हाथरस बलात्कार प्रकरणावरून राडा

हाथरस बलात्कार प्रकरणावरून राडा

हाथरसमध्ये झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणात मृत्यू झालेल्या पीडितेच्या कुटुंबियांना गुरुवारी भेटायला निघालेले काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी, प्रियांका गांधी आणि काँग्रेसच्या शेकडो कार्यकर्त्यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी अडवले. त्यावेळी झालेल्या गोंधळात काही पोलिसांनी थेट राहुल गांधींच्या कॉलरला हात घातला. त्यांना धक्काबुक्की केली. यात राहुल गांधी खाली पडले. यामुळे दिल्लीहून उत्तर प्रदेशकडे जाणार्‍या डीएनडी उड्डाणपुलावर प्रचंड राडा सुरू झाला. या राड्यात उत्तर प्रदेश पोलिसांनी अनेक कार्यकर्त्यांना धक्काबुक्की केली. लाठीमार देखील केल्याची दृश्य समोर आली आहेत. या घटनेचा तीव्र निषेध काँग्रेसच्या देशभरातल्या नेत्यांनी आणि विविध स्तरातल्या राजकीय मंडळींनी केला आह

हाथरसमध्ये एका तरुणीवर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्यानंतर या प्रकरणावरून मोठा वाद सुरू झाला आहे. सर्व देशभरातून या मुद्यावर उत्तर प्रदेश सरकारवर टीका केली जात असताना आता काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांना ताब्यात घेऊन आणि काँग्रेस कार्यकर्ते-पदाधिकार्‍यांना धक्काबुक्की करून त्या रोषामध्ये भरच पडली आहे. हाथरसच्या घटनेचा निषेध करतानाच थेट हथरसमध्ये जाऊन पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी राहुल गांधी, प्रियांका गांधी आणि काँग्रेसचे अनेक पदाधिकारी-कार्यकर्ते निघाले होते. मात्र, त्यांना दिल्ली-नोएडा महामार्गावरच अडवण्यात आले.

बाबरी मशीद विध्वंस प्रकरणी जाहीर करण्यात आलेल्या जमावबंदीचे कारण पुढे करून त्यांना अडवण्यात येत होते. मात्र, त्यानंतरही राहुल गांधींनी ‘मी एकटा जातो. मग जमावबंदीचं उल्लंघन होणार नाही ना?’ असे म्हणून पायीच पुढे जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, तरीदेखील त्यांना अडवून धक्काबुक्की करण्यात आली. यामध्ये राहुल गांधी तोल जाऊन खाली पडले. या प्रकारानंतर उत्तर प्रदेश पोलिसांनी राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांना ताब्यात घेतले. त्यानंतर तिथून पुढे येण्याचा प्रयत्न करणार्‍या काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना धक्काबुक्की, लाठीमार करून पिटाळण्याचा प्रयत्न झाला. या सगळ्या प्रकारामुळे सध्या उत्तर प्रदेश सरकार आणि उत्तर प्रदेश पोलीस देखील टीकेच्या केंद्रस्थानी आले आहेत.

शवविच्छेदन अहवालात बलात्काराचा उल्लेख नाही
उत्तर प्रदेशमध्ये दोन दिवसांपूर्वी झालेल्यी हाथरस सामूहिक बलात्कार घटनेवरून देशभरातले वातावरण तापले आहे. गुन्हेगारांना कठोरात कठोर शिक्षा व्हायला हवी, अशी मागणी देशभरातून केली जात आहे. सोशल मीडियावर देखील यासंदर्भात प्रचंड संतापाचा सूर असतानाच या तरुणीच्या शवविच्छेदन अहवालातून काही धक्कादायक उल्लेख समोर आले आहेत. त्यामुळे पुरावे नष्ट करण्यासाठीच तरुणीच्या मृतदेहावर घाईघाईने अंत्यसंस्कार करण्यात आल्याचे बोलले जात आहे. पीडितेचा मृत्यू बलात्काराने झालेला नसून पाठीला झालेल्या दुखापतीमुळे झाल्याचे अहवालात नमूद केले आहे.

मुंबईत काँग्रेसचे आंदोलन
उत्तर प्रदेश पोलिसांनी राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्याशी केलेल्या दंडेलशाहीचा महाराष्ट्र काँग्रेसने गुरुवारी तीव्र निषेध केला. काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्त्यांनी काल मंत्रालयाजवळील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर आंदोलन केले. पोलिसांची ही कृती म्हणजे दडपशाही आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी गुरुवारी केली.

पोलिसांनी मला खाली पाडले
उत्तर प्रदेशच्या जंगलराजमध्ये मुलींवर अत्याचार आणि सरकारची मुजोरी सुरू आहे. जिवंत असताना सन्मान दिला जात नाही आणि अंतिम संस्कारही करू दिला नाही. भाजपचा नारा ‘बेटी बचाओ’ नाही, तर ‘तथ्य छुपाओ, सत्ता बचाओ’ असा आहे. मी हाथरसला जात असताना मला अडवताना पोलिसांनी मला धक्का देऊन खाली पाडले, त्यानंतर माझ्यावर लाठ्या चालवल्या, या देशात काय फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच फिरू शकतात का?
– राहुल गांधी, काँग्रेस नेते

First Published on: October 2, 2020 7:08 AM
Exit mobile version