कोकणातील नारळफोडी स्पर्धांना आपत्तींचे ग्रहण

कोकणातील नारळफोडी स्पर्धांना आपत्तींचे ग्रहण

कोकणातील नारळफोडी स्पर्धांना आपत्तींचे ग्रहण

नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधनाला उणेपुरे दोन दिवस उरले असताना या दिवसात कोकणात रंग चढतो तो गावोगावच्या नारळफोडी स्पर्धांना! परंतु गेल्या वर्षी मार्च महिन्यापासून कोरोना महामारीमुळे सुरू झालेले लॉकडाऊनचे निर्बंध, त्यानंतर आलेल्या निसर्ग आणि तोक्ते चक्रीवादळाच्या अस्मानी संकटामुळे कोकणातील नारळ सुपारीच्या बागा जमिनदोस्त झाल्याने नारळाचे उत्पादन घटले.परिणामी या नारळफोडी स्पर्धांना अशा विविध आपत्तींचे ग्रहण लागले असून, या खेळातील स्पर्धकांच्या उत्साहावर पाणी फेरले आहे.

संपूर्ण रायगड जिल्ह्यात जवळपास ४३० हेक्टर जमिनीवर नारळ सुपारीची लागवड करण्यात आली असून त्यात सुपारीबरोबरच नारळाचे मोठे उत्पादन घेतले जाते. परंतु येथील बहुतांशी बागायतीमधील कच्चा नारळ (शहाळी) मुंबई, ठाणे, पुणे यासारख्या शहरात विक्रीस जातो. शहरातील रुग्णालयांतील आजारी रुग्णांना शहाळ्याचे पाणी जलसंजीवनी ठरते. पण काही बागायतदार सुकलेल्या नारळांच्या विक्रीचा व्यवसाय करतात, असे सुकलेले नारळ या नारळफोडीकरिता वापरले जातात.

स्पर्धेसाठी खास खेळी, ज्यांची करवंटी जाड आणि फुटण्यास अत्यंत चिवट असते, असे नारळ वापरले जातात. कित्येक नारळांच्या झाडांमध्ये असे एखादे झाड असते. नांदगाव, मुरुड, चौल, रेवदंडा, नागाव, अलिबाग, श्रीवर्धन, दिवेआगर, बोर्लीपंचतन आदीसह वसईसारख्या ठिकाणी अशा प्रकारचे खेळी नारळ १०० रुपयांपासून १ हजार किमतीला विकत आणले जातात. बरेचसे स्पर्धक अशा नारळांचे झाडच वर्षाच्या बोलीने खरेदी करतात.

जवळपास दीप अमावस्येपासून या स्पर्धांना प्रारंभ होतो. हजारो रुपयांच्या रोख रकमेच्या बक्षिसांबरोबरच सोन्याची अंगठी, चेन, ब्रेसलेटसारखी बक्षिसेही ठेवली जातात. त्यामुळे स्पर्धा जिंकण्यासाठी स्पर्धक मोठा खर्च करून खेळी नारळ गोळा करतात. यात महत्त्व असते ते नारळ घेऊन खेळणार्‍याला! अशा फटकेबाज खेळाडूंचाही स्पर्धेत गौरव होतो. त्याला खास बक्षीस मिळते. निसर्ग आणि तोक्ते चक्रीवादळात अनेक बागायतदारांची खेळी नारळांची झाडे जमीनदोस्त झाली. कोरोनामुळे जमावबंदी आली, तर अनेकांचे व्यवसाय बंद पडले. रोजगार बुडाल्याने सर्वच हौसेमौजेवर निर्बंध आल्याने कोकणात केवळ हौसमौज करण्यासाठीच खेळल्या जाणार्‍या नारळफोडी स्पर्धेलाही आता ग्रहण लागले आहे.


हेही वाचा – बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळाचं दुग्धाभिषेकानं शुद्धीकरण, नारायण राणेंनी घेतलं होतं दर्शन


 

First Published on: August 19, 2021 8:22 PM
Exit mobile version