शिक्षणाचा खेळखंडोबा : इयत्तेच्या प्रश्नाने गुरुजी चक्रावले

शिक्षणाचा खेळखंडोबा : इयत्तेच्या प्रश्नाने गुरुजी चक्रावले

शिक्षणाचा खेळखंडोबा : इयत्तेच्या सवालाने गुरुजी चक्रावले

कोरोनामुळे दीड वर्षांपेक्षा अधिक काळ शाळेत न गेलेल्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्याला रस्त्यात भेटलेल्या गुरुजींना पाहून आनंद झाला. मात्र यावेळी त्याने विचारलेल्या ‘माझी इयत्ता कोणती’ या सवालाने गुरुजीही क्षणभर चक्रावले आणि त्यांना स्वतःच्या कपाळावर हात मारून घेण्याची वेळ आली. मार्च २०२० मध्ये लॉकडाऊनमुळे देश थांबला होता. कोरोनाच्या वाढत्या कहरामुळे शाळा, महाविद्यालय बंदच राहिले. दहावी आणि बारावी वगळता परीक्षा न देता विद्यार्थी ‘पास’ झाले. पहिली लाट ओसरताना निर्बंध काही प्रमाणात शिथिल झाले तरी अनेक ठिकाणी शाळा बंदच होत्या. प्राथमिक शाळा पूर्णपणे बंद, तर माध्यमिक शाळा सुरू होऊनही पालकांनी पाल्यांना शाळेत न पाठविल्याने वर्ग ओस पडले होते. २०२०-२१ शैक्षणिक वर्ष सुरू होताना कोरोनाच्या दुसर्‍या लाटेच्या थैमानामुळे ऑनलाईन शिक्षण पद्धत सुरू करावी लागली. नेहमी समोर असणार्‍या गुरुजींची जागा मोबाईलने घेतली. परंतु ऑनलाईन शिक्षणातील असंख्य अडचणींमुळे शेकडो विद्यार्थ्यांची पाटी कोरीच राहिली आहे.

शिक्षणाचा खेळखंडोबा

खालापूर  तालुक्यात तर ऑनलाइन शिक्षणापासून दुर्गम वाडीवस्तीत राहणारे आणि आर्थिक परिस्थिती हलाखीची असलेली मुले शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर पडली आहेत. सर्वात बिकट परिस्थिती प्राथमिक शिक्षणाची झाली असून, इयत्ता 1 ली ते 7 वी शाळेची घंटा वाजलीच नाही. गुरुजींचा आणि शाळेचा चेहरा न बघताच वरच्या वर्गात प्रवेश मिळालेल्या कित्येक विद्यार्थ्यांना आपण नक्की कोणत्या वर्गात आहोत याची माहिती नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. वर्ग, फळा आणि गुरुजी असतात याची माहिती पहिल्या इयत्तेमधून दुसर्‍या इयत्तेत गेलेल्या विद्यार्थ्यांना नाही.इतर इयत्तांची देखील वेगळी परिस्थिती नसून विद्यार्थ्याने वाटेत भेटलेल्या गुरुजींना ‘मी कोणत्या इयत्तेत’ विचारल्याने विनोद घडला असला तरी कोरोनामुळे शिक्षणाचा खेळखंडोबा झाल्याचे शिक्षक, पालक देखील मान्य करीत आहेत. ऑनलाईन शिक्षणाने श्रीगणेशा झालेली पहिली इयत्तेमधील सुमारे २११३ विद्यार्थी शाळा न पाहताच थेट दुसर्‍या इयत्तेत गेले.

दुसर्‍या टप्प्यातील शाळा सुरू झाल्यानंतरची परिस्थिती अशी होती.

नववी ते बारावी शाळा संख्या-४७

२६ मार्चपर्यंत सुरू झालेल्या शाळा-४४

नववी ते बारावी विद्यार्थी संख्या-१०८८१

२६ मार्च २०२१ रोजी उपस्थित विद्यार्थी-४२६५

नववी ते बारावी ४३८ शिक्षकांच्या कोरोना तपासणीत ६ बाधित

१९४ शिक्षकेतर कर्मचार्‍यांपैकी ७ कोरोनाबाधित

पाचवी ते आठवी खालापुरातील शाळा संख्या-१८७

पाचवी ते आठवी विद्यार्थी संख्या-१४१७६

२६मार्च २०२१ रोजी शाळेत उपस्थित विद्यार्थी-४७३६

 

“माझी मुलगी अभ्यासात वर्गामध्ये पहिल्या तीन विद्यार्थ्यांमध्ये असायची. आता चौथी इयत्तेत गेली. परंतु शाळा सुरू नाहीत, परिणामी गुरुजींचा आदरयुक्त धाक नसल्याने अभ्यासाकडे दुर्लक्ष झाले. वाचन, पाढे देखील विसरून गेली.”

-सुनील बद्रिके, पालक

“ऑनलाईन शिक्षण पद्धत ग्रामीण भागात प्रभावी नसल्याने ऑफलाईन शिक्षणाशिवाय पर्याय नाही. विद्यार्थ्यांपर्यंत पोहचून स्वाध्याय पुस्तिका, अभ्यास तपासणी यावर अधिक भर दिला जात आहे. ऑनलाईनला शिक्षणात अनेक ठिकाणी वाडीवस्तीवर शून्य टक्के उपस्थिती असल्याने अशा विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले जात आहे.”

-रजनी गायकवाड, आदर्श शिक्षिका, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा


हे ही वाचा – सिटी बँक कथित घोटाळ्याप्रकरणी सेनेचे माजी खासदार अडसूळ यांच्यासह मुलाला ईडीचं समन्स


 

First Published on: September 27, 2021 1:30 PM
Exit mobile version