हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढवा; विरोधकांची राज्यपालांकडे मागणी

हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढवा; विरोधकांची राज्यपालांकडे मागणी

प्रातिनिधिक फोटो

हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजाचा कालावधी वाढवावा, या मागणीसाठी विरोधी पक्षाच्या शिष्टमंडळाने आज राज्यपाल सी. विद्यासागर राव यांची भेट घेऊन निवेदन दिले. अधिवेशनाचा कालावधी वाढवण्याबाबत सरकारला निर्देश द्यावेत, अशी मागणीही या शिष्टमंडळाने केली. हिवाळी अधिवेशनाचा कालावधी ठरवताना सरकारने केवळ अवघ्या ९ दिवसांचे वेळापत्रक तयार केले आहे. हा कालावधी विरोधी पक्षांना मान्य नाही. याबाबत कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीतही विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आणि धनंजय मुंडे यांनी राज्यातील दुष्काळाच्या गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर तसेच इतरही महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा करण्यास पुरेसा वेळ मिळावा, यासाठी अधिवेशनाचा कालावधी एक आठवड्याने वाढवावा, अशी मागणी केलेली होती. मात्र सरकारने अवघ्या नऊ दिवसांचे कामकाज निश्चित करुन अधिवेशन संपवण्याचा घाट घातला आहे. त्यामुळे आता राज्यपालांनी यात हस्तक्षेप करावा, अशी मागणी घेऊन दोन्ही विरोधी पक्षनेत्यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने राज्यपालांशी सविस्तर चर्चा केली.

हेही वाचा – विरोधक म्हणतात, ‘एकनाथ खडसे संघर्ष करो, हम तुम्हारे साथ है’

अधिवेशनाचा पहिला दिवस संपला

महाराष्ट्र विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन आजपासून मुंबईत सुरु झालेले आहे. या अधिवेशनाचा आज पहिला दिवस संपला आहे. दरम्यान, या अधिवेशनात संपुर्ण राज्याच्या नजरा लागल्या आहेत. मराठा आरक्षण आणि दुष्काळ हे दोन मोठे प्रश्न सरकारसमोर आहेत. आज पहिल्याच दिवशी विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेत मराठा आरक्षण, दुष्काळी परिस्थिती, शेतकऱ्यांचे प्रश्न, राज्यातील कायदा सुव्यवस्था या प्रश्नांवर सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.


हेही वाचा – वारंवार पुरवणी मागण्या मांडून सरकार जनतेची दिशाभूल करतंय – जयंत पाटील

First Published on: November 19, 2018 9:26 PM
Exit mobile version