लोकलमध्ये सोशल डिस्टन्सिंग पाळण्यासाठी मुंबई, ठाण्यातील कामाच्या वेळेत बदल करण्याचे संकेत

लोकलमध्ये सोशल डिस्टन्सिंग पाळण्यासाठी मुंबई, ठाण्यातील कामाच्या वेळेत बदल करण्याचे संकेत

मुंबईची जीवनवाहिनी समजल्या जाणार्‍या उपनगरी रेल्वेवरील गर्दी कोरोना काळात विभागली जावी, यासाठी मुंबई आणि उपनगरातील खासगी आस्थापनांची वेळ बदलण्याचा राज्य सरकार गंभीरपणे विचार करत असल्याची माहिती सरकारी सुत्रांनी ‘महानगर’ला दिली. सरकारी आस्थापनांची असलेली वेळ तशीच ठेवून खासगी आस्थापनांची कामाची वेळ सकाळी ६ ते ८ अशी बदलण्याचा सरकार सकारात्मक विचार करत आहे. ७ दिवस २४ तास या संकल्पनेमुळे कोरोना काळात गर्दीने होणारे सोशल डिस्टन्सिंगचे नियमही पाळता येतील, असे सांगण्यात आले.

कोरोना संसर्गाच्या वाढत्या उपद्रवाच्या पार्श्वभूमीवर राज्यात विशेषत: मुंबईसारख्या शहरात गर्दीचे नियम पाळण्याचे आवाहन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केले आहे. राज्यातील गर्दीचा परिणाम कोरोनाच्या वाढत्या प्रसारात होत आहे. हे संकट दूर करून कोरोनावर मात करण्यासाठी मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड या रेल्वे प्रवासावर विसंबून असलेल्या खाजगी आस्थापनेतील कामगारांच्या कामाच्या वेळा बदलण्याच्या सूचना विविध संस्थांनी केल्या होत्या. प्रवाशी संघटनांबरोबरच राज्यातील उद्योगांनीही याबाबत काही सूचना केल्या आहेत.

याशिवाय राज्य कोरोना टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. संजय ओक यांनीही सोशल डिस्टन्सिंगच्या नियमनासाठी रेल्वे प्रवासातील गर्दी कमी करण्याची बाब मुख्यमंत्र्यांना लेखी स्वरूपात कळवली आहे. संसर्ग वाढू नये, यासाठी गर्दीचा प्रवास म्हणून चर्चेत असलेल्या रेल्वेवरील गर्दीचा ताण कमी करण्यासाठी काही उपायही त्यांनी आपल्या पत्रात सुचवले आहेत. त्यानुसार सरकारी कार्यालयांचा कार्यालयीन कालावधी आहे त्याचप्रमाणे ठेवून खासगी आस्थापनांच्या कार्यालयीन कामाची वेळ सकाळी ६ ते ८ दरम्यान सुरू करण्यात यावी, असे सुचवण्यात आले आहे. या बदलामुळे उपनगरी रेल्वे प्रवासासह मुंबई आणि आसपासच्या प्रवासी वाहतुकीवर येणारा ताण कमी होईल आणि यातून सोशल डिस्टन्सिंग पाळले जाऊ शकेल, असे सांगण्यात येते.

संसर्गाच्या संकटात मुंबईतील उद्योग सुरू करण्याच्या हालचाली गंभीरपणे विचारात घेतल्या जात असून ऑक्टोबर महिन्याच्या मध्यावर उपनगरी रेल्वेतील सामान्यांचा प्रवास सुरू करण्यात येण्याची शक्यता आहे. यासाठी सरकारने पुढाकार घेतला असल्याची माहिती राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली. लॉकडाऊननंतर रोजगाराच्या गरजेनुसार रेल्वे सुरू करण्याची मागणी आता अधिकच जोर धरू लागल्याने सरकारही रेल्वे प्रवासासाठी सकारात्मक असल्याचे ठाकरे म्हणाले. कामाच्या वेळा बदलण्यासाठी विविध व्यावसायिकांशी राज्य सरकारने चर्चा सुरू केल्याचे आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले. सोशल डिस्टन्सिंग पाळण्यासाठी कदाचित 7 दिवस 24 तास कार्यालये सुरू करण्याच्या योजनेचाही विचार होऊ शकतो, असे सुतोवाच त्यांनी केले.

उपनगरी रेल्वेचा प्रवास ऑक्टोबरमध्ये
मुंबई आणि महाराष्ट्रातील रोजगाराचा प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने मुंबईची जीवनवाहिनी समजल्या जाणार्‍या उपनगरी रेल्वेवरील ताण कमी करताना सोशल डिस्टन्सिंग पाळण्यासाठी लवकरच नियमन केले जाईल. उपनगरी रेल्वेतील सामान्य कर्मचार्‍यांचा प्रवास ऑक्टोबरच्या मध्यावर सुरू होईल. त्या द़ृष्टीने चर्चा सुरू झाली आहे.

First Published on: September 30, 2020 6:43 AM
Exit mobile version