भाजप सरकार आरएसएसच्या इशार्‍यावर काम करते

भाजप सरकार आरएसएसच्या इशार्‍यावर काम करते

आपल्या देशाची लोकशाही धोक्यात आलेली आहे. भारताचे संविधान धोक्यात आलेले आहे. संपूर्ण भारत देश आरएसएस चालवत आहे, आरएसएसच्या इशार्‍यावर भाजप सरकार काम करत आहे. भाजप सरकारचे रिपोर्ट कार्ड संसदेच्या आधी आरएसएसच्या प्रमुखांकडे सादर केले जाते. मतदानाची ताकद वाढवून लोकशाही वाचविण्याची खरी वेळ आलेली असल्याची टीका बुधवारी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी मुंबईत केली.

मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी वरील टीका केली. यावेळी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड, उपाध्यक्ष आणि माजी आमदार चरण सिंग सप्रा, उपाध्यक्ष कुंवर सिंग राजपूत उपस्थित होते. यावेळी बोलताना अशोक गेहलोत म्हणाले की, काँग्रेसने ७० वर्षे आपल्या भारत देशात लोकशाही टिकवून ठेवली. देशाच्या तुकडे होऊ दिले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः राष्ट्रवादाचा मुखवटा घालून विरोधी पक्षांना देशद्रोही ठरवत आहेत. नरेंद्र मोदी आपल्या जवानांच्या शौर्याचे आणि बलिदानाचे तसेच शास्त्रज्ञाच्या कार्याचे स्वतःसाठी भांडवल करतात.

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये भाजप सरकार त्यांच्या जाहीरनाम्यातील वचनांबद्दल, त्यांच्या योजनांबद्दल, ध्येय धोरणांबद्दल, अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी काय करणार या गंभीर मुद्द्यांवर काहीच बोलत नाही आहे. फक्त भावनिक मुद्द्यांवर बोलत आहे. भाजप सरकार नेहमीच जुने भावनिक मुद्दे बाहेर काढून निवडणूक जिंकत आलेली असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

First Published on: October 17, 2019 5:35 AM
Exit mobile version