अन गोटेंनी खडसेंसमोर चक्क हात जोडले

अन गोटेंनी खडसेंसमोर चक्क हात जोडले

भाजप आमदार अनिल गोटेंनी माजी मंत्री एकनाथ खडसेंसमोर चक्क हात जोडले

भाजपचे धुळ्यातील आमदार अनिल गोटे गेल्या काही दिवसांपासून भाजपवर नाराज आहेत. “हिवाळी अधिवेशनादरम्यान मी राजीनामा देणार” अशी राणा भीमदेवी थाटात त्यांनी घोषणा केली होती. मात्र आज अचानक त्यांनी आपल्या निर्णयावर युटर्न घेतला. त्यानंतर आज विधीमंडळ परिसरात त्यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री आणि त्यांच्यासारखेच स्वपक्षाविरोधात बंड केलेल्या एकनाथ खडसेंची भेट घेतली. यावेळी दोघांनीही स्मितहास्य करत हस्तांदोलनही केले. यादरम्यान खडसे असे काही बोलले की अनिल गोटे यांनी चक्क खडसेंसमोर हातच जोडले. पक्षाची नाराजी ओढवूनही पक्षाला नमवण्यात यशस्वी झालेल्या गोटेंना खडसेंनी कोणता कानमंत्र दिला? याची चर्चा मात्र या पुर्ण अधिवेशनात कानोकानी होईल, हे मात्र खरे.

धुळे मनपा निवडणुकीमुळे गोटे नाराज

धुळे महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर अनिल गोटे पक्षावर भलतेच नाराज झाले होते. मनपा निवडणुका स्वतःच्या नेतृत्वाखाली लढल्या जाव्यात आणि गुंडाना पक्षात प्रवेश देऊ नये या मागण्यांसाठी ते आग्रही होते. मात्र निवडणुकीच्या तोंडावर धुळ्यातील गटबाजी उफाळून आली आणि गोटे एकाकी पडताना दिसले. संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी तर थेट पत्रकार परिषद घेऊन गोटे यांचा तेलगी प्रकरणात कसा संबंध होता? हे माध्यमांसमोर सांगितले. दोन्ह नेत्यांमुळे पक्षाचीच बदनामी होत असल्याचे लक्षात येताच आज अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय संरक्षणमंत्री सुभाष भामरे आणि अनिल गोटे यांच्यात समेट घडवून आणत त्यांच्यातील वाद शमवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर राजीनामा देणार नसल्याचे गोटे यांनी सांगितले.

धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीचे सर्वाधिकार मला दिले आहेत. त्यामुळे मी राजीनामा देणार नाही, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर गोटे यांनी आपलं महानगरकडे दिली.

खान्देशातील भाजपचे दोन नेते एकमेकांशी हस्तांदोलन करताना

खान्देशावर नेमके वर्चस्व कोणाचे?

खान्देशात भाजपचे चांगले वजन असले तरी अंतर्गत बंडाळीचा मोठा धोका पक्षाला सतावतो आहे. एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन या दोन मंत्र्यामधला वाद आता जगजाहीर आहे. गिरीष महाजन यांचे खान्देशातील प्रस्थ वाढत असल्याचे इतर नेत्यांना दिसत आहे. खडसे आणि महाजन वादात खडसे एकाकी पडलेले दिसले. मात्र आता गोटे यांच्या रुपाने खडसे पक्षाला धडा शिकवत आहेत का? अशी चर्चा दबक्या आवाजात भाजपात रंगली आहे.

First Published on: November 19, 2018 5:37 PM
Exit mobile version