आनंदाचा शिधा नेमका कोणासाठी होता?; खडसेंनी घेरले सरकारला

आनंदाचा शिधा नेमका कोणासाठी होता?; खडसेंनी घेरले सरकारला

नागपूरः दिवाळीत शिंदे-फडणवीस सरकारने राबवलेली आनंदाचा शिधा ही योजना नेमकी कोणासाठी होती, जनतेसाठी की ठेकेदारासाठी, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी बुधवारी विधान परिषदेत केला.

ते म्हणाले, या योजनेचे नियोजन चार महिने आधी सुरु झाले नव्हते. मी माहितीच्या अधिकारात माहिती मिळवली आहे. एका ठेकेदाराच्या डोक्यात ही कल्पना आली. त्याने ती सरकारला सांगितली. ही योजना अशा प्रकारे समजवण्यात आली की ती तत्काळ मान्य करण्यात आली. कारण ही योजना गरीबांसाठी होती. एक महिनाआधी या योजनेचे नियोजन सुरु झाले. माझी माहिती चुकीचीही असेल. पण फाईली काढून तपासा नेमकी ही योजना कशी आली, असा दावा खडसे यांनी केला,

ही योजना राबविण्यासाठी तत्काळ टेंडर मागविण्यात आले. हे टेंडर कोणाला मिळाले, का मिळाले याचा शोध घ्या, अशी मागणीही खडसे यांनी केली. पुढे ते म्हणाले, ही योजना किती नागरिकांपर्यंत पोहोचली याच्या खोलात मी जाणार नाही. पण त्याचा दर्जा होता का हे तपासले का तुम्ही.

मी नियोजन मंत्री होतो. कोणतीही योजना राबवायची असेल तर खालपासून वरपर्यंत आकडेवारी येते. किती वस्तू लागणार आहे. किती तरतुद करावी लागणार आहे, याचा तपशील येतो. आनंदाचा शिधा योजना राबविताना हे सर्व झाले का हे तपासा असे आवाहनही खडसे यांनी केले.

First Published on: December 21, 2022 11:09 PM
Exit mobile version