पॉवरफुल साहेबांचा विक पॉईंट

पॉवरफुल साहेबांचा विक पॉईंट

ते आले, त्यांनी पाहिलं, त्यांनी विचारलं, कुठे काळा रंग तर नाही ना ?
नाही साहेब, तुम्ही यायचा आधी, सर्व चोख बंदोबस्त ठेवला आहे.
काळा रंग औषधाला देखील बाकी नाही, हे बघा घड्याळ देखील मी पांढर्‍या पट्ट्याचं वापरतोय, आणि कार्यकर्त्यांना देखील सूचना दिल्या आहेत,एम साहेब हळूच बोलले.
आणि ते काही जण टक्कल करून का आलेत?
माझा निषेध तर नोंदवायला आले नाहीत ना? साहेबांनी शंका उपस्थित केली.
नाही साहेब ते काळा विग घालून आलेले.
तपासून सर्वांचे वीग काढून घेतले, खबरदारी म्हणूून.
आणि हो, जाताना सर्वांनी आपापले वीग ओळखून घेऊन जा,अशी तंबी देखील दिली आहे, बाजूला बसलेले चंदू दादा हळूच म्हणाले. ठीक आहे,आणि आजूबाजूची घरे तपासली का? साहेबांनी पुन्हा संशयाने विचारले.
हो तपासली आहेत ना? आजूबाजूंच्या घरांतील सर्व काळ्या वस्तू घरात टाकून कुलूप लावून चावी कार्यकर्त्यांनी आपल्या ताब्यात घेतल्या आहेत,आणि हो अंगणातील म्हशी देखील दावणीला बांधूनच ठेवायला सांगितल्या आहेत, गिरीशभाऊ उत्तरले.
(साहेब दूरवर नजर फिरवत)
आणि तो कोपर्‍यात बसलाय तो???
तो आपला निष्ठावंत कार्यकर्ता आहे साहेब, दादा पुन्हा उत्तरले.
ओके, ओके, मग बसू द्या त्याला त्याच्या कॉलरचा काळा रंग दिसतोय मला.
(त्या कार्यकर्त्याला थोडं सरकवण्यात आल्यानंतर)
अरे, तो माणूस पिशवीत तिकडे काय घेऊन बसलाय? साहेब हबकलेच.
नाही साहेब, तो कचोरीवाला आहे, त्याच्या आशेने तर एवढी गर्दी जमलीय.
ठीक आहे, मला वाटलं…???
नाही साहेब, त्या कांद्यावाल्या आंदोलकांना आम्ही कधीच कोसो दूर ठेवलंय.
ठीक आहे, म्हणत साहेबांनी भाषण सुरू केले.
(साहेबांनी तासभर आपल्या पक्षाने कशी आंदोलने,निदर्शने करून जनतेची बाजू मांडली,कसा संघर्ष केला यावर जोरदार भाषण दिले.साहेबांचा हेलिकॉप्टरपर्यंतचा जाण्याच्या रस्त्यावर चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.ऊन येणार नाही आणि काळी सावली देखील पडणार नाही,याची खबरदारी देखील घेण्यात आली होती.)

First Published on: September 21, 2019 2:10 AM
Exit mobile version