घरमहाराष्ट्रकरोना आरोग्य केंद्रांसाठी डॉक्टर्स, नर्सेस पुरेसे आहेत

करोना आरोग्य केंद्रांसाठी डॉक्टर्स, नर्सेस पुरेसे आहेत

Subscribe

गरजेप्रमाणे डॉक्टरांसह वैद्यकीय मनुष्यबळ उपलब्ध करणार

करोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी महापालिकेच्यावतीने समर्पित आरोग्य केंद्र मोठ्या क्षमतेने उभारणीचे काम सुरू आहे. परंतु या केंद्रांमध्ये सध्या डॉक्टर्स, नर्सेसची कमतरता असल्याने ही केंद्र पूर्ण क्षमतेने सुरू केली जात नसल्याचे बोलले जात आहे. परिणामी आजही करोनाग्रस्तांच्या नातेवाईकांचा खाटांसाठी शोध सुरू आहे. मात्र, महापालिकेच्यावतीने १० हजार खाटांची सुविधा उभारली जात असून यासाठी पुरेसे डॉक्टर्स, नर्सेस आदींची टीम महापालिकडे तयार असल्याचा दावा महापालिकेच्या आरोग्य विभागाचे उपायुक्त रमेश पवार यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर रमेश पवार यांच्याशी ‘दै.आपलं महानगर’चे खास प्रतिनिधी सचिन धानजी यांनी केलेली सविस्तर बातचीत.

जम्बो फॅसिलिटीसाठी नेमक्या किती वैद्यकीय व निम वैद्यकीय कर्मचार्‍यांची गरज भासणार आहे?

- Advertisement -

उपायुक्त : एनएससीआय, वांद्रे-कुर्ला संकुल एमएमआरडीए मैदान, नेस्को, रेसकोर्स, रिचर्डसन अँड क्रुडास, दहिसर, चेंबूर आदी ठिकाणी करोनाच्या आरोग्य केंद्रांची जम्बो फॅसिलिटी उभारली जात आहे. काही ठिकाणी सुरू आहे, तर काही ठिकाणी लवकरच सुरू होईल. त्यामुळे ही सर्व १० हजार खाटांची क्षमता निर्माण होत आहे. साधारणत: शंभर रुग्णांमागे पाच ते सहा डॉक्टर्स आणि १० ते १२ नर्सेस आणि दुप्पट वॉर्डबॉय असा अंदाज असतो. आता नेमक्या याच्या दुप्पट संख्येची गरज असते. ते जर गृहीत धरले तर १ हजार डॉक्टर्स, २ हजार नर्सेस आणि अडीच ते तीन हजार वॉर्डबॉय, आयाबाई एवढा कर्मचारी वर्ग अपेक्षित आहे.

डॉक्टर्सची कमतरता पडतेय असे बोलले जाते?

- Advertisement -

उपायुक्त : मुंबईत मेडिकल कॉलेजचे ३ हजार डॉक्टर्स आहेत. मेडिकल कॉलेजचे काही प्रशिक्षित तसेच निवासी डॉक्टर्स आहेत. त्यांनाही आता बाहेर काढणार आहोत. शिवाय बर्‍याच संस्था आहेत, त्याही डॉक्टर्स देत आहेत. डॉक्टरांची कमतरता भासणार नाही. आजच्या तारखेला असणार्‍या रुग्णशय्येच्या तुलनेत डॉक्टरांची संख्या पुरेशी आहे. आता ज्याप्रमाणे आरोग्य केंद्र सुरू होतील, त्याप्रमाणे डॉक्टर्स उपलब्ध होतील. आमच्याकडे ४ हजार डॉक्टर्सची यादी तयार आहे. ३ हजार नर्सेसची यादी तयार आहे. यामध्ये काही ७० वर्षांचे आहेत. काही आजारी आहेत. काही गरोदर तर काही प्रसुती रजेवर आहेत. तर काही मुंबई बाहेर आहेत. परंतु यातील किमान ५० टक्के जरी डॉक्टर्स व नर्सेस उपलबध झाले तरी दोन हजार डॉक्टर्स उपलब्ध होतील. त्यातील ७०० डॉक्टर्स आधीच सेवेत दाखल झाले आहेत. तर नर्सेस १००० ते १२०० उपलब्ध होतील.

डॉक्टरांच्या मानधनाबद्दल तर गोंधळच आहे?

उपायुक्त : हे खरे आहे की सध्या कंत्राटी पध्दतीवर डॉक्टर्स, नर्सेस, आयाबाई, वॉर्डबॉय यांची तात्पुरती भरती केली जात आहे. त्यामध्ये एमबीबीएस डॉक्टरला ८० हजार रुपये, बीएएमएस डॉक्टरला ६०हजार रुपये, बीडीएस, बीएचएमएस, बी युनानी या डॉक्टर्सना ५०हजार रुपये मानधन दिले जाते. तर नर्सेसना ३०हजार व वॉर्डबॉयला २० हजार एवढे मानधन आहे. तर महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये प्रशिक्षणार्थी डॉक्टर्स आहेत. त्यांना १० ते ११ हजार व निवासी डॉक्टर्स आहेत त्यांना ५५ हजार रुपये दिले जातात. त्यामुळे या प्रशिक्षणार्थी डॉक्टर्सना कोविड कालावधीत ५० हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला जात आहे. तर निवासी डॉक्टर्सना ५५ हजार रुपयांच्या तुलनेत ६५ हजार रुपये देण्यात येत आहे. परंतु सीपीएसचे डॉक्टर आहेत. त्यांना केवळ १५ हजार रुपये दिले जाते. त्यांची मागणी आहे की त्यांना एमबीबीएसच्या डॉक्टरना पूर्वी जेवढे दिले जात होते तेवढे अर्थात ५५ हजार एवढे मानधन मिळावे. एमबीबीएसचे डॉक्टर्स प्रमुख रुग्णालयात आणि सीपीएसचे डॉक्टर्स हे उपनगरीय रुग्णालयात सेवा देतात. परंतु त्यांना कोविड कालावधीत अशाप्रकारे मानधन वाढवून देण्यात काहीच अडचण नाही. अतिरिक्त आयुक्त यावर योग्य तो निर्णय घेतील.

