भारत जोडोपेक्षा काँग्रेस जोडो मोहीम हाती घ्यावी!

भारत जोडोपेक्षा काँग्रेस जोडो मोहीम हाती घ्यावी!

दोन लोकसभांसोबत महत्वाच्या राज्यांमधील विधानसभा निवडणुकांमध्ये पराभूत झाल्यानंतर हतबल झालेल्या काँग्रेस पक्षांमध्ये नवीन ऊर्जा भरण्यासाठी विविध उपाय करून पाहण्यात आले. पण नरेंद्र मोदी यांच्यासारखा नेता काँग्रेसचा प्रतिस्पर्धी असल्यामुळे काँग्रेसचे काही चालेनासे झाले आहे. २०१४ सालच्या लोकसभा निवडणुकांची धुरा जेव्हा भाजपने नरेंद्र मोदींच्या हाती दिली तेव्हा त्यांनी एकहाती सगळा भारत पिंजून काढला. कारण मोदींना निवडणूक प्रचारप्रमुख करण्यात आल्यामुळे पुढे भाजपचा विजय झाला तर तेच पंतप्रधान होणार, त्यामुळे आपली संधी जाणार यामुळे भाजपचे राष्ट्रीय पातळीवरील नेते नाराज होते. या सगळ्यावर मात करून मोदींनी केंद्रात स्वतंत्र भारतात पहिल्यांदाचा बिगरकाँग्रेसी सरकार बहुमताने केंद्रात आणले.

भाजपला बहुमत मिळाले, त्याचसोबत या निवडणुकीत काँग्रेसची इतकी वाताहत झाली की, त्यांना लोकसभेत विरोधी पक्षात बसण्यासाठी जेवढ्या जागा लागतात, तेवढ्याही जिंकता आल्या नाहीत. त्यामुळे यापुढे काँग्रेसचे पुनरुत्थान कसे करावे, असा प्रश्न काँग्रेसच्या मोठ्या आणि अनुभवी नेत्यांसमोर पडला होता. खरे तर आपला मुलगा राहुल गांधी यांनी पंतप्रधान व्हावे ही सोनिया गांधी यांची इच्छा आहे, त्यामुळेच २०१४ च्या निवडणुकीआधी त्यांना काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्षपद आणि नंतर अध्यक्षपद देण्यात आले होेते. पण त्यांच्यासमोर त्यांच्यापेक्षा सगळ्याच बाबतीत अनुभवी आणि प्रभावी असे नरेंद्र मोदी असल्यामुळे राहुल गांधी यांनी मोदींच्या नावाने कितीही शंख केला तरी त्याचा काहीही उपयोग झाला नाही. नरेंद्र मोदी राष्ट्रीय पातळीवर यशस्वी ठरेल आणि त्यांनी भाजपला एकदा नव्हे तर दोनदा बहुमत मिळवून दिले. त्याच वेळी दुसर्‍या बाजूला काँग्रेसची देशातील परिस्थिती फार बिकट झाली.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा धुव्वा उडाल्यानंतर पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा त्याग केला. त्यानंतर काही केल्या ते अध्यक्षपदाचा स्वीकार करण्यास तयार झाले नाहीत. आपल्या अध्यक्षतेखाली पक्षाला विजय मिळू शकत नाही, याचा धसका त्यांनी इतका घेतला की, पक्षांच्या ज्येष्ठ नेत्यांनी समज घालूनही ते त्यांनी काही मनावर घेतले नाही. त्यामुळे काँग्रेस पक्षाला कुणी अध्यक्षच नाही. त्या पदाची हंगामी जबाबदारी आजही सोनिया गांधी सांभाळत आहेत. काँग्रेससारख्या अनेक वर्षांची परंपरा असलेल्या पक्षाला अध्यक्षाशिवाय राहण्याची ही पहिलीच वेळ असावी. काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक लवकरच होणार आहे, पण ती जेव्हा प्रत्यक्षात होईल तेव्हाच खरे. कारण पहिली जाहीर झालेली तारीख पुढे ढकलण्यात आली होती.

