‘त्या’ ४२ जणांच्या कुटुंबियांना १५ लाखाची मदत द्या – अजित पवार

‘त्या’ ४२ जणांच्या कुटुंबियांना १५ लाखाची मदत द्या – अजित पवार

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार

वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत पावलेल्या लोकांना जसे १५ लाखाची मदत दिली जाणार आहे तशीच मदत सरकारने आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना व मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या ४२ जणांच्या कुटुंबियांना १५ लाखाची मदत द्यावी, अशी मागणी विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी सभागृहात केली. अजित पवार म्हणाले की, मराठा विधेयक सभागृहात मंजुर करण्यात आले. त्याचे स्वागतही केले परंतु राज्याचे प्रमुख सभागृहात आहेत. याच सभागृहामध्ये वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शब्द दिला होता. अवनीच्या हल्ल्यात मृत झाले त्यांना १० ते १५ लाखाचे अर्थसाह्य देण्याचा निर्णय घेण्यात आला आणि वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात जनावरांचा मृत्यू झाल्यास त्यांची भरपाई ६० हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे.

नेमकं काय म्हणाले पवार?

काल जसा मराठा विधेयक मंजुर करण्यात आले. सकल मराठा समाजाने ५८ मोर्चे काढले. परंतु हे सगळं करत असताना ४२ जणांनी आपला जीव गमावला. जर वन्यप्राण्यांनी माणसाला मारले तर १५ लाख रुपये देता. तसे त्या ४२ जणांच्या कुटुंबांना प्रत्येकी १५ लाखाची मदत दया. मोर्चे काढल्यामुळे १५ हजार तरुणांवर गुन्हे दाखल झाले आहेत. ते गुन्हे मागे घ्यावे आणि विषय संपवून टाकावा. प्रत्येक जिल्हयात वसतीगृहाचा मुद्दा तात्काळ सोडवावा. विधेयकाचा प्रश्न संपला परंतु हे काही विषय आहेत त्याकडे सरकारने तात्काळ लक्ष दयावा अशी मागणीही अजित पवार यांनी केली. मराठा आंदोलनामध्ये ज्याच्या घरातील कर्ती व्यक्ती गेली त्याच्या घरातील एकाला नोकरी दयावी. सरकारला हे करणं कठिण नाही. यालाच अनुसरुन राज्यातील जे शेतकरी आत्महत्या करतात त्यांच्या कुटुंबाला सरकार फक्त एक लाख रुपये देते. खरंतर शेतकऱ्यांनी आत्महत्या करु नये, त्यांनी आत्महत्या करु नये म्हणून त्यांची कर्जमाफी असेल किंवा आधारभूत किंमत दीडपट असेल तिही दिली पाहिजे असेही अजित पवार म्हणाले.

First Published on: November 30, 2018 4:53 PM
Exit mobile version