आद्य क्रांतिकारक उमाजी नाईक

आद्य क्रांतिकारक उमाजी नाईक

उमाजी नाईक यांचा आज स्मृतिदिन. उमाजी नाईक हे एक क्रांतिकारक होते. एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभी घडून आलेल्या रामोशांच्या उठावात उमाजी नाईक यांचे नेतृत्व महत्त्वाचे होते. त्यांचा जन्म ७ सप्टेंबर १७९१ रोजी पुणे जिल्ह्यातील भिवडी येथे झाला. वडील दादोजी खोमणे हे पुरंदर किल्ल्याचे रखवालदार म्हणून काम करत होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून अनेक किल्ल्यांची राखणदारी या समाजाकडे सोपविण्यात आली होती.

उमाजी लहानपणापासून वडिलांसोबत पुरंदरच्या रखवालीचे काम करत. आपल्या वडिलांकडून त्यांनी गोफण चालविणे, तीरकामठा मारणे, कुर्‍हाड चालविणे, भाला फेकणे, तलवार व दांडपट्टा चालविणे इत्यादी कौशल्ये आत्मसात केली होती. इंग्रजांच्या सल्ल्यावरून १८०३ मध्ये दुसर्‍या बाजीरावाने पुरंदर किल्ला रामोशींच्या ताब्यातून काढून घेण्याचा प्रयत्न केला, यावेळी रामोशींनी कडाडून विरोध केला. त्यामुळे संतापलेल्या पेशव्यांनी रामोशी लोकांचे हक्क, वतने, जमिनी जप्त केल्या. उमाजींनी पेशव्यांच्या या अत्याचाराच्या विरुद्ध संघर्ष केला.

गरिबांना लुटणारे सावकार, वतनदार व जमीनदार यांना त्यांनी आपले लक्ष बनविले. त्यांचा भाऊ आमृताने इंग्रजांचा भांबुर्ड्याचा लष्करी खजिना लुटला (१८२४-२५). या लुटीमध्ये उमाजींची भूमिका महत्त्वाची होती. उमाजींविरुद्ध इंग्रज सरकारकडे तक्रारी वाढल्याने इंग्रजांनी जाहीरनामा काढून उमाजींना पकडून देणार्‍यास १० हजारांचे बक्षीस व ४०० बिघे जमीन देण्याचे जाहीर केले. या आमिषाला उमाजीचे दोन साथीदार काळू व नाना हे बळी पडले. त्यांनी उमाजींना १५ डिसेंबर १८३१ रोजी स्वत: पकडून इंग्रजांच्या स्वाधीन केले. त्यानंतर इंग्रजांनी उमाजींना पुणे येथे ३ फेब्रुवारी १८३२ रोजी फाशी दिली.

First Published on: February 3, 2023 1:24 AM
Exit mobile version