सिडको अधिकार्‍यांच्या मनमानीमुळे प्रवासी वाहतुकीवर भार

सिडको अधिकार्‍यांच्या मनमानीमुळे प्रवासी वाहतुकीवर भार

सिडको अधिकार्‍यांच्या मनमानीमुळे प्रवाशी वाहतुकीचा भूर्दंड प्रवाशांवर

सिडकोच्या दुर्लक्षापायी पावसाळ्याच्या ऐन तोंडावर फुंडा येथील छोटा पूल निकामी झाल्याचे निमित्त करत उरणहून परगावी जाणार्‍या प्रवासी बसेसचा मार्ग बंद करण्यात आला आहे. यामुळे एसटी आणि एनएमएमटीने प्रवास करणार्‍या उरणकरांवर प्रवासासाठी पाच रुपयांचे अतिरिक्त ओझे पडले आहे. हा मार्ग एकमार्गीपध्दतीने सुरू करण्याची जोरदार मागणी उरणमधून होते आहे. उरण तालुक्यातील फुंडा येथे सिडकोच्या कार्यालयाजवळ उरण-पनवेल महामार्गातील पुलाला तडे गेले असल्याचे निमित्त करत हा मार्ग मोठ्या वाहनांसाठी बंद करण्यात आला आहे. या मार्गावरून मोठ्या संख्येने प्रवासी वाहतूक होते. खाजगी वाहनांशिवाय एसटी आणि एनएमएमटीची वाहतूकही होत असते. सिडकोने अचानक पूल नादुस्त ठरवून टाकत या महार्गावरील जड वाहतूकीला बंदी घातली. विशेष म्हणजे लहान पुलाच्या या नादुरुस्तीकडे जवळच कार्यालय असूनही सिडकोच्या अधिकार्‍यांचे लक्ष गेले नाही, याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.

सिडकोच्या संबंधित अधिकार्‍यांनी पूल नादुरुस्त ठरवून टाकत तेथील वाहतूक बंद केल्याने मोठा वळसा घालून प्रवासी बसेसना मार्गक्रमण करावे लागत आहे. सुमारे तीन किलोमीटरचा अतिरिक्त पल्ला बसेसला मारावा लागतो आहे. यामुळे वेळ वाया जातोच शिवाय अतिरिक्त भाडेही मोजावे लागत आहे. प्रतितिकीट पाच रुपयांचा या प्रवासासाठी अतिरिक्त आकारले जात आहेत. सिडकोने या पुलाची तातडीने दुरुस्ती करावी, अथवा मार्ग मोकळा करावा, अशी मागणी होऊ लागली आहे.

सिडकोची डोळेझाक

फुंडा येथील छोट्या पुलाचे नादुरुस्तीचे निमित्त करत सिडकोने मोठ्या वाहनांना मार्ग बंद केल्याने संबंधितांवर आर्थिक ताण पडू लागला आहे. हे काम पाऊस सुरू होण्याआधीच पूर्ण करता आले असते. पण जाणीपूर्वक दुर्लक्ष केल्याने मार्गच बंद करण्याचा मार्ग सिडकोन अवलंबला. हा सारासार उरणकरांना भूर्दंड देण्याचा प्रकार आहे.
-जयेश म्हात्रे, बोरी, उरण

लोकप्रतिनिधी कुठायत?

महामार्ग मोठ्या वाहनांना बंद करण्यात आल्याने मुख्यत्वे प्रवासी वाहतूक करणार्‍या बसेसना मोठा पल्ला पार करावा लागतो आहे. हा भार सोसणे एसटी आणि इतर परिवहन सेवांना शक्य नाही. यामुळे तिकीटवाढ करण्यात आली. पण पुलाविषयी जराही पुढाकार लोकप्रतिनिधी घेत नाहीत, याचे आश्चर्य वाटते. लोकप्रतिनिधींनी वेळीच दखल घेतली असती तर ही आफत उरणकरांवर आली नसती.
-रविंद्र कांबेकर करंजा, उरण


हे ही वाचा – मुख्यमंत्री थोड्याच वेळात घेणार राज्यपालांची भेट; १२ आमदार नियुक्तीबाबत तोडगा निघण्याची शक्यता


 

First Published on: September 1, 2021 7:56 PM
Exit mobile version