शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईकांच्या ठाण्यातील घर, कार्यालयांवर ईडीचा छापा

शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईकांच्या ठाण्यातील घर, कार्यालयांवर ईडीचा छापा

विहंग सरनाईक

ठाण्याच्या ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघातून सलग तीन वेळा शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आलेले आमदार, प्रवक्ते प्रताप सरनाईक यांच्या मुंबई, ठाण्यातील घरासह कार्यालयांवर ईडी (अंमलबजावणी संचालनालय) पथकाने मंगळवारी सकाळीच छापा टाकल्याने एकच खळबळ उडाली. जवळपास साडेचार तासांच्या शोध मोहिमेनंतर सरनाईक यांचे पुत्र विहंग सरनाईक यांना ताब्यात घेऊन ईडी पथक मुंबईकडे रवाना झाले. या शोध मोहिमेत ईडीच्या पथकाने सरनाईक यांच्या हिरानंदानी इस्टेट येथील २८ व २९ मजल्यावरील निवासस्थानाबरोबर त्यांच्या वसंत लॉन, छाब्रिया पार्क, देव कॉर्पोरा या कार्यालयासह अन्य ठिकाणीही कसून तपासणी केली. त्यानंतर ईडीच्या फोर्टच्या कार्यालयात विहंगची पाच तास चौकशी केली. प्रताप सरनाईक यांनी ईडीच्या छाप्यानंतर प्रभादेवीच्या सामना कार्यालयात खासदार संजय राऊत यांची दीड तास भेट घेतली.

हिरानंदानी इस्टेट येथे नेहमीप्रमाणे मंगळवारी सकाळी ७.३० वाजता मॉर्निंग वॉकला निघालेल्या या संकुलातील रहिवाशी ईडीचे पथक दाखल झाल्याचे पाहून आश्चर्यचकित झाले. त्या पथकाने आमदार सरनाईक यांच्या निवासस्थान आणि कार्यालये अशा १० ठिकाणी शोध मोहीम सुरु केली. तसेच त्या प्रत्येक ठिकाणी बीएसएफचे जवान, स्थानिक पोलीस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी आणि ईडीचे एक – एक पथक कार्यरत असल्याचे दिसून येत होते. ही बातमी वार्‍यासारखी पसरताच प्रसार माध्यमांनी हिरानंदानी येथे गर्दी केली. ज्या ठिकाणी ईडीच्या पथकाने शोध सुरू केला त्या इमारतीच्या प्रवेशद्वारावर बीएसएफच्या जवानांसह स्थानिक पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी देखील तैनात होते.

सुमारे आठ वाजण्याच्या सुमारास इमारतीच्या २८ आणि २९ व्या मजल्यावरील सरनाईक यांच्या निवासस्थानी जाऊन ईडीच्या पथकांनी तब्बल साडेचार तासांची ही तपासणी सुरु असतानाच दुपारी १२ च्या सुमारास ईडीचे पथक सरनाईक यांचे ज्येष्ठ सुपुत्र विहंग याच्यासह इमारतीतून खाली आले. तातडीने विहंग याला गाडीत बसवत ती गाडी तेथून ईडीच्या मुंबईतील कार्यालयाकडे रवाना झाली.

सरनाईक राजकारणाबरोबर ते सुपरिचित व्यावसायिक
आमदार प्रताप सरनाईक हे राजकारणात सक्रिय तर आहेत, शिवाय बांधकाम व्यावसायिक म्हणूनही त्यांचे नाव सर्वांना आजही सुपरिचित आहे. याशिवाय त्यांनी मराठी चित्रपट निर्मिती क्षेत्रातही नशीब आजमावले असून तेथे त्यांनी जम बसविण्याचा प्रयत्न केला आहे. तर, त्यांचे ठाण्यातील वर्तकनगर, घोडबंदर या भागात हॉटेल्स आहेत. त्याचबरोबर ते आता हॉस्पिटल्स व्यावसायासह शिक्षण क्षेत्रात उतरले आहेत.

आमदार सरनाईक यांची हेतूपुरस्सर इडी चौकशी, काँग्रेसचा आरोप
आमदार सरनाईक यांच्या ठाण्यातील घरासह कार्यालयात ईडी पथकाने टाकलेले छापे हेतूपुरस्सर टाकण्यात आले असल्याचा आरोप ठाणे शहर काँग्रेसने केला आहे.अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण,अर्णब गोस्वामी आणि कंगना रानौत प्रकरणात शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी बाजू लावून धरली होती. त्यामुळेच त्यांचा आवाज दाबण्यासाठी त्यांच्या विरोधात हा चौकशीचा फार्स सुरु केल्याचा आरोप शहर काँग्रेसचे प्रवक्ते सचिन शिंदे यांनी केला.

ईडीने का कारवाई केली हे माहिती नाही
ईडीने सर्वत्र छापेमारी केल्यानंतर अखेर नऊ तासांनी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. ईडीने का कारवाई केली याची मला माहिती नाही. हीच माहिती घेण्याचा मी प्रयत्न करत आहे, असे सरनाईक यांनी स्पष्ट करत यापुढे कायदेशीर लढाई लढणार असल्याचेही त्यांनी सांगितले. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरावर, कार्यालयावर ईडीने मंगळवारी छापे मारले. त्यानंतर त्यांचे चिरंजीव विहंग सरनाईक यांना ताब्यात घेतले. यावेळी प्रताप सरनाईक घरी नव्हते. ते परदेशात असल्याचे बोलले जात होते. मात्र, ते मुंबईतच होते. ईडीचे हे काय प्रकरण आहे? माझ्या मुलाला कशाला बोलावले हे मला माहीत नाही, असे सरनाईक यांनी यावेळी सांगितले.