नर्सेसची उपलब्धता कशाप्रकारे केली जात आहे?

उपायुक्त : आता दहा ते बारा हजार नर्सेस आपल्याकडे येणार आहेत. एस.एन.डी.टी कॉलेजच्या नर्सेससह बर्‍याच ठिकाणांहून नर्सेस उपलब्ध होणार आहेत. आयाबाईंची सेवा पुरवणार्‍या संस्था आहेत. त्यांच्याशी संपर्क साधून एक यादी तयार करत आहोत. त्यामुळे जशी गरज भासेल तशी या सर्वांची मदत घेतली जाईल.

मुंबई बाहेरुनही काही डॉक्टर्स, नर्सेस मदतीला येत आहेत?

उपायुक्त : डॉ. तात्यासाहेब लहाने यांच्या प्रयत्नाने मुंबई बाहेरील डॉक्टर्स, नर्सेस मुंबईत येत आहेत. त्यांची मदत आम्ही बीकेसी येथील जम्बो फॅसिलिटीमध्ये घेणार आहोत. वर्धाहून ४० डॉक्टर्स मुंबईत आले होते. त्यांची मदत सेव्हन हिल्स रुग्णालयात घेतली जात आहे. तर अंबेजोगाईतून उपलब्ध होणार्‍या डॉक्टर्सची मदत बीकेसीत घेतली जाणार आहे.

डॉक्टर्स, नर्सेस नाहीत म्हणून जम्बो फॅसिलिटी पूर्ण क्षमतेने सुरू नाहीत काय?

उपायुक्त : नाही! हे एकदम चुकीचे आहे. अजूनही काही कोविड आरोग्य केंद्रांच्या उभारणीचे काम बाकी आहे. जिथे जिथे केंद्राच्या उभारणीचे काम पूर्ण झाले आहे, तिथे तिथे त्यांच्या गरजेप्रमाणे डॉक्टर्स, नर्सेस तसेच इतर कर्मचारी वर्ग उपलब्ध करून दिला जात आहे. आम्ही प्रत्येक आरोग्य केंद्रासाठी एका अधिष्ठात्याची नियुक्ती केली आहे. अधिष्ठात्यांना ज्या ज्या गोष्टींची गरज भासेल त्या त्या गोष्टी आम्ही उपलब्ध करून देत आहोत. मुळात एखाद्या १५ ते २० मजल्याच्या इमारतीत जेवढे डॉक्टर्स लागतात, त्या तुलनेत या केंद्रांमध्ये तेवढ्याच खाटांसाठी कमी डॉक्टर्स तसेच मनुष्यबळ लागते. कारण ते एकाच ठिकाणी, एकाच रांगेत असल्याने सर्व रुग्णांकडे ते धावपळ करू शकतात. त्यामुळे त्यांच्या मागणीनुसार मनुष्यबळ उपलब्ध करून दिले जात आहे.

करोनाच्या धसक्यानेच अनेक जण मरतात, एवढी भयानक परिस्थिती आहे का?

उपायुक्त : मुळात आज माध्यमांची भूमिका खूप महत्त्वाची आहे. पुढील काही दिवस तरी आपल्याला करोनासोबतच जगावं लागणार आहे. करोनामुळे एवढी भयानक परिस्थिती झाल्यामुळे लोक घाबरलेले आहेत. ही वस्तूस्थिती असली तरी तसे करोनाला घाबरण्याची गरज नाही. प्रत्येक नागरिकांनी योग्यप्रकारे काळजी घेतली तरीही आपण यापासून स्वत:चा बचाव करू शकतो. आता जो काही आपण मृत्यूचा ट्रेड बघतोय. तो पाहता मृत्यूचे प्रमाण कमीच आहे. मागील वर्षी म्हणजे २०१९ मध्ये जानेवारी, फेब्रुवारी, मार्च व एप्रिलमध्ये एकूण मृतांची संख्या ३० हजार होती. ती या वर्षी या चारही महिन्यात २६ हजार एवढी आहे. अर्थात लॉकडाऊनमुळे रेल्वे गाड्यांचे अपघात, वाहनांचे अपघात यांच्यामुळे आकडेवारी कमी असली तरी मागील वर्षाच्या तुलनेत मृतांची संख्या कमीच आहे. त्यामुळे घाबरण्याचे काहीही कारण नाही. पण बिनधास्तही राहणे योग्य नाही. करोनामुळे जे मृत्यू झाले आहेत, त्यांच्यात ६० वर्षांच्या पुढील अधिक रुग्ण असून त्यांना विविध प्रकारचे आजारही होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -