कर्जत : वाचनालयाच्या मागे जनावरांची कत्तल करून मांस विक्री

कर्जत : वाचनालयाच्या मागे जनावरांची कत्तल करून मांस विक्री

meat sales behind the library in karjat

कर्जत शहरातील दहिवली येथे जुन्या ग्रामपंचायत कार्यालयात सुरू करण्यात आलेल्या वाचनालयाच्या मागील भागात जनावरांची कत्तल करून मांस विक्री केली जात असून, दुसरीकडे अंधारात मद्यपान, अमली पदार्थांचे सेवन आदी प्रकार घडत आहेत. वर्दळीचा भाग असतानाही अशा वाईट प्रवृत्ती वेळीच मोडून काढण्यासाठी कठोर कारवाई करावी, असे निवेदन माजी नगराध्यक्ष राजेश लाड यांनी नगर परिषदेला दिले. मात्र अद्याप कारवाईसाठी कोणतीच ठोस पावले प्रशासनाकडून उचलली गेली नाहीत.

नगर परिषद हद्दीतील दहिवली भागात पालिकेच्या मालकीची जुनी ग्रामपंचायत कार्यालयाची वास्तू आहे. त्या ठिकाणी सध्या स्वामी विवेकानंद सार्वजनिक वाचनालय सुरू आहे. यामुळे ठरवून दिलेल्या वेळेत ज्येष्ठ नागरिकांसह तरुणांची तेथे वर्दळ असते. या ठिकाणच्या मागच्या बाजूस काहींनी अनधिकृतपणे झोपडी बांधून त्यात जनावरांची मांस विक्री, दारू विक्री, मद्यपान, अमली पदार्थांचे सेवन असे कृत्य सुरु केले आहे. वाचनालयाच्या मागे गजानन पाटील यांचे घर असून, समोर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यालय आहे. डुकराचे मांस या ठिकाणी कापले जात असल्याने आजूबाजूला मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरत आहे. पालिकेकडून स्वच्छता अभियान, वसुंधरा अभियान राबवून शहर स्वच्छ ठेवण्याचे काम सुरु आहे.

मात्र शहराच्या गजबजलेल्या भागात असे गैरप्रकार घडत असल्याने स्वच्छ शहर या प्रतिमेला धक्का पोहचण्याचे काम होत आहे. त्यामुळे माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे शहर कार्याध्यक्ष लाड यांनी या विरोधात आवाज उठवून २ ऑगस्ट रोजी पालिकेला निवेदन सादर केले आहे. मात्र यावर अजून कारवाई झाली नाही. त्यामुळे यावर लवकरात लवकर कारवाई करून ही जागा अशा दुष्कृत्यांपासून मुक्त करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.


हे ही  वाचा – लक्षात ठेवा, तुम्हालाही मुलंबाळं आहेत!


 

First Published on: August 26, 2021 12:48 PM
Exit mobile version