मंत्रीपदाच्या शर्यतीत होते
शिवसेनेच्या तिकिटावर सरनाईक हे सलग तीन वेळा ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत. त्यामुळे त्यांना महाविकास आघाडीत मंत्रीपदाची अपेक्षा होती. ते शर्यतीतही होते. परंतु त्यांना दुसर्‍यांदा मंत्रीपद मिळाले नाही. परंतु शिवसेनेने त्यांना प्रवक्ते हे पद दिले. सरनाईक यांचा नगरसेवक ते आमदार असा प्रवास असून सध्या त्यांचा दोन नंबरचा मुलगा पूर्वेश विद्यमान नगरसेवक असून ते युवा सेनेचे सचिव आहेत. तसेच सरनाईक यांच्या पत्नी परिशा या देखील दोन वेळा नगरसेविका म्हणून ठाणे महापालिकेत निवडून आल्या आहेत. तसेच विहंग हे माजी नगरसेवक असून सध्या ते मुंबई क्रिकेट असोसिएशनचे (एमसीएम) सदस्य देखील आहेत.

मालमत्ता १२६ कोटी
आमदार प्रताप सरनाईक यांनी २०१९ मध्ये विधानसभा निवडणुकीच्या वेळी निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात १२६.२९ कोटी रुपये इतकी स्थावर आणि जंगम मालमत्ता दाखवली होती. तसेच त्यांनी ११० कोटी ९६ लाख ५८ हजार १६८ रुपयांचे कर्ज असल्याचे नमूद केले होते. दाखवलेल्या मालमत्तेत १०४ कोटी ४० लाख १० हजार २०० इतकी स्थावर मालमत्ता आहे. याशिवाय त्यांच्याकडे टोयोटो, लॅण्ड क्रूझर ही वाहने असून २५ तोळे सोन्याचे दागिने आहेत. त्याचबरोबर त्यांच्या पत्नीचे नावे टोयाटो इनोव्हा, टोयाटो इनोव्हा क्रिस्टा या गाड्या असून ५० तोळ्यांचे दागिने, गाळा व सदनिका असे प्रतिज्ञापत्रात दाखवले आहे.

लोकांच्या प्रश्नांची उत्तरे देण्याऐवजी राजकीय विरोधकांविरोधात सरकारी तपास यंत्रणांचा वापर केला जात आहे. महाराष्ट्रात पुन्हा सत्ता मिळत नाही म्हणून ईडीची कारवाई करण्यात आली आहे. सत्ता गेल्याचा त्रास होत असतो. मी समजू शकतो, त्या त्रासाच्या उद्वेगाच्या पोटी काही लोक चुकीचे शब्द वापरतात. त्यांची सत्ता गेली ही त्यांची अस्वस्थता आहे. त्यांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही.
-शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस.

आम्ही कोणाच्या बापाला घाबरत नाही. हिंमत असेल तर घरी या आणि अटक करा. ईडी असो किंवा कोणीही असो त्यांनी राजकीय पक्षाची शाखा असल्यासारखे काम करु नये. आता तर पुढील २५ वर्षे तुमचे सरकार येणार नाही ही काळ्या दगडावरची रेघ आहे. त्यामुळे ते स्वप्न विसरुन जा. आज जर तुम्ही सुरुवात केली असेल तर शेवट कसा करायचा आम्हाला माहिती आहे.
-संजय राऊत, प्रवक्ते, शिवसेना.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या आणि इतर प्रकरणांमध्ये सरनाईक अतिशय आक्रमकपणे बोलत होते. सरकारची बाजू मांडत होते. त्यामुळे ही कारवाई अपेक्षित होती. विरोधी सूर उमटला की लगेच कारवाई होते. राज्यात आम्ही सत्ता स्थापन केली, तेव्हाच अशा प्रकारच्या अडचणी येणार याची कल्पना होती. ईडी म्हणजे केंद्र सरकारच्या हातातील बाहुले आहे. केंद्राकडून केवळ आणि केवळ सूडबुद्धीचे राजकारण सुरू आहे.
-छगन भुजबळ, अन्न व नागरी पुरवठा मंत्री.

ईडीसारख्या तपास यंत्रणेवर चिखलफेक करणे उचित नाही. @rautsanjay61 साहेब! माध्यमे आणि विरोधी मत मांडणार्‍या सर्वसामान्यांना जेलमध्ये टाकताना,कुणी, कुणाला स्वपक्षाच्या शाखेप्रमाणे वागवले होते? सुरुवातही जनता करते आणि शेवटही जनताच करते.-प्रवीण दरेकर, विरोधी पक्षनेते, विधान परिषद.

आमदार प्रताप सरनाईक यांच्यावरील ईडीची कारवाई दुर्दैवी आणि आक्षेपार्ह आहे. केंद्रातील भाजप सरकार सूडबुद्धीने कारवाई करत असून भाजपविरोधात बोलणार्‍यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. ईडी, सीबीआयसारख्या केंद्राच्या तपास यंत्रणांचा राजकीय कारणांसाठी वापर करून विरोधकांना धमकावण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशी कारवाई भाजपशासित राज्यात झाल्याचे दिसत नाही.
-बाळासाहेब थोरात, महसूल मंत्री , काँग्रेस.

First Published on: November 25, 2020 6:40 AM
Exit mobile version