मी नाही त्यातली…

मी नाही त्यातली…

सिने अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्येनंतर एनसीबीने पर्दाफाश केलेल्या ड्रग्ज कनेक्शनप्रकरणी शनिवारी बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्री दीपिका पादूकोण, सारा अली खान आणि श्रद्धा कपूर यांची एनसीबीच्या अधिकार्‍यांनी तब्बल सहा ते सात तास कसून चौकशी केली. या तिघींच्या चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे करण्यात एनसीबीला यश आले आहे. आपण निर्दोष असून सुशांत ड्रग्ज घेत होता, अशी कबुलीच या तिघींच्या चौकशीतून समोर आली आहे. सारा आणि श्रद्धा ड्रग्ज घेतल्याचा इन्कार करत असताना दीपिकाने मात्र आपण ड्रग्ज नाही तर खास सिगारेट पित असल्याची कबुली दिली.

या तिघींनाही ड्रग्जसहीत ड्रग्जसंदर्भात चॅट आणि सुशांतसोबत असलेल्या संबंधाबाबत प्रश्न विचारण्यात आले होते. गरज पडल्यास त्यांना पुन्हा चौकशीसाठी समन्स बजाविले जाईल, असे एनसीबीकडून सांगण्यात आले. दरम्यान दीपिकाची मॅनेजर करिश्मा प्रकाश हिचीही शनिवारी चौकशी झाली होती.

सुशांतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील ड्रग्ज कनेक्शनचा सीबीआय आणि एनसीबीने पर्दाफाश करून यासंदर्भात संबंधितांविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा नोंदविला होता. यानंतर रियासह बारा जणांना या पथकाने अटक केली होती. सध्या सर्व आरोपी न्यायालयीन कोठडीत विविध कारागृहात आहेत. या चौकशीत काही बॉलीवूड अभिनेत्रींचे नाव समोर आले होते, शुक्रवारी सिने अभिनेत्री रकुलप्रीत सिंग हिची चौकशी झाली होती. या चौकशीनंतर शनिवारी दीपिका पादूकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर या तिघींना चौकशीसाठी समन्स पाठविण्यात आले होते. त्यानंतर दीपिका आणि तिची मॅनेजर करिश्मा हे दोघेही कुलाबा येथील गेस्ट हाऊस तर सारा आणि श्रद्धा हे एनसीबीच्या बेलार्ड पिअरच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर झाल्या होत्या.

दीपिका ही सकाळी पावणेदहाला आली आणि सायंकाळी चार वाजता निघून गेली. तिची तब्बल सहा तास चौकशी करण्यात आली. दीपिकाच्या चेहर्‍यावर चौकशीचा तणाव स्पष्टपणे दिसत होते. त्यापूर्वी साडेपाच तासाच्या चौकशीनंतर करिश्माला चौकशी करून सोडून देण्यात आले. या दोघांची समोरासमोर चौकशी करण्यात आली होती. त्यांची ड्रग्जची मागणी, व्हॉट्स अ‍ॅप चॅटसंदर्भात चौकशी झाली. दीपिकाला सुरुवातीला एनडीपीएस कलमांची माहिती देण्यात आली होती. तिच्यासाठी एक प्रश्नावलीच तयार करण्यात आली होती. करिश्माची सलग दुसर्‍या दिवशी चौकशी झाली.

दुसरीकडे श्रद्धा ही दुपारी साडेबारा वाजता तर सारा ही पाऊणच्या सुमारास एनसीबी कार्यालयात आले होते. यावेळी साराला ड्रग्ज तर श्रद्धाला सीबीडी ऑईलबाबत प्रश्न विचारण्यात आले. या दोघींनी सुशांत हा ड्रग्ज घेत असल्याची कबुली देताना आपण कधीच ड्रग्जचे सेवन केले नाही. अनेकदा पार्टीत ड्रग्ज असल्याचे सांगितले. साराने ती सुशांतसोबत रिलेशनमध्ये होती. मात्र, नंतर त्यांची मैत्री तुटल्याचे सांगितले. श्रद्धानेही सुशांतसोबत पुण्यातील एका फॉर्म हाऊसमध्ये पार्टी केल्याची कबुली दिली. ते दोघेही चांगले मित्र होते. सुशांत ड्रग्ज घेत असल्याची माहिती तिला होती. तिने त्याला ड्रग्ज घेऊ नये, असा सल्लाही दिला होता.असेही तिने आपल्या जबानीत सांगितले. या जबानीनंतर त्यांना सोडून देण्यात आले. या दोघींची एनसीबीचे डेप्युटी डायरेक्टर मुथा जैन, झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी चौकशी केली. नव्याने आता कोणालाही समन्स बजाविण्यात आले नाही, असे एनसीबीकडून सांगण्यात आले. या जबानीनंतर पुढील कारवाई काय करायची ते ठरविले जाईल.

