सत्तेसाठी शिवसेनेला आठवडाभर वेटिंग

सत्तेसाठी शिवसेनेला आठवडाभर वेटिंग

फोटो - पॉलिटिकल समाचार

विधानसभा निवडणुकीनंतर कोणताही राजकीय पक्ष सरकार स्थापू न शकल्याने राज्यात सध्या राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस हे आता सत्ता स्थापन करण्याच्या दिशेने पाऊल टाकत असले तरी काँग्रेसच्या दिल्लीतील हायकमांडने अजूनही या आघाडीला हिरवा कंदील दिलेेला नाही. त्यामुळे शिवसेनेला आठवडाभर तरी वाट पहावी लागणार असल्याचे खात्रीलायक सुत्रांनी सांगितले. राज्यातील काँग्रेसचे नेते शिवसेनेसोबत जाण्यास इच्छुक असले तरीही राहुल गांधी, सोनिया गांधी आणि प्रियांका गांधी काही प्रश्नांवर अडून आहेत. जोपर्यंत ते प्रश्न सुटत नाहीत तोपर्यंत दिल्लीतून होकार मिळणार नाही, असे खात्रीलायक सुत्रांनी सांगितले.

आधी पाठिंबा कोण देणार यावरही एकमत होईना
शिवसेनेला पहिला पाठिंबा कोण देणार यावरून देखील सध्या काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये बोलणी सुरू आहेत. काँग्रेस हायकमांड, राष्ट्रवादी काँग्रेसला तुम्ही राज्यात सर्वाधिक जागा जिंकल्या असल्याने तुम्हीच आधी पाठिंबा द्या, मग आम्ही देतो असे सांगत आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे म्हणणे आहे की, आघाडीमध्ये मोठा भाऊ काँग्रेस आहे. त्यामुळे काँग्रेसने आधी पाठिंबा द्यावा. या दोन्ही पक्षांचे ‘पहले कौन’ हे ठरत नाही तोवर पुढची बोलणी देखील होत नसल्याचे खात्रीलायक सुत्रांनी सांगितले.

हायकमांड राज्यातील काँग्रेस पक्ष नेतृत्वावर नाराज?
काँग्रेस हायकमांड सध्या राज्यातील नेतृत्वावर नाराज आहे. राज्यात आघाडी असताना राष्ट्रवादी काँग्रेसला राज्यपाल बोलावतात,मात्र त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते काँग्रेसला काहीच न सांगता जातात. तरीदेखील दुसर्‍या दिवशी काँग्रेसचे नेते महाशिवआघाडीच्या बैठकीला बसतात. यावरून सध्या दिल्ली हायकमांड प्रचंड चिडले असल्याचीही माहिती मिळत आहे.

हायकमांड अजूनही तळ्यात मळ्यात                                                                                            काँग्रेसचे राज्यातील नेते जरी सध्या शिवसेनेसोबत सरकारमध्ये बसण्यास उत्सुक असले तरी हायकमांड मात्र अजूनही तळ्यात-मळ्यात आहेत. काँग्रेसला देशात राजकारण करायचे आहे. शिवसेनेसोबत गेल्यास त्याचा इतर राज्यातील काँग्रेसवर काय परिणाम होऊ शकतो. काँग्रेसचा इतर राज्यातील मतदार या निर्णयामुळे नाराज होण्याची भीती सध्या काँग्रेस हायकमांडला आहे. त्यामुळेच सध्यातरी काँग्रेस हायकमांड ‘वेट अँड वॉच’च्या भूमिकेत असल्याचे कळते. सोमवारी सोनिया गांधी आणि शरद पवार यांच्यात दिल्लीत बैठक होणार असून या बैठकीत जर काही गोष्टींवर सकारात्मक चर्चा झाली तरच राज्यात महाशिवआघाडी अस्तित्वात येईल, असे सुत्रांनी सांगितले. २०२० मध्ये दिल्ली, झारखंड, बिहारमध्ये निवडणुका होत असून, त्याचा देखील विचार केला जाणार आहे.

उद्धव ठाकरेही सोनिया गांधींना भेटणार
शरद पवार आणि सोनिया गांधी यांची भेट झाल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेही दिल्लीत जाऊन सोनिया गांधी यांची भेट घेणार असल्याची माहिती मिळत आहे. या सर्व घडामोडीला अजून आठवडा तरी जाईल. हे सर्व बघता सत्ता स्थापन करण्यासाठी शिवसेनेला अजून आठवडाभर तरी काँग्रेसच्या निर्णयाची वाट बघण्याखेरीज पर्याय नाही.

First Published on: November 18, 2019 5:36 AM
Exit mobile version