लसीकरणासाठी नागरिकांना रात्रभर जागावे लागते, शिवसैनिकांनी मांडली कैफियत

लसीकरणासाठी नागरिकांना रात्रभर जागावे लागते, शिवसैनिकांनी मांडली कैफियत

लसीकरणासाठी नागरिकांना रात्रभर जागावे लागते, शिवसैनिकांनी मांडली कैफियत

लसीकरणासाठी लोकांना पनवेल महानगरपालिका क्षेत्रात रात्रभर जागून काढावी लागते. अशा कठीण परिस्थितीतही लसीकरण केंद्रावर कोणतीही सुविधा नाही. रांगा लावून लोक त्रासताहेत. या लसीकरणासाठी योग्य त्या सुविधेचा अंमल करण्याची मागणी शिवसेना महानगरप्रमुख रामदास शेवाळे यांनी पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांच्याकडे केली आहे. पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून आरोग्य केंद्रांवर तसेच इतर ठिकाणी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाची सोय करण्यात आली आहे. या ठिकाणी उपलब्ध लसीच्या संख्येप्रमाणे नागरिकांना लस दिली जाते. वास्तविक पाहता एकूण लोकसंख्या आणि मिळणारी लस यांच्या प्रमाणामध्ये मोठी तफावत आहे. त्यामुळे केंद्रावर लस घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. खाजगी रुग्णालयांमध्ये लसीकरण केले जात असले तरी त्या ठिकाणी शुल्क आकारले जात आहे. कोरोना वैश्विक संकटामध्ये आर्थिक स्थिती बेताची झाल्याने अनेक कुटुंबांना पैसे देऊन लस घेणे शक्य होत नाही. त्यामुळे ते शासकीय लसीकरण केंद्रावर मोफत लस देण्याला प्राधान्य देत आहेत. अल्प उत्पादन गट आणि सर्वसामान्य कुटुंबातील अनेक जण येथे रांगा लावून लस घेतात. कळंबोली येथील गुरुद्वारा समोरील लसीकरण केंद्रावर रात्री बारा वाजल्यापासून नागरिक रांगा लावत आहेत.

अशीच परिस्थिती एकंदरीत पालिका क्षेत्रातील सर्वच केंद्रावर आहे. कोरोना प्रतिबंधात्मक लस घेण्यासाठी हे नागरिक संपूर्ण रात्र रस्त्यावर जागून काढतात. डासांचा उपद्रव त्यांना सहन करावा लागतो. धुळीचा त्रास संबंधितांना होतो. त्याचबरोबर पाऊस येत असल्यास छत्री घेऊन तेथेच थांबावे लागते. सकाळी आठ वाजता त्यांना टोकन वाटप केले जाते. लसीकरण केंद्रामध्ये खुर्च्या त्याच बरोबर बसण्यासाठी व्यवस्था आहे. त्या ठिकाणी लाईट आणि फॅन ची सोय सुद्धा आहे. मात्र येथील कर्मचारी नागरिकांना केंद्रात प्रवेश करू देत नाहीत. परिणामी मोठया गैरसोयीला आणि त्रासाला त्यांना सामोरे जावे लागत आहे. इतर वसाहतींमध्ये ही थोड्याफार फरकाने हीच स्थिती आहे. यासंदर्भात पनवेल महानगरपालिकेने योग्य त्या उपाययोजना करून नागरिकांची गैरसोय होणार नाही, याची दखल घ्यावी, अशी मागणी शेवाळे यांनी पालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांच्याकडे केली.

लसींचा साठा वाढवण्यासाठी पनवेल महापालिका प्रशासनाने पाठपुरावा आणि प्रयत्न करावेत असेही शेवाळे यांनी सूचवले आहे. ही व्यवस्था न सुधारल्यास आंदोलन करावे लागेल, असा इशारा शिवसेना पनवेल महानगरप्रमुख रामदास शेवाळे यांनी यावेळी दिला.


हे ही वाचा – siddharth shukla death: बिग बॉस फेम सिद्धार्थ शुक्लाचे निधन


 

First Published on: September 2, 2021 2:24 PM
Exit mobile version