कळंबोली उड्डाण पुलाखाली भरते भटक्या मुलांची शाळा!

कळंबोली उड्डाण पुलाखाली भरते भटक्या मुलांची शाळा!

कळंबोली उड्डाण पुलाखाली भरते भटक्या मुलांची शाळा!

पुणे द्रुतगती मार्गावरील कळंबोली उड्डाण पुलाखाली भटक्या, तसेच झोपडपट्टीतील लहान मुलांकरिता शाळा भरत असून, हे मुक्त शिक्षण जून महिन्यापासून सुरू झाले आहे. सर्व मुले शाळाबाह्य आहेत. आपले सामाजिक दायित्व म्हणून विदर्भ कन्या अनिता कोलते यांनी एकूण १२० मुले आणि मुलींची शाळा सुरू केली आहे. शाळाबाह्य मुलांच्या शिक्षणाचा विषय अनेकदा होत असला तरी यात पाहिजे तसे यश आलेले नाही. या पार्श्वभूमीवर कोलते यांची ही शाळा महत्त्वाची आहे. १ ते १४ वयोगटातील ही सर्व मुले असून, डोंबाऱ्याचा खेळ करून, भीक मागणारी, भंगार जमा करून, तसेच मिळेल ते काम करून, तर काही मुले ढोलकी विकून परिवाराचा उदरनिर्वाह करतात. त्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे गरजेचे असल्याचा विचार कोलते यांच्या मनामध्ये आला आणि त्यांनी तात्काळ मुक्त शिक्षण १ आणि २ असे युनिट सुरू केले. या दोन्ही युनिटमध्ये एकूण १२० मुले आणि मुली आहेत. या मुलांना सकाळी ८ ते ११ या कालावधीमध्ये शिकवले जात आहे. सोबतच रोज सकाळी दूध, बिस्कीटचा नाश्ता देण्यात येतो.

मुलांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी त्यांना शैक्षणिक साहित्य म्हणजेच पाटी, वही, पेन्सिल, कंपास, पाण्याची बाटली, शालेय दप्तर आणि गणवेश देण्यात आले आहेत. तसेच खेळण्याकरिता मुलामुलींना बुद्धीबळ, कॅरम, ल्युडो, बॅटबॉल, दोरीउडी, सापशिडी आदी साहित्य देण्यात येते. दररोज त्यांना मूल्य शिक्षण, मराठी, इंग्रजी, गणित, गाणे-गोष्टी, स्वच्छता आदी विषय शिकवले जातात. समाजातील काही दानशूर व्यक्ती आपल्या मुलांचे वाढदिवस या मुलांसमवेत साजरे करतात. तसेच अनेक सांस्कृतिक कार्यक्रम करण्यात येतात. या मुलांमध्ये शिक्षण घेण्याची आवड आणि जिज्ञासा वृत्ती दिसून येते. दररोज राष्ट्रगीत म्हटले जाते.

समाजातील अनेक दानशूर व्यक्तींचे या उपक्रमासाठी योगदान आहे. छगन उसरे, रोहिदास सूर्यवंशी, विठ्ठल कोलते, अंजली इनामदार, लोकेश शिव, सुनीता नगराळे, प्रतिभा भोळे आणि अन्य दानशूर योगदान देत आहेत. सध्या कोलते या बाहेर नोकरी करून हा उपक्रम राबवत आहेत. या उपक्रमामध्ये त्यांची १३ वर्षांची मुलगी अभिषा देखील सहकार्य करीत आहे. मुंबईमध्ये जवळपास हर्बर लाईन, सेंट्रल लाईन आणि वेस्टर्न लाईनमध्ये ५० मुक्त शिक्षण उपक्रम या वर्षांत सुरु करण्याचा कोलते यांचा मानस आहे. या भटक्या मुलांच्या शैक्षणिक विकासासाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी जमेल तशी मदत करण्यासाठी ८८५६९४८८२४ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन कोलते यांनी केले आहे.


हे ही वाचा – गर्दी करणारे राजकीय, धार्मिक कार्यक्रम नकोच; मुख्यमंत्र्यांचे राजकीय पक्ष, संघटनांना आवाहन


 

First Published on: September 6, 2021 8:48 PM
Exit mobile version