ड्रग्जप्रकरणी क्षितीज रवीप्रसादला अटक

ड्रग्ज कनेक्शनप्रकरणी धर्मा प्रोडक्शनसाठी पूर्वी काम करणारा मॅनेजर क्षितीज रवीप्रसाद याला शनिवारी नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या अधिकार्‍यांनी अटक केली. त्याला रविवारी लोकल कोर्टात हजर केले जाणार आहे. क्षितीजवर पार्टीमध्ये ड्रग्ज पुरविल्याचा आरोप असून त्याच्या अटकेनंतर इतर काही बॉलीवूड कलाकारांच्या नावाचा पर्दाफाश करण्यात या पथकाला यश आल्याचे बोलले जाते. दरम्यान आपण क्षितीजला ओळखत नसून त्याच्यासोबत कधीही भेट झाली नसल्याचा खुलासा सिने दिग्दर्शक आणि निर्माता करण जौहर यांनी केला आहे. सोशल मीडियावर त्यांनी हा खुलासा केला आहे. सुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी ड्रग्ज कनेक्शन आल्यानंतर आतापर्यंत बारा जणांना एनसीबीने अटक केली होती. त्यांच्या चौकशीत क्षितीजचे नाव समोर आले होते. त्यानंतर त्याच्या अंधेरीतील वर्सोवा येथील राहत्या घरी या पथकाने छापा टाकला होता. या कारवाईत या अधिकार्‍यांना काहीच सापडले नाही. मात्र, क्षितीजला शुक्रवारी या पथकाने चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्याची तब्बल वीस ते बावीस तास कसून चौकशी करण्यात आली. या चौकशीत त्याने बॉलीवूड पार्टीमध्ये ड्रग्ज पुरविल्याची कबुली दिली. तो हशीश आणि एमडी विक्री करीत असल्याचा आरोप आहे. क्षितीजच्या घरी नेहमीच पार्टी होत होती. त्यात काही बॉलीवूड कलाकार हजर राहत होते. याच पार्टीमध्ये त्याने अनेकदा ड्रग्ज घेऊन आल्याची कबुलीच दिली आहे. या कबुलीनंतर त्याला या पथकाने शनिवारी अटक केली. मेडीकल केल्यानंतर रविवारी दुपारी त्याला लोकल कोर्टात हजर केले जाणार आहे. क्षितीजच्या अटकेने बॉलीवूडमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. त्याच्या चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे झाल्याने आगामी काळात इतर काहींची चौकशी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, माझ्या घरी झालेल्या पार्टीत कधीच ड्रग्जचा पुरवठा झालेला नाही. पार्टीत कोणीही ड्रग्ज आणले नाही किंवा ड्रग्ज सेवन झाले नाही. अनुभव चौप्रा आणि क्षितीजचा धर्मा प्रोडक्शनशी काहीही संबंध नाही. मी या दोघांनाही ओळखत नाही किंवा कधीही भेटलो नाही, असा खुलासा करण जौहर याने केला आहे.

पापाराझींवर कारवाई करणार

ड्रग्ज कनेक्शन प्रकरणी नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर राहणार्‍या सिनेअभिनेत्रींच्या कारचा पाठलाग करणार्‍यांविरुद्ध सक्त कारवाई करणार असल्याचे पोलीस उपायुक्त संग्रामसिंह निशाणदार यांनी सांगितले. टीव्ही मीडियाच्या प्रतिनिधींना एक प्रकारे इशारा देत त्यांनी कार जप्तीची कारवाई करून वाहनचालकाला अटक केली जाईल, असे सांगितले.

सुशांत सिंग राजपूत आत्महत्येनंतर सीबीआयने बॉलिवूडमधील ड्रग्ज कनेक्शनचा पर्दाफाश करून एनसीबीला स्वतंत्र गुन्हा नोंदवून तपासाची विनंती केली होती. या विनंतीनंतर एनसीबीने ड्रग्ज प्रकरणात गुन्हा नोंदवून तपासाला सुरुवात केली होती. याच गुन्ह्यात सुशांतची प्रेयसी रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शौविक चक्रवर्तीसह बारा जणांना अटक झाली होती. या प्रकरणाच्या तपासादरम्यान बॉलिवूडच्या काही अभिनेत्रींचे नाव समोर आले होते. त्यानंतर या अभिनेत्रींना चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजाविण्यात आले होते. त्यात दीपिका पादुकोण, सारा अली खान, रकुलप्रीत सिंग, श्रद्धा कपूरसह इतर बॉलिवूडशी संबंधित व्यक्तींचा समावेश आहे.

चौकशीसाठी येणार्‍या अभिनेत्रीच्या कारचा काही खासगी चॅनेलचे प्रतिनिधी पाठलाग करतात, जिवावर बेतून कारचा पाठलाग करताना ते स्वत:सह समोरील व्यक्ती तसेच रस्त्यावरुन जाणार्‍या पादचार्‍यांच्या जिवाशी खेळत आहेत. याबाबत काही व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड झाले आहेत. या घटनेची वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी गंभीर दखल घेत मीडियाच्या प्रतिनिधींनी एनसीबी कार्यालयात चौकशीसाठी येणार्‍या अभिनेत्रींच्या कारचा पाठलाग करू नका, त्यांच्यासह इतरांशी जिवाशी खेळ न करता संयमाने आपले काम करावे, यापुढे कोणीही अशा प्रकारे कृत्य करताना आढळून आल्यास संबंधित कार जप्त करून वाहनचालकावर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशाराच पोलीस उपायुक्त संग्रामसिंह निशाणदार यांनी दिला आहे.

First Published on: September 27, 2020 6:51 AM
Exit mobile version