काँग्रेसच्या चळवळीतून ब्रिटिशांच्या विरोधात सगळा भारत देश एकवटला होता. त्यातूनच देशाला स्वातंत्र्य मिळाले. त्यानंतर काँग्रेस बरखास्त करण्यात यावी, अशी सूचना महात्मा गांधी यांनी केली होती. देशाला स्वातंत्र्य मिळवून देणे हे काँग्रेसचे काम होते, ते आता पूर्ण झालेले आहे. त्यामुळे आता काँग्रेसचे विसर्जन करण्यात यावे, त्यामुळे सगळ्यांना समान राजकीय संधी मिळेल. पण गांधीजींची ही सूचना त्यावेळच्या पंडित नेहरुंसारख्या नव्या पिढीतील नेत्यांना मान्य होण्यासारखी नव्हती. कारण महात्मा गांधीजींना पंतप्रधान किंवा राष्ट्रपती बनण्याची राजकीय महत्वाकांक्षा नसली तरी नेहरुंना देशाचे पंतप्रधान होण्याची महत्वाकांक्षा होंती. त्यामुळे काँग्रेस हा पक्ष म्हणून कायम रहावा, असे नेहरुंना वाटत होते. पुढे काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून पंडित नेहरु देशाचे पहिले पंतप्रधान झाले. पुढे नेहरुंच्या घराण्यातील लोकांचाच काँग्रेसवर पगडा राहिला. म्हणजे ज्या काँग्रेसने लोकशाहीसाठी स्वातंत्र्यलढा दिला. तीच काँग्रेस पुढे नेहरुंच्या घराण्याच्या पारतंत्र्यात अडकून पडली.

त्यातून त्या काँग्रेसची आजवर मुक्तता झालेली नाही. ज्या ज्या वेळी कुणी या घराण्याला आव्हान देऊन काँग्रेसवर आपली पकड मिळवण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याचा बंदोबस्त करण्यात आला. त्यामुळे काँग्रेस हा पक्ष नेहरुंच्या वारसदारांनी नेहमीच आपल्या ताब्यात ठेवला. पुढे भारतासारख्या लोकशाही देशात हे घराणे नाही तर काँग्रेस नाही, अशी अवस्था होऊन बसली. आजही पाहिल्यास असे दिसेल की, गेल्या अनेक वर्षांपासून सोनिया गांधी आणि त्यांना मानणारे एकनिष्ठ सल्लागार राहुल गांधी यांनी काँग्रेसचे प्रमुखपद स्वीकारावे, अध्यक्ष व्हावे, यासाठी जीवाचा आटापिटा करत आहेत. राहुल गांधी यांना यश मिळत नसल्याने ते स्वत: नाराज आहेत, आणि राहुल गांधी अध्यक्षपद स्वीकारत नसल्यामुळे पक्षातील ज्येष्ठ नेते नाराज आहेत. त्यातून काँग्रेसमधील २० ज्येष्ठ नेत्यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहून आपली नाराजी कळवली. अनेक वर्षांची परंपरा असलेला काँग्रेससारखा राष्ट्रीय पक्ष अध्यक्षाशिवाय राहणे योग्य नाही, कारण त्यातून पक्षाचे नुकसान होईल, अशा भावना त्यांनी त्या पत्रातून कळवल्या. पण त्याकडे सोनिया गांधी यांनी फारसे लक्ष दिले नाही.

