वाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

म्हणौनि राजर्षि कां ब्राह्मण । जयां गती मती मीचि शरण । तयां त्रिशुद्धी मीचि निर्वाण । स्थितीही मीचि ॥
म्हणून, ज्यांना गती व ज्ञान देणारा आणि ज्यांचे रक्षण करणारा निश्चयेकरून मीच आहे, त्या राजर्षींना व ब्राह्मणांना भक्ती व मुक्तीचे स्थान मीच आहे.
यालागीं शतजर्जर नावे । रिगोनि केवीं निश्चिंत होआवें । कैसेनि उघडिया असावें । शस्त्रवर्षीं ॥
यास्तव शतावधी छिद्रांच्या नावेत बसून आपण बुडणार नाही अशा भरवशाने निष्काळजी कसे राहावे? तसेच शस्त्रांचा वर्षाव चालला असता आपल्यास दुखापत होणार नाही अशा भरवशाने उघड्या अंगाने कसे फिरावे?
आंगावरी पडतां पाषाण । न सुवावें केवीं वोडण । रोगें दाटला आणि उदासपण । वोखदेंसी? ॥
अंगावर दगड पडत असता पुढे का करू नये? रोगाने ग्रस्त असता औषध घेण्याविषयी कसे उदासीन असावे?
जेथ चहुंकडे जळत वणवा । तेथूनि न निगिजे केवीं पांडवा । तेवीं लोकां येऊनि सोपद्रवा । केवीं न भजिजे मातें ॥
हे अर्जुना, चोहोकडून वणवा लागल्यावर तेथून बाहेर कसे पडू नये? याचप्रमाणे अनेक दुःखांनी भरलेल्या मृत्युलोकास प्राप्त झाल्यावर माझे भजन का करू नये?
अगा मातें न भजावयालागीं । कवण बळ पां आपुलिया आंगीं । काई घरीं कीं भोगीं । निश्चिती केली? ॥
अरे, मला न भजावे असे मनुष्याच्या अंगी कोणते सामर्थ्य आहे? त्यांच्या घरी अशी कोणती भोग्य वस्तूंची समृद्धी आहे की, त्यांनी निष्काळजी राहावे?
नातरी विद्या कीं वयसा । ययां प्राणियांसि हा ऐसा । मज न भजतां भरंवसा । सुखाचा कोण? ॥
किंवा मला न भजता विद्या, तारुण्य यांपासून सुखप्राप्ती होईल, असा त्यांना कोणता भरवसा आहे?

First Published on: April 25, 2024 4:30 AM
Exit mobile version