Poladpur : आदिवासींना मिळतोय मासेमारीतून रोजगार

Poladpur : आदिवासींना मिळतोय मासेमारीतून रोजगार

Poladpur : आदिवासींना मिळतोय मासेमारीतून रोजगार

गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीमुळे निर्सगदत्त वनवासी असलेल्या आदिवासींना खर्‍या अर्थाने हाताला काम नसल्याने खर्‍याखुर्‍या वनवास यातना भोगाव्या लागल्या आहेत. मात्र लॉकडाऊनचे नियम शिथिल झाल्यानंतर आदिवासींनी पूर्वांपार चालत आलेला मासे विक्रीचा व्यवसाय सुरू केला असून, त्यातून मिळणार्‍या पैशांतून त्यांची चूल पेटली आहे. त्यामुळे आदिवासी पुरुष-महिलांच्या चेहर्‍यावर हसू दिसू लागले आहे. पोलादपूर तालुक्यातील आदिवासी वाळू उपसा, वीटभट्टी आणि बांधकाम व्यवसायात मोलमजुरी करून पोट भरतो. तसेच उन्हाळ्यात मासेमारी करतो आणि गावोगावी फिरून किंवा शहरात मासे विक्री करीत असतो. कोरोना काळात वीटभट्टी आणि वाळू उपसा व्यवसाय पूर्णपणे बंद पडल्यामुळे रोजगार बुडाला आहे. परिणामी आदिवासींच्या हाताला मजुरीचे काम मिळत नव्हते. परिणामी कुटुंबावर उपासमारीची वेळ आली. अशा परिस्थितीतही कोणाची गुरे सांभाळणे, भात लावणीच्या कामात मजुरी अशी किरकोळ कामे आदिवासी करीत होता. शासनाच्या अंत्योदय योजनेतून मिळणार्‍या अन्नधान्याच्या आधारावर कसेबसे दिवस ढकलले जात होते.

काही दिवसांपूर्वी शासनाने निर्बंध शिथिल केल्याने आदिवासींनी सावित्री, ढवळी, कामथी, घोडवणी, चोळई या नद्यांच्या पात्रातील डोहात मासेमारी करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे सकाळच्या वेळी डोहात उतरून आदिवासी पुरुष-महिला बारीक जाळीच्या किंवा साडीच्या सहाय्याने मासेमारी करीत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. टोपलीभर मासे मिळताच महिला येथील बाजारात, तर कोणी गावात घरोकरी फिरून मासे विक्री करीत आहेत. ताजे आणि चविष्ट म्हणून ओळखल्या जाणार्‍या मळे, डाकू, वाम आणि खडक या जातीच्या माशांना चांगला भाव मिळत असून, हे मासे हातोहात संपत आहेत.

मासे विक्री करणार्‍या महिलांच्या मते माश्यांचे दर स्वस्त असल्याने खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी होत असते.मळे आणि डाक २०० रुपये, तर वाम ३००रुपये आणि खडक ४०० रुपये प्रति किलोने विकले जात आहेत.

 वार्ताहर – बबन शेलार


हे ही वाचा – नांदेडमध्ये भाजपला मोठं खिंडार; भास्करराव पाटील खतगावकर काँग्रेसमध्ये प्रवेश करणार


 

First Published on: October 17, 2021 4:46 PM
Exit mobile version