पक्षाला कुणी अध्यक्ष नसल्यामुळे विविध राज्यांमधील काँग्रेसमध्ये गटबाजी उफाळून आली आहे. महाराष्ट्र हे त्याचे खास उदाहरण आहे. या गटबाजीचा फटका काँग्रेसला ठिकठिकाणी बसून त्यांची राज्यांमधील असलेली सत्ता गेली. महाराष्ट्रात तर काँग्रेससारख्या राष्ट्रीय पक्षाला शिवसेनेसारख्या प्रादेशिक पक्षाच्या पालखीचे भोई होऊन अडीच वर्षे काढावी लागली. देशभरात काँग्रेसची परिस्थिती अवघड झालेली आहे. केंद्रासोबतच राज्यांमधील सत्ताही त्यांना गमवावी लागत आहे. त्यातसोबत काँग्रेसकडे राष्ट्रीय पातळीवर दमदार नेतृत्व नसल्यामुळे काँग्रेसमधील अनेक जण भाजपमध्ये जात आहेत. त्यामुळे भाजपची ताकद वाढत आहे. नरेंद्र मोदी यांच्यावर सभासंमेलनातून जोरदार टीका करता येईल, पण त्यांना निवडणुकीत हरवणे महत्वाचे आहे, पण ते शक्य होत नाही.

तिथेच राहुल गांधी आणि काँग्रेसचे गाडे अडले आहे. त्यामुळेच आता काँग्रेसच्या पुनरुत्थानाची गरज हंगामी पक्षाध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना वाटू लागली आहे. त्यामुळे त्यांनी भाजपचाच फॉर्म्युला अवलंबण्याचे ठरवलेले आहे. जसे लालकृष्ण अडवाणींच्या देशभरातील रथयात्रेला यश आले आणि भाजपची सत्ता केंद्रात आली, तसाच प्रयत्न राहुल गांधी यांंच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचा सुरू आहे. त्यातून त्यांनी ७ सप्टेंबरपासून कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत भारत जोडो यात्रा सुरू केली आहे. या यात्रेला त्यांनी महात्मा गांधीजींच्या दांडी यात्रेचाही रंग देण्याचा प्रयत्न केला आहे. खरे तर महात्मा गांधी यांच्या नावाचा आणि वलयाचा फायदा नेहरुंच्या वारसदारांनी घेतला आणि घेत आहेत.

स्वतंत्र भारतावर सुमारे ६० वर्षे काँग्रेसचेच राज्य होते. काँग्रेस ही राष्ट्रीय चळवळ असल्यामुळे तिचा प्रसार देशाच्या शहरांपासून ते दूरवर खेड्यापाड्यात झालेला होता. त्याचा फायदा काँग्रेस पक्ष ताब्यात असलेल्या नेहरु आणि त्यांच्या वारसदारांना झाला. त्याचसोबत त्यांच्यासाठी दुसरी जमेची बाजू म्हणजे त्यांना आव्हान देऊ शकेल, असा विरोधी पक्ष देशात नव्हता. त्यामुळे देशावर नेहरुंच्या वारसदारांचे अधिराज्य होते. त्यांना आव्हान देणे फारच अवघड होते. कारण काँग्रेस म्हणजे नेहरुंचे वारसदार अशी काँग्रेसची व्याख्याच होऊन बसली आहे. आज देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे झाल्यावरदेखील गांधी आडनाव सोडून अन्य कुणी काँग्रेसचा प्रमुख झाल्याचे दिसत नाही. नरसिंह राव आणि मनमोहन सिंग यांना पंतप्रधानपदाची संधी मिळाली, तरी काँग्रेसचे मुख्य अधिकार आणि सूत्रे ही गांधी घराण्याकडेच राहिली. काँग्रेसचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते हे एका बाजूला लोकशाहीचा पुकारा करतात तर दुसर्‍या बाजूला काँग्रेस एकाच घराण्याच्या एकाधिकारशाहीला बांधली गेली आहे, याचा त्यांना विसर पडलेला असतो.

