एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली

एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिल्यानंतर या समाजाकडून होणार्‍या मागणीची दाखल घेत एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या मागणीसह इतर मागण्यांसाठी मराठा समाजाने मोर्चाची घोषणा केली होती. अखेर परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन या निर्णयाची घोषणा केली.

मराठा समाजाचे आरक्षण सुप्रीम कोर्टाने उठवल्यानंतर नोकरभरती थांबवण्याची मागणी जोर धरू लागली होती. तसेच या परीक्षेला बसू इच्छिणार्‍या काही विद्यार्थ्यांना कोरोना संसर्गाने ग्रासले असल्याची बाब पुढे आली होती. अखेर ठाकरे सरकारने एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. रविवारी होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली असून, कोणताही विद्यार्थी अपात्र ठरणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहे. एमपीएससीच्या पुढील सूचनेनंतर परीक्षेची पुढची तारीख जाहीर केली जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

येत्या रविवारी ११ तारखेला महाराष्ट्रात २०० जागांसाठी एमपीएससी परीक्षा जाहीर झाली होती. गेल्या चार महिन्यात कोरोनाचे संकट आहे. गेले काही महिने अभ्यासिका, क्लासेस बंद होते. विद्यार्थ्यांच्या सूचना आल्या, अभ्यासाला वेळ मिळायला हवा. त्यामुळे ही परीक्षा काही काळ पुढे ढकलण्यात येत आहे. यापूर्वीही दोनवेळा या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. आता आयोगाच्या सूचनेनुसार जी तारीख ठरेल त्याच तारखेला परीक्षा होईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. जे ११ तारखेच्या परीक्षेला पात्र होते, ते सर्व पुढच्या तारखेला म्हणजे जी तारीख जाहीर होईल, त्या तारखेसाठी पात्र असतील, कोणाचेही वय वाया जाणार नाही, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आश्वस्त केले.

First Published on: October 10, 2020 6:40 AM
Exit mobile version