Corona Live Update: कल्याण डोंबिवलीत ५२ नवीन रुग्ण कोरोना रुग्णांची संख्या १३२८

Corona Live Update: कल्याण डोंबिवलीत ५२ नवीन रुग्ण कोरोना रुग्णांची संख्या १३२८

कोरोना व्हायरस लाईव्ह अपडेट

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात मागील २४ तासात ५२   नवीन रुग्णांची भर पडली आहे. आजच्या या ५२  रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील कोरोना रुग्णांची  संख्या  १३२८ झाली आहे. यापैकी आतापर्यंत ३४ जणांचा मृत्यू झाला असून ६२८  जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर तब्बल ६६५ रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत.


मुंबईत आजपासून सम-विषम नियमानुसार एका बाजुची दुकाने उघडायला परवानगी देण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबईतील प्रसिद्ध झवेरी बाजार येथील ज्वेलर्सच्या दुकानदारांनी तब्बल अडीच महिन्यानंतर आपलं दुकान उघडलं.


देशात कोरोनबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत असून देशात गेल्या २४ तासांत ९ हजार ८५१ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर गेल्या २४ तासांत २७३ जणांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार देशात आता कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २ लाख २६ हजार ७७० झाली आहे. त्यापैकी ६ हजार ३४८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १ लाख ०९,४६२ जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. सध्या देशात कोरोनाची लागण असलेले म्हणजेच अॅक्टिव्ह रुग्ण १ लाख १० हजार ९६० आहेत.

महाराष्ट्र, दिल्ली, गुजरात, तामिळनाडू यासारख्या राज्यांमध्ये कोरोना विषाणूचा सर्वाधिक परिणाम झाला असून महाराष्ट्रात कोरोनाचे ७७ हजार ७९३ रुग्ण आढळले आहेत. यापैकी ४१ हजार ४०२ सक्रिय रूग्ण असून ३३ हजार ६८१ रुग्ण बरे होऊन त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यंत २ हजार ७१० लोकांचा मृत्यू झाला आहे.


कोरोना रुग्णांवर तासाभरात उपचार सुरू करा

एकीकडे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी कोरोना रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नसल्याच्या तक्रारी येत असताना दुसरीकडे दिल्ली सरकारने याबाबत कठोर पावलं उचलायला सुरुवात केली आहे. राजधानी दिल्लीमध्ये गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढायला सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर दिल्ली सरकारने दिल्लीतल्या रुग्णालयांसाठी नवे मार्गदर्शक निर्देश जारी केले आहेत. यामध्ये सर्वात महत्त्वाचे निर्देश हे रुग्ण रुग्णालयात आल्यानंतर त्याला दिल्या जाणाऱ्या उपचारांसंदर्भातले आहेत. यामध्ये रुग्ण रुग्णालयात आल्यानंतर ऑन ड्युटी डॉक्टरांनी त्याच्यावर किंवा तिच्यावर तासाभरात उपचार सुरू केले पाहिजेत, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. (सविस्तर वाचा)


सोमवारपासून धार्मिक स्थळं उघडणार

अडीच महिने लॉकडाऊनमध्ये राहिल्यानंतर केंद्र सरकारने अनलॉक १.० ची घोषणा केली. या घोषणेनुसार टप्प्याटप्प्याने लॉकडाऊनचे नियम शिथिल करण्यात येणार असल्याचं जाहीर करण्यात आलं. त्यानुसार येत्या ८ जूनपासून म्हणजेच सोमवारपासून देशभरात कंटेनमेंट झोन वगळता इतर ठिकाणी मंदिरं आणि धार्मिक स्थळं सुरू करण्याची मुभा देण्यात आली आहे. मात्र, यासाठी पाळावयाच्या नियमांची यादीच केंद्रीय आरोग्य मंत्र्यालयाने जारी केली आहे. या नियमांनुसारच ही ठिकाणं उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान, केंद्र सरकारने जरी मंदिरं आणि धार्मिक स्थळं उघडण्याची परवानगी दिली असली, तरी महाराष्ट्र सरकारने मात्र धार्मिक स्थळं आणि मंदिरं बंदच राहणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. राज्यात कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, जेव्हा राज्य सरकार मंदिरं उघडण्याचा निर्णय घेईल, तेव्हा मात्र केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या नियमावलीचं पालन करावं लागेल. यामध्ये प्रसाद देणे किंवा पवित्र पाणी शिंपडण्यावर बंदी असेल. (सविस्तर वाचा)


