भ्रष्टाचाराच्या विविध प्रकरणांत अजून काही मंत्र्यांची माहिती मागविली – अजित पवार

भ्रष्टाचाराच्या विविध प्रकरणांत अजून काही मंत्र्यांची माहिती मागविली – अजित पवार

नागपूरः शिंदे-फडणवीस सरकारमधील अजून काही मंत्र्यांचे भ्रष्टाचार समोर आले आहेत. याबाबत कागदपत्रे मागविली आहेत. संपूर्ण माहिती मिळाल्यानंतरच विरोधीपक्षाची भूमिका सभागृहात मांडली जाईल, असे विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी मंगळवारी सांगितले.

ते म्हणाले, शिंदे-फडणवीस सरकारमधील काही मंत्र्यांनी भ्रष्टाचार केल्याचे समोर आले. त्यांच्यावर न्यायालयाने ताशेरे ओढले आहेत. गायरान जमीन असो किंवा एनआयटीचा मुद्दा असो या प्रकरणात मंत्र्यांनी भ्रष्टाचार केला व त्याची कागदपत्रे समोर आली. त्यामुळेच आम्ही त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. अजून काही मंत्र्यांनी भ्रष्टाचार केल्याच्या बातम्या वर्तमानपत्रात आल्या आहेत. त्याची माहिती मी मागवली आहे. त्याची कागदपत्रे मिळणार आहेत. अधिकृत माहिती मिळाल्याशिवाय मी त्यांच्याविषयी भूमिका मांडणार नाही, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.

पुराव्यांशिवाय माझ्यासारख्या व्यक्तिने बोलणे योग्य नाही. मला माहिती मिळणार आहे. माहिती मिळाल्यानंतर मी बोलणारच आहे. तसेच केवळ शिंदे गटाच्या मंत्र्यांवरच भ्रष्टाचाराचा आरोप आम्ही करत आहोत असे नाही. ज्या मंत्र्याने भ्रष्टाचार केला आहे, मग तो शिंदे गटाचा असो किंवा भाजपचा त्याच्यावर कारवाईची मागणी केली जाईल, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.

पुढे ते म्हणाले, सिल्लोड कार्यक्रमासाठी निधी गोळा केला जात असल्याची माहिती मिळाली आहे. काही अधिकाऱ्यांना त्याचा नाहक त्रासही होत आहे. काही अधिकाऱ्यांनी याबाबतची नाराजीही माझ्याकडे बोलून दाखवली. त्यानुसार हा मुद्दा सभागृहात उपस्थित करण्यात आला. उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत ठोस कारवाईचे आश्वासनही दिले आहे. त्यामुळे हातात पुरावे असले तरच कारवाईची मागणी केली जाईल, असे अजित पवार यांनी सांगितले.

मी कधीही म्हणालो नाही की बाॅम्बस्फोट करणार आहे. जे म्हणाले बाॅम्बस्फोट करणार त्यांना जाऊन याबाबत प्रश्न विचारा, मी याचे उत्तर देऊ शकत नाही, असेही अजित पवार यांनी सांगितले.

सीमा भागातील मराठी माणसाला न्याय देणारा ठराव सरकारने आणायला हवा. सीमा भाग केंद्र शासीत करावा यासाठी केंद्र सरकार सहकार्य करेल का हे तपासावे लागेल. कारण हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. त्यामुळे केंद्र सरकारचे सहकार्य किती मिळेल हे बघावे लागेल, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.

First Published on: December 27, 2022 10:19 AM
Exit mobile version