनी आपली फौज उभी केली होती. गेली अनेक वर्षे ते लढत आले होते. पक्ष स्थापन केल्यापासून नवनव्या क्लृप्ती करून गड जिंकण्याचा प्रयत्न केला होता. शत्रूपक्ष एकमेकांच्या हातात हात आणि गळ्यात गळे घालून गड काबिज करत असताना राजेसाहेब एकट्याच्या जीवावर रणांगणात जिंकण्याचे स्वप्न बाळगून होते. एक हाती सत्तेची त्यांना आकांक्षा होती. सुरुवातीला त्यांना आशेचा किरण दिसला देखील, परंतु, काही काळाने त्यांचा एक एक सैनिक पसार होऊ लागला. शत्रूपक्षात मनसबदारी मिळण्याच्या इच्छेपोटी त्यांनी राजेसाहेबांची फौज सोडली. त्यानंतर शत्रूपक्ष अधिकच बळकट होत गेला. आता मात्र राजेसाहेबांना अस्तित्वाची लढाई लढावी लागणार होती. त्यासाठीच त्यांनी आज ही बैठक बोलावली होती.

बाळाजी, सत्ताधारी जर मजबूत आहेत. पण तुम्हाला कोण तगडा विरोधक दिसतो आहे का? राजेसाहेबांनी प्रश्न केला. सर्वांनी एकसुरात नाही म्हटले. राजेसाहेबांसमवेत सर्वांचे डोळे चमकले. ते आता जरा भूतकाळात गेले. याआधीच्या लढाईत स्वत:ची कुमक वापरून त्यांनी शत्रूचा शत्रू तो आपला मित्र असं म्हणत त्यांनी एकेकाळच्या विरोधकांना देखील मदत करून बघितली. परंतु,त्यात देखील त्यांच्या मित्रपक्षांचा सुपडा साफ झाला होता. शत्रूचा विजय आणि विरोधकांची असहायता यात शत्रूच्या विजयापेक्षा विरोधकांच्या असहायतेत त्यांना आता संधी दिसून आली होती. तुम्हाला स्पेस दिसतेय ना? तीच आपली आता दिशा असेल, कणखर विरोधक होऊया, त्यासाठी कामाला लागा, राजेसाहेबांनी आदेश दिला.

(अंथरूण पाहून पाय पसरायचे हे आता राजेसाहेबांना कळले होते. दुबळ्याला मारून त्याची जागा घेऊन त्यानंतर सत्ताधार्‍यांकडे पाहता येते याचे आकलन त्यांना एव्हाना झाले होते.)

First Published on: October 12, 2019 5:33 AM
Exit mobile version