राजस्थानमध्ये मध्य प्रदेशची पुनरावृत्ती?

राजस्थानमध्ये मध्य प्रदेशची पुनरावृत्ती?

तीन महिन्यांपूर्वी मध्य प्रदेशची सत्ता गमावलेल्या काँग्रेससाठी आता राजस्थान चिंतेचा विषय ठरण्याची शक्यता दिसत आहे. भाजपकडून सरकार पाडण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केला होता. त्यानंतर जयपूरमधील हालचालींनी कमालीचा वेग घेतला. याप्रकरणी भाजपच्या दोन नेत्यांना अटक झाली. तर उपमुख्यमंत्री सचिन पायलट व मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना पोलिसांनी नोटीस बजावली आहे. त्यानंतर सचिन पायलट हे २२ आमदारांसह दिल्लीत दाखल झाले असून, नोटीस पाठवण्यात आल्यामुळे ते नाराज असल्याचे वृत्त आहे. तसेच ते नॉट रिचेबल झाले आहेत.

अशोक गेहलोत व सचिन पायलट यांच्यात अहंकारामुळे वाद होत आहे. दोन्ही नेत्यांमध्ये एकमेकांविषयी प्रचंड अविश्वास आहे. काँग्रेसच्या एका माजी केंद्रीय मंत्र्यांनी सांगितले की, सध्याच्या परिस्थितीत कोणत्याही गोष्टीचा भरवसा दिला जाऊ शकत नाही. त्यामुळे काँग्रेसच्या नेत्यानींही सध्याचा वाद काँग्रेसमधील मोठ्या समस्येचा भाग आहे. ज्यात पक्षातील युवा नेतृत्वाला आपल्या भविष्याविषयी चिंता सतावू लागली आहे. तर दुसरीकडे पक्ष राष्ट्रीय नेतृत्वाचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत आहे.

काँग्रेस पक्ष २०१८मध्ये राजस्थानात सत्तेत आल्यानंतरच अशोक गेहलोत व सचिन पायलट यांच्यात वादाची ठिणगी पडली होती. काँग्रेसने विधानसभा निवडणुकीसाठी निवडलेल्या नेतृत्वापासून याची सुरुवात झाली होती. त्यानंतर जेव्हा काँग्रेसने तिसर्‍यांदा अशोक गेहलोत यांना मुख्यमंत्री केले, त्यानंतर वादाची ही दरी आणखी वाढली. या मागील महत्त्वाचे कारण म्हणजे २०१३मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत मानहानीकारक पराभव झाल्यानंतर राजस्थानमधील काँग्रेस प्रदेशाध्यपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर सचिन पायलट यांनी पक्ष बांधणीचे मोठे काम केले होते. त्यानंतर खातेवाटपावरूनही दोन्ही नेत्यांमधील नाराजी स्पष्टपणे दिसून आली होती.

अशोक गेहलोत यांनी आपला मुलगा वैभव याला जोधपूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. त्यावरून दोन्ही नेत्यांमध्ये धुसफूस झाल्याचे दिसून आले होते. लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर सचिन पायलट यांच्या गटाने गेहलोत यांच्यावर मुलाच्या मतदारसंघात पूर्ण लक्ष दिल्याचाही आरोप केला होता. त्यानंतर महापौर उमेदवारांची निवड कोटातील रुग्णालयात झालेल्या बालकांच्या मृत्यू प्रकरणावरून सचिन पायलट व अशोक गेहलोत यांच्यातील वाद चव्हाट्यावर आले होते.

First Published on: July 13, 2020 11:55 PM
Exit mobile version