मुक्तशाळा : कळंबोली उड्डाण पुलाखाली आता प्रौढ शिक्षणालाही सुरुवात

मुक्तशाळा : कळंबोली उड्डाण पुलाखाली आता प्रौढ शिक्षणालाही सुरुवात

कळंबोली उड्डाण पुलाखालील मुक्तशाळेत भटक्या मुलांसह प्रौढ शिक्षणालाही सुरुवात

पुणे द्रुतगती मार्गावरील कळंबोली उड्डाण पुलाखाली आपले सामाजिक दायित्व म्हणून विदर्भ कन्या अनिता कोलते यांनी एकूण १२० भटक्या मुले आणि मुलींची शाळा सुरू केली आहे. मात्र आता याच पुलाखालील मुक्तशाळेत प्रौढ शिक्षणालाही सुरुवात झाली आहे.

याबाबत अनिता कोलते या ‘आपलं महानगर’शी संवाद साधताना म्हणाल्या की,काही मुलं जेव्हा शाळेमध्ये नसायची तेव्हा त्यांच्या पालकांना विचारायला जायचो. “तुम्ही मुलांना शाळेत का पाठवत नाही?” यावर त्या पालकांचे असे म्हणणे होते की,जो आमचा खेळ करण्याचा व्यवसाय आहे तो डोंबारीचा खेळ असल्याने, या रस्सीवर आम्ही मोठी माणसे तर चालू शकणार नाही त्यामुळे आमचा नाईलाज असतो. या मुलांना घेऊन जाणे ही आमची गरज होऊन बसली आहे. त्यामुळे अनिता कोलते आणि योगेश कोलते यांनी या महिलांना प्रौढ शिक्षणांतर्गत शिक्षण देण्यास सुरुवात केली आहे.

१००-२०० रुपयांसाठी कधी ठाणे,कधी कल्याण अशा दूरच्या ठिकाणी डोंबारीचा खेळ करण्यासाठी या महिलांना मुलांसह जावे लागते. जर घरी काम मिळालं तर आम्हाला बाहेर जाण्याची काहीच आवश्यकता नाही, असे त्या महिलांचे म्हणणे होते. या महिला शिक्षण उपक्रमातर्गत त्यांना एक व्यवसाय म्हणून टेलरिंगचे काम शिकवण्याचा अनिता कोलते यांचा मानस आहे. थोड्याफार मशिनचा पुरवठा झाल्यावर त्यांना टेलरिंगचे काम शिकवले जाईल. शाळेमधला युनिफॉर्म असो कींवा हॉटेलमधलं अ‍ॅप्रन असो, हे कुठेतरी शिवायला जातं कींवा कोणालातरी काँट्रॅक्ट दिला जातो. हेच काम या महिलांना दिले तर, त्यातून त्यांना आर्थिक मिळकत होईल जेणेकरुन त्यांना घराबाहेर पडण्याची काहीच गरज नाही. या महिला अक्षरशः तापामध्ये असल्या तरी, त्या कामासाठी बाहेर पडतात. मुलांच्या अंगामध्ये ताप असला तरी मुलांना घेऊन जातात. हे कुठेतरी थांबवणं गरजेचे आहे. त्यामुळे जे उच्च शिक्षित आहेत किंवा ज्यांची मुबलकता आहे त्यांनी जर हा धुरा उचलून समाजाचे आपण कुठेतरी देणे लागतो ते फेडण्याचा प्रयत्न करु शकतो. जेणेकरुन या उपक्रमाद्वारे खऱ्या अर्थाने महिला सक्षमीकरण आणि त्यांना आर्थिक मदत करता येईल. त्यामुळे या भटक्या मुलांच्या शैक्षणिक विकासासाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी जमेल तशी मदत करण्यासाठी ८८५६९४८८२४ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन कोलते यांनी केले आहे.

 


हे ही वाचा – T20 World Cup : चहलला भारतीय संघातून वगळल्याने सेहवाग संतापला; निवडकर्त्यांकडे मागितलं स्पष्टीकरण


 

First Published on: September 29, 2021 7:43 AM
Exit mobile version