कांदा निर्यात थांबवून शेतकर्‍यांची कोंडी

कांदा निर्यात थांबवून शेतकर्‍यांची कोंडी

लढाई न करता श्रेय घेणार्‍या मोदी-शहा जोडगोळीने कांदा निर्यात थांबवून शेतकर्‍यांच्या घरात दिवाळीसाठी जाणारा पैसा रोखला आहे, असा घणाघाती आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी येथे काल गुरुवारी (दि.१७) केला.बागलाण विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आघाडीच्या उमेदवार दीपिका संजय चव्हाण यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते. पवार म्हणाले, नाशिक जिल्हा द्राक्ष, डाळिंबाबरोबर कांद्याचे माहेरघर समजला जातो. येथील शेतकरी पूर्णत: शेतीवर अवलंबून आहे. सद्यस्थितीत शेतकरी अडचणीवर मात करून दिवस काढतो आहे. आमच्या सरकारने कांदा चाळीचे अनुदान देऊन शेतकर्‍यांचा मातीमोल विकला जाणारा कांदा साठवणुकीसाठी अनुदान देऊन व्यवस्था केली. मात्र, भाजप शासन कांदा साठवणुकीवर निर्बंध आणण्याच्या तयारीत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकाळात बाजारपेठा खुल्या करून द्राक्ष व डाळिंबासाठी राष्ट्रीय बाजारपेठ मिळवून दिली. उद्योग वाढविण्यासाठी प्रोत्साहन दिले; मात्र भाजपच्या कार्यकाळात हजारो कारखाने बंद पडून लाखो कामगार बेरोजगार झाले आहेत. अर्थव्यवस्था खिळखिळी झाल्याने शेतकरी कर्जबाजारी होत आहेत. कर्जमाफीच्या नावाने सरकारने शेतकर्‍यांना फसवले आहे. आमच्या काळात सरकारने सरसकट कर्जमाफी दिली आणि या सरकारने कर्जमाफीचे नुसतेच गाजर दाखवले आहे. माझ्या सरकारच्या काळातही शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या, तथापि आम्ही त्यांना वार्‍यावर सोडले नाही. त्यामागील कारणे शोधली आणि उपाययोजना केल्या.

याप्रसंगी सभेचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार, ज.ल. पाटील, धर्मराज खैरनार, यशवंत पाटील, किशोर कदम, शैलेश सूर्यवंशी, उमेदवार दीपिका चव्हाण यांची भाषणे झाली. सभेप्रसंगी शेतकरी संघटनेचे माजी प्रांताध्यक्ष रामचंद्र बापू पाटील, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष साखरचंद कांकरिया, नगरसेवक राहुल पाटील, विधायक कार्य समितीचे विजय पाटील, माजी नगरसेवक राजेंद्र सोनवणे, युवक काँग्रेसचे सचिन कोठावदे, विजय वाघ, अ‍ॅड. रेखा शिंदे, प्रल्हाद पाटील, जिल्हा परिषद बांधकाम सभापती यतीन पगार, माजी आमदार संजय चव्हाण, माजी नगराध्यक्ष पांडुरंग सोनवणे, धनसिंग वाघ, खेमराज कोर, मनोज सोनवणे, राकेश सोनवणे, दीपक सोनवणे आदी उपस्थित होते.

पराक्रम सैन्यांचा, श्रेय मोदींचे
इंदिरा गांधी पंतप्रधान असताना भारतीय सैन्याने पाकिस्तानवर विजय मिळवला होता. मात्र, इंदिराजींनी त्याचे श्रेय सैनिकांना दिले. आज सैनिकांच्या पराक्रमाचे श्रेय पंतप्रधान मोदी घेत आहेत. इंदू मिलच्या ठिकाणावर बाबासाहेबांचे स्मारक झाले नाही. शिवाजी महाराजांच्या नावाने प्रचार करतात; मात्र त्यांच्या स्मारकासाठी अरबी समुद्रात एक वीटही रचलेली नाही, असा आरोप शरद पवार यांनी यावेळी केला. यावर्षी जास्तीत-जास्त जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस- काँग्रेस आघाडीला निवडून द्यावे, असे आवाहनही पवार यांनी केले.

First Published on: October 18, 2019 1:41 AM
Exit mobile version