ग्रामीण भागात शाळा व महाविद्यालयांच्या वेळेत एसटी धावणार; शंभूराज देसाई

ग्रामीण भागात शाळा व महाविद्यालयांच्या वेळेत एसटी धावणार; शंभूराज देसाई

नागपूरः ग्रामीण भागात शाळा व महाविद्यालयांच्या वेळेत एसटी धावेल, अशी घोषणा मंत्री शंभूराज देसाई यांनी विधानपरिषेद बुधवारी केली. याच्या सूचना आजच सर्व आगारांना देण्यात येतील, असे मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले.

ते म्हणाले, शाळा व महाविद्यालयांच्या वेळेत एसटी धावावी यासाठी वेळेचे नियोजन केले जाईल. विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेतली जाईल. तशा सुचनाच सर्व आगारांना आजच दिल्या जातील. जर कोणता आगार याची अंमलबजावणी करत नसल्यास त्याची तक्रार करावी. ही तक्रार करण्यासाठी हेल्पलाईन तयार केली जाईल. जर कोणता अधिकारी शाळा व महाविद्यालयाच्या वेळेत एसटीचे नियाेजन करणार नाही. विद्यार्थ्यांना याचा त्रास झाला तर त्या अधिकाऱ्यावर कारवाई केली जाईल, असे शंभूराज देसाई यांनी स्पष्ट केले आहे.

एसटी महामंडळ दोन हजार ईलेक्ट्रीक बसेस घेणार आहे. या बसेसचा वापर राज्यभर केला जाणार आहे, अशी माहिती मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. मात्र शहरी भागात वापरलेल्या एसटी नंतर ग्रामीण भागात दिल्या जातात. कोकणाला तर वापरलेल्याच गाड्या दिल्या जातात. त्यामुळे नवीन एसटी देताना शहरी व ग्रामीण असा भेदभाव करु नये, अशी मागणी आमदार अनिकेत तटकरे यांनी केली. नवीन एसटी देताना शहर व ग्रामीण असा भेदभाव केला जाणार नाही, अशी ग्वाही मंत्री देसाई यांनी दिली.

बहुतांश ग्रामीण भागात महाविद्यालय व शाळा ह्या शहरात असतात. त्यांच्या वेळेत एसटी धावत नाही. याचा नाहक त्रास विद्यार्थ्यांना होतो. त्यामुळे शाळा व महाविद्यालयाच्या वेळेत एसटी धावावी, अशी मागणी आमदार जयंत आसगावकर यांनी केली. आमदार शशिकांत शिंदे यांनी या मुद्द्याला पाठिंबा दिला. त्यावर मंत्री देसाई यांनी वरील खुलासा केला.

ईलेक्ट्रीक बस घेतल्या तर त्याचे चार्जिंग कुठे करणार असा मुद्दा आमदार राजेश राठोड यांनी उपस्थित केला. त्यावर मंत्री देसाई म्हणाले, ईलेक्ट्रीक बस घेताना त्यासाठी १७० चार्जींन स्टेशन उभारले जाणार आहे. ईलेक्ट्रीक बसेस येईपर्यंत चार्जिंग स्टेशन उभारण्याचे काम सुरु केले जाणार आहे.

First Published on: December 28, 2022 12:41 PM
Exit mobile version