राजदंड शोभेची वस्तु होऊन बसली आहे – आव्हाड

राजदंड शोभेची वस्तु होऊन बसली आहे – आव्हाड

आमदार जितेंद्र आव्हाड

विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनामध्ये सध्या आरक्षणाचा मुद्दा गाजत आहे. मुस्लिम आरक्षणाच्या मुद्यावरून आक्रमक  झालेले आमदार अबू आझमी, आसिफ शेख, अमीन पटेल, अस्लम शेख, अब्दुल सत्तार यांनी अध्यक्षांचा राजदंड पळवण्याचा प्रयत्न केला. त्यावरून सभागृहात गदारोळ उडाल्यानंतर सभागृहाचं कामकाज दोन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. यावेळी आमदारांनी अध्यक्षांच्या दिशेनं कागद देखील भिरकावले. यावेळी एमआयएमचे आमदार वारिस पठाण यांनी आम्ही सेलिब्रेशनसाठी केव्हा तयार राहायाचे हे देखील सांगा? असा सवाल देखील मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी केला. दरम्यान, या मुद्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी संताप व्यक्त केला आहे. सभागृहात वारंवार राजदंड उचलला जातो तरी सभागृह चालूच ठेवले जाते. मी अध्यक्षांना पत्र दिले आहे की, मला राजदंड घरी नेण्याची परवानगी द्या. राजदंड एक सन्मानचिन्ह आहे. राजदंड नसतानाही कामकाज सुरू ठेवले जाते. राजदंड शोभेची वस्तू होऊन बसली आहे. यापूर्वी हे कधीच झाले नव्हते. हा लोकशाहीचा अपमान आहे. अशा शब्दात जितेंद्र आव्हाडांनी सरकारला लक्ष्य केलं आहे. यापूर्वी देखील अनेक मुद्यांवरून अधिवेशनामध्ये राजदंड पळवण्याचा प्रयत्न झालेला आहे. त्यात आता मुस्लिम आरक्षणाच्या मुद्यावरून आक्रमक होत सहा आमदारांनी राजदंड पळवण्याचा प्रयत्न केला आहे.
मराठा समाजाला आरक्षण देणार असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्यानंतर आता धनगर आणि मुस्लिम समाजाची मागणी देखील जोर धरू लागली आहे. विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनामध्ये देखील हा मुद्दा चर्चिला गेला. त्यावरून आक्रमक झालेल्या आमदारांनी राजदंड पळवण्याचा प्रयत्न केला. त्यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सरकारला लक्ष्य केलं आहे.
First Published on: November 20, 2018 3:15 PM
Exit mobile version