वांद्य्रात शिवसेनेची डोकेदुखी वाढली

वांद्य्रात शिवसेनेची डोकेदुखी वाढली

मुंबईसह महाराष्ट्राचे लक्ष लागून रहिलेल्या वांद्रे पूर्व येथील प्रचार सध्या अंतिम टप्य्यात आला आहे. याठिकाणी शिवसेनेकडून महापौर विश्वनाथ महाडेश्वर हे सध्या नशीब अजामवित आहेत. मात्र गेल्या काही दिवसांपासून त्यांच्याकडून करण्यात आलेल्या वादग्रस्त विधानांमुळे आणि फेरीवाल्यांच्या प्रश्न न सुटल्यामुळे येथील स्थानिकांमध्ये त्यांच्याविरोधात नाराजी पसरली असून या नाराजीमुळे शिवसेनेची डोकेदुखी वाढलेली दिसून येत आहे. या अगोदरच याठिकाणी शिवसेनेला तृप्ती सावंत यांच्या निमित्ताने बंडखोरीला सामोरे जावे लागत असून अगोदरच चिंतेत असलेल्या शिवसेनेच्या टेन्शनमध्ये आता नवी भर पडली आहे. भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांकडून तृप्ती सावंत यांना छुपा पाठींबा दर्शविला असल्याने सेनेसमोर नवी अडचण निर्माण झाल्याचे चित्र पहायला मिळत असल्याने येथील लढत आता आणखीन चुरशीची होणार हे मात्र नक्की.

अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा मतदानासाठी आता प्रचाराची रणधुमाळी अंतिम टप्यात आली असून मुंबईतील प्रमुख लढतींकडे मुंबईकरांचे लक्ष लागून राहिले आहे. यात प्रामुख्याने मुंबईकरांचे लक्ष वांद्रे पूर्व या मतदारसंघावर लागून राहिले आहे. यंदा या मतदारसंघात सध्या मुंबईचे प्रथम नागरिक महापौर विश्वनाथ महाडेश्वर हे निवडणुकीच्या रिंगणात उभे राहिले आहे. शिवसेनेसाठी महत्वाची समजली जाणारी ‘मातोश्री’ याच मतदासंघात येत असून यंदा याच मतदारसंघात शिवसेनेकडून बंडखोरी झाल्याने ही लढत शिवसेनेसाठी प्रतिष्ठेची झालेली आहे. याठिकाणी शिवसेनेचे विद्यमान आमदार तृप्ती सावंत या बंडखोरी केली आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून या मतदारसंघात भावनिक मुद्दा गाजत असताना आता प्रचाराचा वेग अंतिम टप्प्यात आलेली आहे.

त्यातच काही दिवसांपूर्वी विश्वनाथ महाडेश्वर यांचा गोळीबार नगर येथील एक वादग्रस्त व्हिडीओ पुन्हा एकदा व्हायरल झाल्याचे दिसून आले आहे. त्यातच काही दिवसांपूर्वी त्यांच्याकडून उद्घाटन करण्यात आलेल्या व्हीएन देसाई रुग्णालयातील अतिदक्षता विभाग पुन्हा एकदा बंद झाल्याचा मुद्दा या मतदासंघात चांगलाच गाजत आहे. त्याशिवाय या विभागात फेरीवाल्यांची संख्या मोठ्या संख्येने असल्याने याठिकाणी विरोधकांनी याच मुद्यावरुन प्रचारात आघाडी घेतल्याचे समजते. त्यातच यंदा वांद्रे परिसरात देखील पावसाळ्यात नालेसफाईचा मुद्दा ऐरणीवर आला होता. तर काही ठिकाणी यंदा पाणी भरल्याच्या घटना देखील घडल्या होता. त्यामुळे स्थानिकांनी याविरोधात तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केलेली आहे.

दरम्यान, याठिकाणी काँग्रेसकडून काँग्रेसचे माजी आमदार बाबा सिद्दकी यांचे पुत्र झिशान सिद्दकी हे देखील निवडणुकीच्या रिंगणात उभे राहिले असल्याने त्यांचे देखील तगडे आवाहन शिवसेनेसमोर असणार आहे. त्यात दिवंगत बाळा सावंत यांचे कार्य लक्षात घेता तृप्ती सावंत यांनी देखील मैदानात उडी मारल्याने शिवसेनेविरोधात जवळपास सर्वच विरोधकांनी साम-दाम-दंड भेद अशी रणनिती वापरण्यास सुरुवात केली आहे. मनसेकडून याठिकाणी जोरदार शक्तीप्रदर्शन केले जात आहे. राज ठाकरेंकडून मुंबईतील पहिली सभा याच मतदारसंघात आयोजित केली होती. एकीकडे दिग्गज नेत्यांची फळी याठिकाणाहून मतदाराच्या रिंगणात उभे राहिलेली असताना मनसेकडून मात्र याठिकाणी तरुण चेहर्‍याला म्हणजेचे अखिल चित्र यांना उमेदवारी दिली आहे.

First Published on: October 19, 2019 5:35 AM
Exit mobile version