‘पवार म्हणतात, सूडाचं राजकारण; २००० साली त्यांनी काय केलं?’ – उद्धव ठाकरे

‘पवार म्हणतात, सूडाचं राजकारण; २००० साली त्यांनी काय केलं?’ – उद्धव ठाकरे

विधानसभा निवडणुका अवध्या ३ आठवड्यांवर आलेल्या असताना शिवसेनेच्या दसरा मेळाव्यामध्ये पक्ष अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी आगामी निवडणुकांमध्ये शिवसेनेची वाटचाल कशी असेल, याविषयी भूमिका मांडली. ‘ज्यांना जागावाटपामध्ये जागा मिळाल्या नाहीत, त्यांची मी माफी मागतो’, असं म्हणत त्यांनी युतीमुळे होणाऱ्या बंडखोरीला आळा घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचवेळी शरद पवारांच्या ईडी प्रकरणावरून त्यांनी टोमणा लगावला. ‘शरद पवार आत्ता म्हणतायत की सत्ताधारी ईडीची कारवाई करून सूडाचं राजकारण करत आहे. मग २००० साली त्यांनी तरी काय केलं होतं?’ असा उलट सवाल करत उद्धव ठाकरेंनी शरद पवारांना सुनावलं आहे. दरम्यान, ‘सामना वाचा, म्हणजे तुम्हीही वाचाल’, असा टोला देखील उद्धव ठाकरेंनी यावेळी लगावला.

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

‘शरद पवार ईडीसमोर गेले, त्यांनी लढाई केली आणि ईडी घाबरली. नक्की काय मला माहीत नाही. सूडानं राजकारण केलं जातंय असा दावा केला. असेलही आणि नसेलही. पण जर सूडाचं राजकारण कुणी इथे करत असेल, तर ते मोडून काढल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही’, असं उद्धव ठाकरे म्हणाले. मात्र, ‘शरद पवार आज म्हणतायत सूडाचं राजकारण. पण २००० साली तुम्ही बाळासाहेबांवर खटला टाकून काय केलं होतं. महाराष्ट्र ८ दिवस पेटता का ठेवला?’ असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला. ‘शरद पवार, सामना नेहमी वाचाल, तर तुम्हीही वाचाल २००० साली सामनामधला एक अग्रलेख शोधून काढला आणि गुन्हा दाखल केला. तुम्ही ईडीसमोर न बोलावता गेला असाल, पण तेव्हा स्वत: बाळासाहेब ठाकरे सुद्धा कोर्टासमोर हजर झाले होते. तेव्हा तुम्ही ती तांत्रिक अटक दाखवली. तेव्हा कोर्टानं ती केस रद्द केली. आता तुम्ही आम्हाला सांगताय, की सूडाचं राजकारण केलं जातंय?’, असं देखील उद्धव ठाकरे म्हणाले.

‘अजित पवार म्हणतात शेती करणार, पण धरणात पाणी नसेल तर काय करणार?’

दरम्यान, यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी अजित पवार यांच्यावर देखील तोंडसुख घेतलं. ‘आत्तापर्यंत मगरीच्या डोळ्यांत अश्रू हे पाहिलं होतं. पाहिलं पहिल्यांदा. म्हणे राजकारणाचा स्तर खालावलाय. आता मी शेती करणार. पण धरणात पाणी नसेल, तेव्हा काय करणार? जेव्हा आमचा शेतकरी डोळ्यांत पाणी घेऊन धरणात पाणी नाही हे सांगायला आला होता, तेव्हा तुम्ही ऐकलं नाही. तुमच्या कर्मानं तुमच्या डोळ्यांत पाणी आलं आहे. जे शस्त्र तुम्ही शिवसेनेवर उगारलं होतं, तेच शस्त्र आज तुमच्यावर आलंय’, अशा शब्दांत त्यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली.


वाचा उद्धव ठाकरेंच्या भाषणातील सविस्तर मुद्दे!

First Published on: October 8, 2019 9:02 PM
Exit mobile version