स्टाईल है स्टाईल

स्टाईल है स्टाईल

महालातून राजे सकाळीच बाहेर पडले.आज राजेंच्या प्रचारासाठी प्रधान येणार होते.बहुदा राजाला प्रधान सल्ला देत असतो त्याच्या अधिपत्याखाली काम करत असतो,परंतु,इथे राजांच्या युद्धात प्रधानांचीच मुख्य भूमिका होती.लोकशाहीत हे असंच हे स्वत:राज्यांना देखील मान्य होतं.तसं राज्यात राजेंचं चांगलं वजन होतं.सुरूवातीला त्यांचे धाकले बंधू सोडले तर राजेंना कट्टर प्रतिस्पर्धी असा कोण नव्हता.त्यामुळे देशहितवादी पक्षात राहून राजांनी निवडणूक लढवली.राज्यांना त्यात यश देखील आलं.परंतु,गादी पेक्षा सत्ता गादी महत्वाची असते हे राजांना कळून चुकलं होतं.त्यात धाकल्या बंधुराजांनी सत्ताधारी पक्षाचे फुल हाती घेतल्याने राज्यातील चढाओढीच्या राजकारणात आपण ‘फुल’ ठरू नये म्हणून राजांनी मेन मंत्री सायबांची भेट घेतली.त्यामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ तर उडणारच होती.अनेकांनी राजांची समजूत काढली.

पण राजगादी आणि सत्तागादी यांच्यातील फरक राजांना पहिल्यापासूनच समजत आला होता.त्यामुळे आपण नेहमी कसे कोणत्याही पक्षाशी संबंधीत नाही,याची स्पष्टोक्ती राजे देत असत.तसं म्हटलं तर राजे कसेबसे 5 वर्षे विरोधी पक्षात राहिले होते.परंतु,आता त्यांना ‘काय बाय सांगू कसं गं सांगू’असंच झालं होतं.त्यामुळे एके दिवशी राजेंनी खासदारकीची गादी सोडून पुन्हा रणांगणावर जायचा निर्णय घेतला.यावेळी मात्र सैनिक निराळे होते.गादी तीच मिळवायची होती,फक्त आता सैन्य बदललं होतं. समोरच्या राज्यातील प्रधानसेवकाने आता जवळजवळ पुर्ण देश काबिज केला होता.त्यामुळे त्याच्या साथीने का होईना आपली सत्तागादी तरी राखता येईल अशी राजांना विश्वास होता.त्यामुळे अखेर राजांनी आपल्या सैनिकांना घेऊन समोरच्या राज्याशी हातमिळवणी केली.त्यामुळे आता खुद्द प्रधानांना राजेंचा गड वाचवण्यासाठी पाचारण करण्यात आले होते.

प्रधानांनी नेहमीप्रमाणे आपल्या शैलीत तुफान तोफखाना विरोधकांवर डागला.राजेंना पण जोश आला.राजेंचा एक फेमस डायलॉग आहे.एक बार मैने कमिटमेंट कर दी ,तो मै खुद कीं भी नहीं सुनता…याच कमिटमेंटवर राजेंना विजय मिळाला होत.परंतु,सत्ताधार्‍यांकडून राजेंना विकासाची कमिटमेंट मिळाल्यामुळे राजे आता नवी कमिटमेंट घेऊन रयतेसमोर आले आहेत.शेवटी राजा हा लोकप्रिय असतोच. इतके दिवस जनतेने राजांना ‘ ही तर राजांची स्टाईल है स्टाईल है’म्हणत सांभाळून घेतले आहे.त्यामुळे राजांची कॉलर आतापर्यंत ताट आहे.फक्त राजांनी आपली कमिटमेंट विसरू नये किंवा सत्ताधार्‍यांना त्यांची कमिटमेंट पण विसरायला देऊ नये.

First Published on: October 18, 2019 5:39 AM
Exit mobile version