हाफकीनमधील संशोधकांना प्रोत्साहन देण्यासाठी बैठक- नीलम गोऱ्हे

हाफकीनमधील संशोधकांना प्रोत्साहन देण्यासाठी बैठक- नीलम गोऱ्हे

नागपूरः हाफकिनमधील संशोधकांना प्रोत्साहन देण्यासाठी पुढच्या महिन्यात एका बैठकीचे आयोजन केले जाईल. हाफकिनमधील पायाभूत सुविधांसाठी व तेथील संशोधनासाठी नेमके काय करता येईल यावर बैठकीत चर्चा केली जाईल, अशी माहिती विधानपरिषद सभापती निलम गोऱ्हे यांनी मंगळवारी दिली.

त्या म्हणाल्या, अनेक संशोधक हाफकिनमधून निघून गेले आहेत. त्यांचे काम हे संशोधनाचे आहे. मात्र त्यांच्याकडून प्रशासकीय कामे करुन घेतली जातात. संशोधन करणे हे त्यांचे मुख्य काम आहे. त्याऐवजी त्यांना प्रशासकीय कामे दिली जातात. अनेक संशोधकांनी खासगीत बोलून दाखवलं आहे की, सरकार काहींचे हित जपत असते, असे सभापती गोऱ्हे यांनी सांगितले.

राज्य शासनाकडून हाफकिनमधील संशोधकांचा सन्मान केला जाईल, अशी मला आशा आहे. तेथील संशोधक हे विविध संशोधन करु शकतात. त्यामुळे त्यांना सहकार्य करायल हवे, असेही सभापती गोऱ्हे यांनी सांगितले.

हाफकिनकडून औषधांची खरेदी होत नाही. त्यामुळे सरकारी रुग्णालयात औषधांची कमतरता निर्माण होते, असा मुद्दा आमदार प्रविण दटके यांनी उपस्थित केला. त्यावर मंत्री गिरीष महाजन यांनी उत्तर दिले. ते म्हणाले, हाफकिनकडून खरेदी होत नाही हे सत्य आहे. अनेक अडचणी आहेत. मात्र हाफकिनचे खरे काम हे संशोधनाचे आहे. त्यामुळे ही संस्था वाचविण्याचे काम आपण करणार आहोत. यावर पर्याय म्हणून औषध खरेदीसाठी महामंडळाची स्थापना केली जाणार आहे. त्यासाठी नियमावली तयार करण्याचे काम सुरु आहे. तोपर्यंत रेट कंत्राटाद्वारे औषधे खरेदी केली जाणार आहे, असे मंत्री महाजन यांनी स्पष्ट केले.

औषधांचे दर हे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे असतात. त्यामध्ये एकसमानता आणण्यासाठी जिल्हाधिकारी यांना रेट कंत्राटाद्वारे औषधे करण्यास सांगितले आहे. मात्र औषध खरेदीसाठी भविष्यात स्वतंत्र यंत्रणा स्थापन केली जाईल व त्याचे काम सध्या सुरु आहे, अशी माहिती मंत्री महाजन यांनी विधानपरिषदेत दिली. त्यावर सभापती गोऱ्हे यांनी हाफकिनमधील संशोधकांचा मुद्दा उपस्थित करुन त्यांचा मानसन्मान करण्याची आशा व्यक्त केली.

First Published on: December 27, 2022 2:42 PM
Exit mobile version