काँग्रेसला पहिला धक्का भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी अयोध्येत राम मंदिरांच्या उभारणीसाठी देशभर रथयात्रा काढून दिला. बाबरी मशीद उध्वस्त करण्यात आल्यानंतर भाजपचे लोकसभेतील २ चे २०० खासदार झाले आणि अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) सरकार स्थापन झाले. पण त्या सरकारमध्ये अनेक पक्ष सहभागी झालेले होते. त्यामुळे घटक पक्षांची नाराजी ही वाजपेयींसाठी नेहमी डोकेदुखी बनलेली होती. काँग्रेसला खरा धक्का नरेंद्र मोदी यांनी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत दिला. त्यावेळी निवडणूक प्रचारात मोदींनी लोकांना देेशाला भ्रष्टाचारातून मुक्त करायचे असेल तर ‘काँग्रेसमुक्त भारता’चे आवाहन केले होते. त्यावेळी २००४ सालापासून केंद्रात सत्तेत असलेल्या मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस आणि घटक पक्षांच्या संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारमधील मंत्र्यांची घोटाळ्यांची अनेक प्रकरणे उघड झाली होती. त्यात पुन्हा मनमोहन सिंग याचे वय झाले होते. राहुल गांधी यांचा प्रभाव पडत नव्हता. त्यामुळे लोक एका सक्षम पर्यायाच्या शोधात होते. तो त्यांना त्या वेळचे गुजरातचे विकास पुरुष नरेंद्र मोदी यांच्या रुपात दिसला.

गुजरात मॉडेलचा डंका केवळ देशात नव्हे तर जगात गाजत होता. त्यामुळे नरेंद्र मोदी यांना राष्ट्रीय पातळीवर संधी दिली तर ते असाच विकास देशातही करुन दाखवतील, असा विश्वास लोकांना वाटू लागला. त्यासोबत मोदींनी काँग्रेस आणि नेहरुंच्या वारसदारांची पोलखोल करण्याचा सपाटाच लावला. त्यामुळे आता काँग्रेस नको, असे लोकांना वाटू लागले. त्यामुळे त्यांनी निवडणुकांमध्ये मोदींना पसंती दिली. परिणामी भाजपला पहिल्यांदाच केंद्रात बहुमत मिळाले. त्यानंतर मोदींनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत तर तीनशेचा आकडा पार केला. त्यामुळे आता २०२४ मध्ये आपले काय होणार याची चिंता काँग्रेसला सतावू लागली आहे. त्यातूनच त्यांनी भारत जोडो यात्रा सुरू केली. कन्याकुमारीपासून ते काश्मीरपर्यंत राहुल गांधी आणि काँग्रेसचे नेते पायी चालणार आहेत, असे म्हटले जाते. पायी चालून ते लोकांच्या समस्या समजून घेणार आहेत. त्यातून ते मोदी सरकारला जाब विचारणार आहेत. पायी चालण्यातून आपल्याला ग्राऊंड रिएलिटी म्हणजेच जमिनी वास्तव दिसेल असे त्यांचे म्हणणे आहे.

काँग्रेसने या मोहिमेला भारत जोडो असे नाव दिले आहे. पण मुद्दा असा आहे की, त्यांना कुठल्या भारताला जोडायचे आहे, असा प्रश्न आहे. उलट, भारत तेरे तुकडे होंगे, या टुकडे गँगचे राहुल गांधी यांनी प्रत्यक्ष भेटून समर्थन केले होते. भारत हा जोडलेलाच आहे. सध्या काँग्रेसला आपले छिन्नविच्छिन्न झालेले तुकडे जोडण्याची गरज आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल, गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेस का सोडली. पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारखे उच्चशिक्षित आणि निष्ठावान नेते आपल्याचा पक्षावर का टीका करत आहेत. राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर का आक्षेप घेत आहेत. त्याचा सोनिया गांधी आणि त्यांच्या सल्लागारांनी विचार करण्याची गरज आहे. अन्यथा केवळ भारत जोडो यात्रा काढून त्याला महात्मा गांधीजींच्या दांडीयात्रेसारखे यश मिळेल, असे वाटणे हे केवळ दिवास्वप्न ठरेल.

First Published on: September 14, 2022 10:43 PM
Exit mobile version