आजपासून दुकाने, बाजारपेठाही खुल्या रिक्षा, टॅक्सी अत्यावश्यक कामांसाठी

करोनाच्या संसर्गामुळे गेली दोन महिने बंद असलेली मुंबई शुक्रवारपासून हळुहळु रुळावर येणार आहे. राज्य सरकारच्या मिशन बिगिन अगेन अंतर्गत पहिली अनलॉक प्रक्रिया ३ जूनपासून सुरू होणार होती. मात्र निसर्ग चक्रीवादळामुळे ती दोन दिवस पुढे ढकलण्यात आली. आता ५ जून अर्थात शुक्रवारपासून बाधित क्षेत्र वगळता मुंबईतील दुकाने, बाजारपेठा सुरू होणार आहेत. टॅक्सी आणि रिक्षा सुरू होणार असून त्यांचा वापर अत्यावश्यक कामांसाठी करण्यात येऊ शकतो. (सविस्तर वाचा)


करोना आरोग्य केंद्रांसाठी डॉक्टर्स, नर्सेस पुरेसे आहेत

करोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी महापालिकेच्यावतीने समर्पित आरोग्य केंद्र मोठ्या क्षमतेने उभारणीचे काम सुरू आहे. परंतु या केंद्रांमध्ये सध्या डॉक्टर्स, नर्सेसची कमतरता असल्याने ही केंद्र पूर्ण क्षमतेने सुरू केली जात नसल्याचे बोलले जात आहे. परिणामी आजही करोनाग्रस्तांच्या नातेवाईकांचा खाटांसाठी शोध सुरू आहे. मात्र, महापालिकेच्यावतीने १० हजार खाटांची सुविधा उभारली जात असून यासाठी पुरेसे डॉक्टर्स, नर्सेस आदींची टीम महापालिकडे तयार असल्याचा दावा महापालिकेच्या आरोग्य विभागाचे उपायुक्त रमेश पवार यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर रमेश पवार यांच्याशी ‘दै.आपलं महानगर’चे खास प्रतिनिधी सचिन धानजी यांनी केलेली सविस्तर बातचीत. (सविस्तर वाचा)


मुंबईची आरोग्य व्यवस्था मृत्यूशय्येवर

कोविडचा प्रसार सुरु झाल्यापासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपल्या दिवाणखान्यात बसून लाईव्ह करत आहेत. मुख्यमंत्र्यांचे दिवाणखान्यातील लाईव्ह सुरुवातीला खूपच गोड वाटलं. असा मधाळ बोलणारा काळजीवाहू मुख्यमंत्री भेटल्याबद्दल जनतेमध्ये आनंदाचे वातावरण होते. लॉकडाऊनही नवा नवा असल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे लोकांनी गाण्याच्या भेंड्या खेळणे, छंद जोपासणे वगैरे मध्यमवर्गीय कल्पना जोपासल्या. मात्र लॉकडाऊन आणि रुग्णांची आकडेवारी जसजशी वाढत चाललीये. तसे मुख्यमंत्री, त्यांचे दिवाणखान्यातील लाईव्ह आणि आरोग्य व्यवस्था दोन्ही किती कुचकामी आहे, हे लक्षात येत आहे. करोना पॉझिटिव्ह झालेले रुग्ण, त्यांच्या परिवारातील आणि ज्या शेजारच्या लोकांना क्वारंटाईन केलेले आहे, अशा लोकांनी या कुचकामी आरोग्य व्यवस्थेचा अनुभव घेतलेला आहे. लॉकडाऊनमुळे माध्यमांवर काही बंधने आहेत, तसेच साथीचे रोग नियंत्रण कायद्याचा धाक दाखवून सरकारी व्यवस्थेतील अनास्था लपविण्याचा आटोकाट प्रयत्न केला जातोय. यामुळे अनेक बाबी बाहेर आलेल्या नाहीत. (सविस्तर वाचा)


राज्यात कोरोनाचे २९३३ रुग्ण वाढले असून १२३ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आज १३५२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत ३३,६८१ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात सध्या ४१ हजार ३९३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

राज्यात आढळलेले कोरोनाबाधित रुग्ण

First Published on: June 5, 2020 7:33 PM
Exit mobile version