बिहारमधील प्रत्येक व्यक्तीला कोरोना लस टोचणार

बिहारमधील प्रत्येक व्यक्तीला कोरोना लस टोचणार

बिहार विधानसभा निवडणुकांसाठी भारतीय जनता पक्षाने आपला निवडणुकीचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. पुढील पाच वर्षांसाठी ‘आत्मनिर्भर बिहार’चा रोडमॅप प्रसिद्ध करत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कोरोना लसीबाबत मोठे आश्वासन बिहारी जनतेला दिले आहे. कोरोना लसीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात सुरू झाल्यानंतर बिहारमधील प्रत्येक व्यक्तीला ही लस मोफत टोचली जाईल, असे सीतारामन म्हणाल्या. हे आमच्या निवडणुकीच्या जाहीरनाम्यातील पहिले वचन असून कोविड-१९ च्या लसीचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन सुरू होताच बिहारमधील प्रत्येक व्यक्तीचे मोफत लसीकरण केले जाईल, असे त्या म्हणाल्या.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पाटणा येथे भारतीय जनता पक्षाच्या जाहीरनाम्याचे प्रकाशन केले. या जाहीरनाम्यात पुढील पाच वर्षांसाठी आत्मनिर्भर बिहारसाठी ५ सूत्र, १ लक्ष्य आणि ११ संकल्पांवर भर देण्यात आला आहे. यावेळी बिहार भाजप जाहीरनामा समितीचे अध्यक्ष आणि कृषीमंत्री डॉ. प्रेमकुमार, बिहार भाजपचे प्रभारी भूपेंद्र यादव, बिहार भाजपचे प्रदेशाध्यक्ष डॉ. संजय जायसवाल उपस्थित होते.

बिहारी लोकांना राजकारण आणि इतर अनेक गोष्टींची चांगली समज आहे, असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटले. जे बोलतो ते करतो असा देशात एकच पक्ष आहे. बिहारच्या जनतेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. कोरोना महासाथ आणि लॉकडाऊननंतर पंतप्रधान मोदींनी गरिबांना मोफत धान्य देण्याची घोषणा केली होती. संपूर्ण देशाबरोबरच बिहारमध्ये देखील छठ पर्वापर्यंत गरिबांच्या घरापर्यंत धान्य पोहोचवले जात आहे, असे सीतारामन म्हणाल्या.

बिहार राज्याचा सन १९९० ते सन २००५ पर्यंत संपूर्ण अर्थसंकल्प सुमारे २३ हजार कोटी रुपये इतका होता, तर सन २००५ ते २०२० पर्यंत एनडीएचे सरकार असताना हा अर्थसंकल्प २ लाख ३० हजार कोटी रुपये इतका झाला आहे, असे केंद्रीय अर्थमंत्री म्हणाल्या. बिहारचे डरडोई उत्पन्न देखीव वाढले असून मागील सरकारच्या १५ वर्षांच्या तुलनेत एनडीएच्या १५ वर्षांत यात मोठी वाढ झाली आहे, असेही त्या पुढे म्हणाल्या.

First Published on: October 23, 2020 7:10 AM
Exit mobile version